सरुड – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
ऊस दरासाठी टोकाचा संघर्ष अटळ
माजी खासदार शेट्टी; सरूड परिसरात संपर्क दौऱ्यात शेतकऱ्यांशी चर्चा
सरूड, ता. ३ ः इथेनॉल निर्मितीमुळे साखर उद्योगाला चांगले दिवस आले असतानाही शासन व कारखानदारांनी एकरकमी एफआरपी देण्याऐवजी त्याचे तुकडे पाडण्याचे व उसाला अपेक्षित दर न देण्याचे कुटिल कारस्थान रचले आहे. त्यामुळे भविष्यात हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी शेतकऱ्यांनी टोकाच्या संघर्षासाठी सज्ज रहावे, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
सरुड परिसरातील गावांच्या संपर्क दौऱ्याप्रसंगी येथे बोलताना त्यांनी हे आवाहन केले आहे. या दौऱ्यामध्ये शेट्टी यांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.
राजू शेट्टी म्हणाले, ‘‘उत्पादन खर्च पाहता २०१९ नंतर ऊस दरामध्ये अपेक्षित दरवाढ झाली नाही. वास्तविक रासायनिक खते, मशागत खर्च, कीटक, तसेच तणनाशकांचा खर्च आदी खर्चामध्ये महागाईमुळे प्रचंड वाढ होऊन उत्पादन खर्च वाढला असताना त्या प्रमाणात ऊस दरामध्ये वाढ करणे गरजेचे होते; परंतु शासन तसेच साखर कारखानदारांकडून त्या दृष्टीने कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. उलट एकरकमी एफआरपी देण्याऐवजी त्याचे तीन तुकडे पाडण्याचे कुटिल कारस्थान सुरू आहे. हे शेतकरीविरोधी कारस्थान हाणून पाडण्यासाठी शेतकऱ्यांना संघटित होऊन संघर्ष करावा लागणार आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढकार घेणार असून संघटनेच्या वतीने लवकरच प्रत्येक गावागावांत सभा घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे.’’
या वेळी स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष वंसत पाटील, संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश म्हाऊटकर, रायसिंग पाटील, जयसिंग पाटील-चरणकर, अवधुत जानकर, पद्मसिंह पाटील, भैया थोरात, रामभाऊ लाड, अजित साळोखे, शामराव सोमोशी- पाटील, भीमराव नांगरे, विजय आबा पाटील, काका पाटील आदीसह शेतकरी उपस्थित होते.
प्रतिटन ७०० ते ९०० रुपये जादा मिळावेत
साखर कारखान्यांकडून उत्पादित होणाऱ्या इथेनॉलच्या दरात वाढ झाल्याने सध्या इथेनॉलला चांगला दर मिळत आहे. इथेनॉलला मिळणारा हा दर पाहता कारखान्यांना उसाला सध्या देत असलेल्या दरापेक्षा अधिक ७०० ते ९०० रुपयांपर्यंत जादा दर देण्यास काही अडचण नाही, असेही माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुद्यासह पटवून दिले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares