वाहनाचालकांच्या सुरक्षेचा शोध – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : घाट चढ-उतारावर वाहनांचे अपघात मोठ्या प्रमाणात होतात. चालकांना क्लच, ब्रेक वापरताना घाटामध्ये प्रसंगावधान राखून वाहन चालवावे लागते. यातून क्लच किंवा ब्रेकवरून पाय काढला तर वाहन मागे येऊन अपघात होतो. यावर उपाय काढण्यासाठी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अनुभाग अभियंता वैष्णवीप्रसाद रानडे यांनी अँटी डाऊन मेकँनिझम फॉर मोटार व्हेईकलचा शोध लावला आहे. मराठी माणसाच्या या शोधास तब्बल १० वर्षांनंतर जागतिक स्वामित्व हक्क (पेटंट) मिळाले आहेत.
वैष्णवीप्रसाद कृष्णा रानडे हे पंढरपूरमधील शेतकरी कुटुंबातील आहेत. सध्या मध्य रेल्वेमध्ये वरिष्ठ अभियंता आणि सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. नोकरी लागण्याअगोदर वैष्णवीप्रसाद शेतीकाम करायचे. यादरम्यान त्यांना १६ टन उसाने भरलेला ट्रॅक्टर चालवावा लागत होता. तेव्हा त्यांना उसाने भरलेल्या ट्रॅक्टर चढ-उतारावर चालवत असताना बऱ्याच समस्या येत होत्या. ट्रॅक्टर चढावावर बंद पडून मागे घसरण्याचा अनुभव प्रसाद यांना आल्याने त्यांनी त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. अनेक वेगवेगळे प्रयोग करीत अखेर २०१३ मध्ये अँटी डाऊन मेकँनिझम फॉर मोटार व्हेईकलचा शोध त्यांनी लावला आहे. या उपकरणाचा वाहनचालकांना मोठा फायदा होणार आहे. चढ-उतारावर वाहनांना हॅण्डब्रेक, उटी लावावी लागणार नाही. वाहन घसरणार नाही वा बंदही पडणार नाही, असा शोध त्यांनी लावला आहे.
वैष्णवीप्रसाद रानडे यांनी ‘सकाळ’ला सांगितले, ‘‘जेव्हा मी प्रत्यक्षात नोकरीला लागलो तेव्हापासून मी संशोधनाची सुरुवात केली होती. नोकरीतून वेळ मिळेल तसा वाहनाच्या इंजिनचा अभ्यास केला. तब्बल साडे नऊ वर्षांनंतर अँटी डाऊन मेकँनिझम फॉर मोटार व्हेईकल शोध लावला. २०१३ मध्ये बौद्धिक संपदा विभागाकडे जागतिक स्वामित्व हक्का(पेटंट)साठी नोंदणी केली. या नोंदणीनंतर अनेक दावे करण्यात आले होते. त्यानंतर जून २०२२ मध्ये जागतिक स्वामित्व हक्क मिळाले.

घाट, चढ-उतारावर अपघात…
घाट, चढ-उतारावर वाहनांचे अपघात होऊन दरवर्षी लाखो जण मृत्यू पडतात. चढावर ब्रेक लावल्यानंतर वाहन मागे जाण्याची भीती असते. अँटी डाऊन मेकँनिझम फॉर मोटार व्हेईकलच्या शोधामुळे वाहनचालकांची भीती दूर होणार आहे. घाट, चढ-उतारावर वाहनांचे अपघात कमी होणार आहेत.

संरक्षण दलातील वाहने होणार सक्षम
सैनिकांचा प्रवास, सीमेवर गस्त घालणे, युद्धजन्य परिस्थितीत मदत पोहोचवणे अशा अनेक कामांसाठी संरक्षण दल वाहनांचा वापर करते. त्यात अँटी डाऊन मेकँनिझमच्या वापर केला तर आपल्या जवानांना सुरक्षा मिळेल, अशी प्रतिक्रिया वैष्णवीप्रसाद रानडे यांनी दिली.
——————–
केवळ सहा भाग
पाश्चिमात्य देशांतील संशोधकानी ‘अँटी डाऊन मेकँनिझम फॉर मोटार व्हेईकल’साठी १०० सुटे भाग वापरले होते; तर वैष्णवीप्रसाद रानडे यांनी केवळ सहा सुट्ट्या भागात हे तंत्र विकसित केले.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares