पाण्यातून वाट शोधत, 'शाळेला चाललो आम्ही'; मिरगाव येथील विद्यार्थ्यांची परवड | Latest Marathi News – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्याच्या पूर्वेकडील मिरगाव व पिंपरवाडी या गावांच्या शिवेवर 2009 मध्ये जामनदीवर बांधलेला बंधारा स्थानिक शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरला आहे. यापूर्वी पाणी साठा न झालेल्या या बंधारात गेल्या तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत असून त्यामुळे बंधाऱ्याच्या मध्यातून जाणारा मिरगाव ते वावी हा जिल्हा परिषद रस्ता पाण्याखाली गेला आहे. या पाण्यातून वाट शोधत शाळेपर्यंत जाण्याची धोकादायक वेळ मिरगाव शिवारातील विद्यार्थ्यांवर आली आहे. (sinnar flood news students travelled through water for school in Mirgaon nashik Latest Marathi News)
मिरगाव, पिंपरवाडी व वावी या गावादरम्यान जिल्हा परिषदेमार्फत 72 च्या दुष्काळात बनवण्यात आलेला रस्ता परिसरातील शेतकऱ्यांना दैनंदिन वापरासाठी सोयीचा होता. मिरगाव येथील शाळकरी मुले माध्यमिक शिक्षणासाठी वावीला येताना हाच रस्ता वापरायचे. शेतकरी, औद्योगिक कामगार देखील याच रस्त्याचा वापर करायचे. मात्र शिर्डी रस्त्याचा वापर वाढल्याने हा रस्ता काहीसा दुर्लक्षित झाला आहे.
असे असले तरी मिरगावची हिंगे वस्ती, शेळके वस्ती, बुरंगुले वस्ती, पिंपरवाडी शिवारातील काकड वस्ती, गायकवाड वस्ती, वाबळे वस्ती अशा 12 ते 15 वस्त्यांसाठी मात्र अजूनही हा रस्ता सोयीचा आहे. 2009 मध्ये जाम नदीवर मिरगाव व पिंपरवाडीच्या सीमेवर बंधारा बांधण्यात आला. रस्ता या बंधाऱ्याच्या थेट मध्यातून गेल्याने पाणी आल्यावर जायचे कसे असा प्रश्न त्यावेळीच शेतकऱ्यांनी उपस्थित केला होता.
मात्र, प्रशासन व ठेकेदाराने स्थानिकांना येजा करण्यासाठी बंधाऱ्याच्या बाजूने पक्का रस्ता बनवून देण्याची ग्वाही दिली होती. बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले, ठेकेदाराचे बिलही अदा झाले. मात्र अद्यापही या रस्त्याची स्थानिकांना प्रतिक्षाच आहे. बंधाऱ्यात पाणी वाढले तर बाजूच्या शेतांमधील पिके तुडवत जावे लागते. ही बाब विद्यार्थ्यांसाठी धोकादायक आहे. याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणांचे मात्र दुर्लक्ष झाले आहे.
अन्यथा जल आंदोलन….
वारंवार मागणी करून पक्का रस्ता बनत नाही. बंधाऱ्यात पाणीसाठा वाढल्यावर विद्यार्थ्यांना शाळा बुडवावी लागते. रस्त्याचा प्रश्न लवकर निकाली न काढल्यास व बंधाऱ्यात पाणी वाढून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आल्यास याच बंधाऱ्यात जल आंदोलन करण्यात येईल असा इशारा मिरगाव येथील विकास हिंगे, भावेश हिंगे, प्रभाकर बुंरुगुले, पवन शेळके, रोहित बागूल, दत्तू काकड, महेश हिंगे, दत्तू बुंरुगुले, सागर बुंरुगुले, सुनील हिंगे, सुनील शेळके यांचे सह ग्रामस्थांनी दिला आहे.
शेतकऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, पंचायत समिती प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यावर बंधाऱ्याच्या खालच्या बाजूने मातीचा तात्पुरता भराव टाकण्यात आला व तेथून ये-जा करण्यास सांगण्यात आले. मात्र तीन वर्षांपासून बंधाऱ्यात पाणी येत असल्याने या ठिकाणी दलदल निर्माण होते. त्यामुळे शेतकरी व मिरगाव ला प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून बंधाऱ्याच्या मध्यातून गेलेल्या जुन्या रस्त्याने पाण्यातून वाट शोधावी लागत आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares