आहुपेत कृषी अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी संवाद – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
फुलवडे ता. ३ : आहुपे (ता. आंबेगाव) येथे राजगुरुनगर येथील उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी ''एक दिवस बळीराजासाठी'' अंतर्गत शेतकऱ्यांची भेट घेऊन संवाद साधला.
दीपक असवले यांच्या ''घरी चायाचा बार'' ही रानभाजी, तांदळाची भाकरी आणि स्थानिक भात वाण हा रायभोग याचा आस्वाद घेऊन सरपंच रमेश लोहकरे यांच्या घरी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रामस्तरीय कृषी समिती व ग्रामस्थांची संयुक्त बैठक जळकेवाडीत घेतली. बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेताना चारसूत्री भात लागवड, युरिया ब्रिकेट खतांचा वापर, रोग आणि कीड याबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून विविध योजनांबाबत माहिती दिली. फळबाग लागवडी सोबतच गावातच गावठी आंबा लागवड करून त्यावर कलम करण्याबाबतची संकल्पना मांडली शेतकरी यांनी मिनी राईस मिलमध्ये तांदळाची गुणवत्ता चांगली राहत नसल्याने मोठ्या राईस मिलची सोय या भागात व्हावी, त्याचप्रमाणे रोजगार निर्मितीसाठी शेतीच्या कामांचा समावेश रोजगार हमी योजनेत व्हावा, अशी मागणी केली.
आदिवासी बांधव जमा करत असलेल्या वावडींग या वनउपज वनस्पतीबाबत माहिती घेण्यात आली. तसेच लक्ष्मण लांघी, संदीप असवले यांच्या शेतावर भेट देऊन प्रक्षेत्रावर फळबाग लागवड, रेशीम उद्योग, कृषी पर्यटन याबाबत चर्चा करून मार्गदर्शन केले.
पिंपरगणे येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव व कृषी विभागाकडून अनुदानित शेततळ्याचे लाभार्थी धवळाबाई गवारी यांच्या शेततळ्याची पहाणी केली. बोरघर येथे घोड -बुब्रा कॅचमेंट दूध उत्पादक बचत गट या दुग्ध संस्थेला भेट देऊन व्यवस्थापक व शेतकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांच्यासमवेत कृषी पर्यवेक्षक पी. जे. आंबेकर, कृषी सहाय्यक बी. जी. बोकड, वाय. सी. बांबळे, डी. व्ही सुपे, ए. एल. मोहरे, यु. आर. लोहकरे उपस्थित होते.
01526
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares