जमिनीतील गुंतवणूक : आवश्यक दक्षतेचे घटक – Loksatta

Written by

Loksatta

आशुतोष बिश्नोई
भारतातील जमीन किंवा स्थावर मालमत्तेत पैसा टाकणे याला अनादी काळापासून गुंतवणूकदारांकडून पसंती मिळत आली आहे. किंबहुना, भारतात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जमिनीतील गुंतवणूक हा प्रत्येक व्यक्तीच्या संपत्तीचा एक भाग आहे. जेव्हा आपण जमिनीतील गुंतवणुकीबद्दल बोलतो तेव्हा देशातील बहुसंख्य लोकसंख्या जे शेतकरी म्हणून खेडय़ात राहतात त्यांना विसरता येणार नाही. आणि बाकीचे जे लोक शेती करत नाहीत ते सुद्धा कोणत्या ना कोणत्या प्रकारे शेतीशी निगडीत आहेत किंवा बहुतांशांचे पिढी – दोन पिढय़ांपूर्वीचे पूर्वज शेतकरीच होते.
आता, शहरी गुंतवणूकदारांसाठी जमीन खरेदी करण्यामागचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. विकसकाकडून जमिनीचा तुकडा अतिशयोक्तीपूर्ण किंवा विविध मुलामे व आवरणांसह ‘ब्रँड’ रूपात पेश केला जातो. जाहिरातबाजी आणि विशेषीकृत विपणन पद्धतीद्वारे तो खरेदीदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असतो. हा आजचा ट्रेंड आहे आणि त्यात आव्हाने आहेत तशा संधीही आहेत. गुंतवणूक म्हणून अशा जमीन खरेदीचा विचार सुरू असल्यास, पुढे जाण्यापूर्वी महत्त्वाच्या तीन घटकांना प्रत्येकाने विचारात घ्यायला हवे. याचा अर्थ तुम्ही जी जमीन खरेदी करणार आहात तिचे मूल्यमापन तीन मूलभूत बाबींवर केले पाहिजे. सुरक्षितता, तरलता आणि परतावा, असे हे तीन घटक आहेत. परंतु प्रथम, तुम्ही ते स्व-वापरासाठी किंवा गुंतवणूक म्हणून जमिनीचा तुकडा विकत घेत आहात हे ठरवावे लागेल. अन्यथा, सारीच गणिते चुकून, पश्चातापाची वेळ येऊ शकते.
सुरक्षितता : तुम्ही जी जमीन खरेदी करणार आहात ती विक्रेत्याच्या मालकीची असावी. याची नीट खातरजमा अत्यावश्यकच. तुम्ही स्व-वापरासाठी जमीन विकत घेण्याचा विचार करत असाल, तर ती कोणत्या परिसरात आहे, तेथील समुदाय कसा आहे, त्या क्षेत्राची सामुदायिक गतिशीलता समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.तरलता : जर तुम्ही गुंतवणुकीसाठी जमीन खरेदी करणार असाल तर तुम्ही तिच्या तरलतेचा विचार प्राधान्याने केला पाहिजे. कारण गुंतवणूक म्हटली तर अपेक्षित समयी त्यापासून नफावसुलीही व्हायला हवी. परंतु बहुतेक जमिनी अशा असतात, ज्या सहजी विकता येत नाहीत. म्हणजे तरलतेची समस्या भेडसावणे स्वाभाविक आहे. ज्यांना स्थावर मालमत्तेतील गुंतवणुकीतून झटपट आणि अतिशय जलद तरलता हवी आहे, त्यांनी मग रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (रिट्स) या म्युच्युअल फंडाच्या धर्तीवरील पर्यायामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करणे उचित ठरेल. हे रिट्स मूळात एखाद्या तज्ज्ञ मालमत्ता पोर्टफोलिओ व्यवस्थापकाद्वारे व्यवस्थापित केलेले फंडांसारखे कॉर्पस आहेत आणि त्यांचे युनिट्स भांडवली बाजारामध्ये सूचीबद्ध केले जात असल्याने सहजतेने विकता येऊ शकतात.
परतावा : जमिनीत गुंतवणूक केल्याने उत्तम परतावा मिळतो, असे सांगणारे अनेक लोक आढळतील. पण हे नेहमीच खरे नसते. इतकेच काय, आर्थिक गुंतवणुकीच्या तुलनेत भारतातील शेतजमिनीतून मिळणारे नगदी पिकाद्वारे घेतले गेलेले उत्तम उत्पादनही फारसे आकर्षक दिसत नाही. जर तुम्ही शेतकरी म्हणून जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमच्या योजनेचे अत्यंत काळजीपूर्वक मूल्यांकन करणे आवश्यक आहे. जमिनीतून परतावा मिळवण्याचा दुसरा प्रकार म्हणजे भाडे उत्पन्न होय. जर तुम्हाला एक नियमितपणे पैसे देणारा आणि प्रामाणिक भाडेकरू सापडला तर हा एक निश्चितच चांगला सौदा ठरू शकतो.
त्यामुळे तुमच्याकडे जाहिरातींच्या माध्यमातून आलेली ब्रँडरूपी जमिनीची ‘ऑफर’ स्वीकारायची की, वर चर्चिल्या गेलेल्या अन्य पर्यायांकडे तुम्ही वळावे, असा प्रश्न उपस्थित होतो. खरे तर तुम्ही स्वत:ला हा प्रश्न विचारला पाहिजे की – ब्रँडेड वस्तू (जमीन) खरेदी करण्यासाठी भरत असलेल्या अधिमूल्याच्या (प्रीमियम) बदल्यात मला काय मूल्य मिळेल? ही एक स्व-मूल्यांकनाची महत्त्वाची रीत आहे, जी तुमच्या प्रश्नांची उकलही करेल.
(लेखक वित्तीय सेवा क्षेत्रातील अनुभवी व्यावसायिक आणि गुंतवणूक विशेषज्ज्ञ)
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Investment land property investors brand advertising purchase amy

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares