‘एक दिवस बळीराजासाठी’ चालना देणारा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
47289
———-
‘एक दिवस बळीराजासाठी’ चालना देणारा
कृषी संचालक विकास पाटील; मांडेदुर्ग, सुंडी येथील शेतकऱ्यांची भेट
सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. २ ः शेतकऱ्यांचा कृषी विभागाशी संपर्क वाढला, तर शासनाच्या विकासात्मक योजना शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचायला वेळ लागणार नाही. त्यासाठी माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा शासनाचा नवा उपक्रम कृषिक्षेत्राला चालना देणारा ठरेल. त्यासाठी शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी केले.
मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथे कृषी विभागामार्फत आयोजित केलेल्या माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मांडेदुर्ग व सुंडी येथील शेतकऱ्यांची भेट घेतली. शिवमुद्रा शेतकरी गट व सुंडी येथील शिवसंग्राम अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कोल्हापूरचे विभागीय नोडल अधिकारी स्मार्टचे उमेश पाटील उपस्थित होते.
तालुका कृषी अधिकारी यशोदीप पोळ यांनी चंदगड तालुक्यातील विविध पिकांची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या अडचणी व समस्यांचा आढावा घेतला. विकास पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या शासनाच्या उपक्रमाची माहिती दिली. १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत हा उपक्रम राबवला जाणार असल्याने तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी महिन्यातून एक दिवस या उपक्रमांतर्गत गावांना भेटी देणार आहेत. शेतकऱ्यांना आपल्या समस्या संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडून सोडवणूक करून घेता येणार आहे. नवीन योजनांची व तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
उमेश पाटील म्हणाले, ‘केंद्र व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. परंतु त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे त्याचा शेतकऱ्यांना लाभ घेता येत नाही. अनेक शेतकरी चांगले पीक घेतात; पण नवीन तंत्रज्ञानाची त्यांना माहिती नाही. पीक पद्धतीतील बदल, बियाणे, खताची मात्रा, बाजारपेठ आदी विषयांवर सखोल ज्ञान मिळेल.’
शेतकऱ्यांनी भात, ऊस, नाचणी, सोयाबिन व काजू या पिकांबाबत येणाऱ्या समस्या विचारल्या. उपविभागीय कृषी अधिकारी सतीश रोकडे, सुंडीचे सरपंच मनोज कांबळे, मंडल कृषी अधिकारी विजय गंबरे, सतीश कुंभार, अभिजित देवणे, सुधाकर मुळे, अतुल मुळे, शिवमुद्रा शेतकरी गटाचे अध्यक्ष गणपती पवार आदी उपस्थित होते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares