ऐन सणासुदीत पाणीटंचाई – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
अलिबाग, ता. १ (बातमीदार) : एकीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना, दुसरीकडे कुरुळपासून वढावपर्यंतच्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. याविरोधात नागरिकांमधून विशेषतः महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे. शेतकरी कामगार पक्षाने या विरोधात आक्रमक भूमिका घेत गुरुवारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कार्यालयात धडक देत कार्यकारी अभियंत्‍यांना चांगलेच धारेवर धरले. अखेर अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
अलिबाग तालुक्यातील कुरुळ, बेलकडे, ढवर, सहाणगोठी, सहाण, कावीर, बामणगाव, वढाव या गावांतील सुमारे सात हजारांहून अधिक लोकवस्ती असलेल्या गावांना एमआयडीसीमार्फत पाणी पुरवठा होतो. तालुक्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह असताना, अचानक पाणीपुरवठा खंडित झाल्‍याने नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. गणेशोत्सवानिमित मुंबई, पुणे आदी शहरांतून चाकरमानी मोठ्या संख्येने गावागावांत दाखल झाले आहेत; परंतु पाणीपुरवठा खंडित झाल्याने ऐन सणासुदीत महिला वर्गाची धांदल उडाली.
अभियंत्‍याच्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे
पाणीटंचाईविरोधात गुरुवारी शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने चेंढरे एमआयडीसी विभागातील कार्यकारी अभियंता संजय ननवरे यांची भेट घेत जाब विचारला. आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहून ज्या ठिकाणी बिघाड आहे, त्या ठिकाणी पाहणी करून तातडीने पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल. असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी माघार घेतली. आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य संजय पाटील, नंदकिशोर तुणतुणे सहभागी झाले होते.
अधिकाऱ्यांचे अजब वक्तव्य
शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी अधिकाऱ्यांना गावांमध्ये पाणी पुरवठा का होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी गेल कंपनीसाठी पाणीपुरवठा केला जात असल्याचे उत्तर दिले. त्यावर आमच्या जागेतूनच एमआयडीसीची पाईपलाईन जाते. आम्हाला पाणी पुरवठा होणे गरेजेचे असताना, अधिकाऱ्यांच्या अजब वक्तव्याने कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले. अखेर उपअभियंत्यांनी मध्यस्थीची भूमिका घेत अभियंत्यांच्या वक्त्यव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares