Parbhani : निसर्गाचा असा हा लहरीपणा, ओला नव्हे आता कोरडा दुष्काळ जाहिर करा, पावसाविना पिके कोमात – TV9 Marathi

Written by

| Edited By: राजेंद्र खराडे
Sep 05, 2022 | 9:23 PM
परभणी : निसर्गाचा लहरीपणा काय असतो ? याचा प्रत्यय यंदाच्या (Kharif Season) खरीप हंगामात शेतकऱ्यांना आलाय. हंगामाच्या सुरवातीला पावसाने ओढ दिल्याने खरीप पेरण्याच होतील की नाही, याबाबत साशंका निर्माण झाली होती. जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवली अन् अशी काय (Monsoon Rain)  पावसाला सुरवात झाली त्यामुळे जमिनीत गाढलेले बियाणे उगवणार की नाही अशी अवस्था होती. तर आता पिके फुल लागण्याच्या अवस्थेत असतानाच पुन्हा पावसाने ओढ दिली आहे. याचा परिणाम थेट उत्पादनावर होत असल्याने (Parbhani) परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वाळलेली पिके थेट जिल्हाधिकारी कार्यालयात फेकून देत कोरड्या दुष्काळाची मागणी केली आहे. हंगामाच्या सुरवातील ओला दुष्काळ जाहीर करा म्हणणाऱ्या शेतकऱ्यांवर आता कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्याची नामुष्की ओढावली आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत आहे. मध्यंतरी राज्य सरकारने मदतीची घोषणा केली मात्र, प्रत्यक्षात ही मदत रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेलीच नाही. तर आता वाढत्या उन्हामुळे पिके कपरली आहेत. प्रशासनाला पिकांची अवस्था लक्षात यावी म्हणून प्रहार जनशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी वाळलेली पिके थेट जिल्हाधिकारी कार्यालयात फेकून दिले आहेत.
पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील सर्वच पिकांवर याचा परिणाम झाला आहे. मराठवाड्यात सोयाबीन याच पिकावर शेतकऱ्यांचा भर राहिलेला आहे. परंतू, हंगामााच्या सुरवातीला अतिवृष्टी आणि आता पावसाने दिलेली ओढ याचा थेट परिणाम उत्पादनावर होत आहे. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद ही पिके पाण्याविना करपत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे पैसे आणि मेहनत दोन्ही पाण्यात अशी स्थिती आहे.
पेरणी होताच धो-धो बरसणारा पाऊस आता ऐन गरजेच्या वेळी गायब झाला आहे. पुन्हा निसर्गाचा लहरीपणा अनुभवयास मिळत असून कुठे कृपादृष्टी तर कुठे अवकृपा सुरु आहे. त्यामुळे पेरलेले उगवले, जोमात बहरलेही पण आता शेतकऱ्यांच्या पदरात पडणार की नाही. अशी स्थिती निर्माण झाली आहे.परभणी जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून पाऊस गायब झाला तर उन्हामध्ये वाढ आहे.
शेतकरी अडचणीत असताना प्रहार जनशक्ती ही त्याच्या पाठीशी कायम राहिलेली आहे. यंदा तर संपूर्ण हंगामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. अशातच सरकारकडून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत, हे प्रशासनाच्या निदर्शनास यावे म्हणून प्रहार जनशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी वाळलेली पिकेच जिल्हाधिकारी कार्यालयात आणून फेकली आहेत. आता प्रशासन काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे.
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares