Gauri Pujan 2022 : आज ज्येष्ठागौरी आगमनाचा दिवस; काय आहे गौरी पूजनाची कथा? जाणून घ्या – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 03 Sep 2022 04:00 AM (IST)
Edited By: प्रिया मोहिते
Gauri Pujan 2022
Gauri Pujan 2022 : घरोघरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे. आणि आज 3 सप्टेंबर म्हणजेच ज्येष्ठागौरी आगमनाचा दिवस. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन (Gauri Pujan 2022) करतात. गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला. तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. गौरीपूजनला काही ठिकाणी महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते, म्हणून यांना ज्येष्ठागौरी असेही संबोधले जाते. 
एखादी उपासना किंवा एखादे व्रताचरण करताना त्यात देशपरत्वे किती विविधता येऊ शकते, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे गौरीपूजन हे होय. ही ज्येष्ठा गौरी महाराष्ट्रात विविध जाती जमातीत, विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांनी पूजली जाते. काही भागात आणि काही समाजात ही गौरी म्हणजे कालीच समजून तिला ‘तिखटाचा’ म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखविला जातो.
आता गणपती घरात असतानाच गौरी येत असतात. अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठागौरीचे आवाहन ज्येष्ठा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीपूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन असे हे तीन दिवसांचे व्रत आहे. गणपती पक्का शाकाहारी त्यामुळे मातोश्रींना जरी मांसाहार चालत असला तरी तो मुलाच्या म्हणजे गणपतीच्या दृष्टीस पडू नये म्हणून गौरीला मांसाहाराचा नैवेद्य दाखविताना मध्ये पडदा धरण्याची प्रथा आहे. आपण देवावर आपल्या भावभावना लादतो, देवही आपल्यासारखाच आहे अशी समजूत बाळगतो. गणपतीसारखा त्रिखंडमान्य महान् ब्रह्मदेवता पुत्र असला तरी मातेला ‘तिखट’ खाण्याची इच्छा होते. ती इच्छा भक्तमंडळी पुरवितात आणि तरी पुरवीत असताना मातेचा आहार मुलाच्या नजरेला पडू नये म्हणून सावधगिरी बाळगतात.
गौरी पूजनाची प्रथा : 

हे गौरीपूजन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे केले जाते. त्यात विविधता कितीॽ गौरीचा चांदीचा वा पितळेचा मुखवटा असतो तो मुखवटा घालून गौरी सजवितात. नंतर ह्या गौरीला दागदागिने घालून नटविले जाते. काही ठिकाणी कागदावर गौरीचे चित्र काढून ते पूजतात. तर काही गावात नदीकाठचे पाच खडे आणून ते गौरी म्हणून पूजले जातात. तर कुठे मातीची लहान पाच मडकी आणून त्या मडक्यात हळद लावलेला दोरा, खारीक आणि खोबरे घालून त्या मडक्यांची उतरंड गौरी म्हणून पूजतात. काही लोकांत कुमारिका वासाची फुले येणाऱ्या लहान झाडाची मूठभर रोपे काढून आणतात, त्याच गौरी. घरातील प्रत्येक खोलीत ती कुमारिका ह्या गौरी घेऊन जाते.
घरातील पोक्त मालकीण तिला प्रत्येक खोलीत विचारते, गौरी गौरी कुठे आलातॽ तुम्हाला इथे काय दिसतेॽ मग ती कुमारिका ऐश्र्वर्यसूचक असे बोलते, अशी प्रथा आहे. कोकणात काही ठिकाणी तेरडयाची रोपे गौरी म्हणून गौरवितात. गौरी विसर्जनाचा दिवस म्हणजे ज्या दिवशी मूळनक्षत्र असेल त्या दिवशी गौरीचे विसर्जन केले जाते. बहुधा गणपती बाप्पा गौरीबरोबरच जातात. सार्वजनिक उत्सवाचा गणपती हा अनंत चतुर्दशीपर्यंत राहतो. घरोघरचे गणपती हे त्या त्या घरी चालणाऱ्या परंपरेनुसार दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस असे असतात. काही उत्साही लोक तर गणपती एकवीस दिवस वा बेचाळीस दिवसही ठेवतात. पण मग तो रोजचा पाहुणा झाला की नाही म्हटले तरी त्याच्याकडे थोडेफार दुर्लक्ष होतेच.
गौरी आणि गणपती जेव्हा एकाच वेळी घरात असतात तेंव्हा तो आनंद आगळावेगळाच आणि गौरीच्या आगमनाचे, पूजेचे, विसर्जनाचे असे तीनही दिवस धर्मशास्त्राने निश्चित करुन दिलेले असल्यामुळे गौरी मात्र ठरलेल्या दिवशी येतात आणि ठरलेल्याच दिवशी जातात. आज येते, उद्याचा दिवस राहते आणि तिसऱ्या दिवशी विसर्जनासाठी निघते. गणपती हा गोडाचा भोक्ता. त्याच्यासाठी गोडाचा नैवेद्य रोज करावा लागतो; पण रोज रोज गोड खाऊन मध्येच तिखट खाण्याची इच्छा झाली तर तीही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून गौरीच्या निमित्ताने भक्तमंडळींनी जशी काही आपलीच सोय करुन घेतली आहे. बाबा पद्मजींनी हिंदूचे सण आणि उत्सव याबद्दल लिहिताना गौरीचा उल्लेख ‘गणोबाची आई’ म्हणून केला आहे. ही गणोबाची आई महाराष्ट्राच्या सर्व सामाजिक स्तरात चांगलीच लोकप्रिय आहे. तिचे आपल्या मुलावर आणि मुलाच्या भक्तांवरही विशेष प्रेम आहे.
महत्वाच्या बातम्या : 
Gauri Pujan 2022 : आज गौरी पूजनाचा दिवस; गौराई पूजनाची कथा आणि पद्धत जाणून घ्या
4th September 2022 Important Events : 4 सप्टेंबर दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
Ishqiya Ganesh Temple : प्रेमींची इच्छा पूर्ण करणारा बाप्पा, जाणून घ्या इश्किया मंदिराबाबत खास गोष्टी
Skin Care : सुंदर, चमकदार त्वचेसाठी बिअरचा ‘असा’ करा वापर
3rd September 2022 Important Events : 3 सप्टेंबर दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
Mumbai Local Megablock : मध्य रेल्वेच्या प्रवाशांना गणपती पावला; तिन्ही मार्गांवर ब्लॉक नाही, पश्चिम रेल्वेवर मात्र मेगाब्लॉक
Ganeshotsav 2022 : आज पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन, प्रशासनाची जय्यत तयारी
अकोला राष्ट्रवादीतील नव्या वळणावर! मिटकरींवर आरोप केलेल्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांवर शिक्षिकेचे गंभीर आरोप
सिलेंडरवर पंतप्रधानांचा हसतमुख फोटो अन् तो संदेश; हैदराबादमधील व्हिडीओ व्हायरल- काय आहे प्रकरण?
Nandurbar Election : नंदुरबार जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा; 10 ग्रामपंचायती बिनविरोध 

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares