वेळप्रसंगी बलिदान देऊ – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
सासवड शहर, ता. ३ : शासनाने जर आमच्यावर दबाव तंत्राचा वापर करून दडपशाही अंगीकारली तर आम्ही सर्व शेतकरी लोकशाही मार्गाने उत्तर देऊ. विमानतळ विरोधाचा नारा शासनापर्यंत पोचवू. काहीही झाले तरी आम्ही विमानतळाला विरोध करणारच. वेळप्रसंगी बलिदान देऊ. परंतु विमानतळास जमिनी देणार नाही, असे निवेदन विमानतळ विरोधी संघर्ष समिती व वनपुरी ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना आज (ता.३) सासवड (ता. पुरंदर) येथून पाठविण्यात आले.
पारगाव-मेमाणे, वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, खानावडी, एकतपूर व मुंजवडी या सात गावांचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांचा प्रथमपासूनच विमानतळास ठाम विरोध आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले. यावेळी शेतकऱ्यांनी ''सकाळ''शी बोलताना संतप्त भावना व्यक्त केल्या. विमानतळाला विरोधाबाबत सात गावातील ग्रामस्थ मुख्यमंत्र्यांना लवकरच भेटणार आहेत.
आंदोलन, मोर्चे काढणे हे आम्हाला नवीन नाही. शासनाने शेतकऱ्यांचा विरोध पाहून पुढचे पाऊल उचलावे. समृद्धी महामार्गाप्रमाणे जमिनी विकत घेऊन विमानतळ करण्याचा घाट शासनाने घातला आहे. असे असले तरी येथील ९० टक्के शेतकरी कोट्यवधी रुपये जरी मिळाले तरी आपल्या जमिनी देणार नाहीत. त्यामुळे विजय शिवतारे यांनी विमानतळाचे हवेत बंगले बांधू नयेत, असे विमानतळ विरोधी संघर्ष समितीतील शेतकऱ्यांनी सांगितले.
विमानतळ विरोधी संघर्ष समिती अध्यक्ष दत्ता झुरंगे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष तथा कार्याध्यक्ष संतोष हगवणे, वनपुरीचे सरपंच नामदेव कुंभारकर, पारगावच्या सरपंच प्रियंका मेमाणे, कुंभारवळणच्या सरपंच अश्विनी खळदकर, संतोष कुंभारकर, खानवडीच्या सरपंच स्वप्नाली होले, एकतपूर – मंजवडीचे सरपंच कृष्णा झुरंगे यांनी विरोध दर्शविला आहे.
खानवडीचे उपसरपंच स्वप्नील होले, पारगावचे माजी सरपंच बापू मेमाणे, पारगावचे उपसरपंच चेतन मेमाणे, वनपुरीचे उपसरपंच सुनील कुंभारकर, कुंभारवळणाचे उपसरपंच बंडू कामठे, विमानतळ संघर्ष समितीचे उपाध्यक्ष अमोल कामठे, उपसभापती देविदास कामठे, ज्योती मेमाणे, ग्रामस्थ विजय मेमाणे, भाऊसाहेब मेमाणे, दत्तात्रेय कुंभारकर, स्वप्नील कुंभारकर आदी बरोबर आहेत.
शिवतारे यांनी दिशाभूल करणे थांबवावे
महामंत्री महोदयांनी सासवड येथे जाहीर केले आहे की शेतकऱ्यांचा जर विरोध असेल तर विमानतळ होणार नाही आणि हेच सत्य आहे की, येथे शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. विजय शिवतारे, यांना माहीत असूनही स्वतःच्या मोठे होण्याच्या महत्वकांशापायी शेतकऱ्यांच्या विषय दुर्लक्षित करून स्वतःचे घोडे पुढे दामटत आहेत. त्यांनी शासनाची दिशाभूल करण्याचे काम थांबवावे, असेही विमानतळ विरोधी संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांनी सांगितले.
पुरंदर येथील विमानतळाचा प्रश्न हा कोणत्या एका शेतकऱ्याचा किंवा गावाचा राहिला नसून तो सात गावांचा व गावातील प्रत्येक घराचा प्रश्न झाला आहे. येथील जागेबाबत आम्ही सुरुवाती पासून विरोधात आहोत आणि यापुढेही निश्चित राहणार आहे. वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन छेडू. पण विरोधापासून मागे हटणार नाही.
– दत्ता झुरंगे, अध्यक्ष, विमानतळ विरोधी संघर्ष समिती.

05734
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares