मुँह में गणपती, बगल में राजकारण! – My Mahanagar

Written by

You subscribed MyMahanagar newsletter successfully.
Something went wrong. Please try again later.
बेरक्या राजकारण्यांनी या गणेशोत्सवाचा वापर करून विरोधकांविरोधात वातावरण निर्मितीचा कार्यक्रम सुरू केला. यासाठी काही गणेशोत्सव मंडळे राजकारण्यांनी हायजॅकही करून टाकली आहेत
स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय जनजागृतीसाठी सन १८९३ मध्ये लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. यानिमित्ताने लोक एकत्र येतील आणि होणार्‍या व्याख्यानमालांतून ब्रिटिशांविरोधातील असंतोष अधिकच उफाळून येईल ही या उत्सवामागील खरी संकल्पना होती. हा उद्देश चांगल्यापैकी सफल झाला. गणरायाची सेवा करताना देशसेवाही आपोआप होत होती. कालौघात या गणेशोत्सवाचे स्वरुप आमूलाग्र बदलले आहे. त्यात कमी म्हणून की काय, बेरक्या राजकारण्यांनी या गणेशोत्सवाचा वापर करून विरोधकांविरोधात वातावरण निर्मितीचा कार्यक्रम सुरू केला. यासाठी काही गणेशोत्सव मंडळे राजकारण्यांनी हायजॅकही करून टाकली आहेत.
यंदाच्या गणेशोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी महाराष्ट्रात राजकीय नीतीमूल्ये निलाजरेपणाने खुंटीला टांगून सत्तांतर नाट्य घडल्यानंतर एकूणच राजकारण ढवळून निघाले आहे. सत्तेशिवाय राजकारणी किती बेचैन असू शकतात ते यानिमित्ताने दिसून आले. गणेशोत्सव सुरू असल्याने राजकारणी मंडळी विविध ठिकाणच्या गणरायांच्या दर्शनाला निघालेले आहेत. यासाठी जनतेला वेठीला धरून बड्या नेत्यांना व्यवस्थितपणे गणपती दर्शन घडविले जात आहे. जनतेच्या पैशांचा चुराडा करून मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था त्यांच्यासाठी तैनात केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रातील दुसर्‍या क्रमांकाचे मंत्री अमित शहा मुंबईत आले होते. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी गणपतीचे दर्शन घेऊन राजकीय बैठकाही उरकून घेतल्या. गणेशोत्सवाचा विरोधकांना संपविण्यासाठी कसा चपखल वापर करायचा, हे शहा यांनी दाखवून दिले. इतर नेतेही सोयीप्रमाणे गणपती दर्शन करीत आहेत. आपल्याकडे ‘मूह में राम, बगलमें छुरी’ अशी म्हण प्रचलित आहे. राजकारण्यांचे देवदर्शन हे याच प्रकारचे नाही ना, असा कुणाला प्रश्न पडला असेल तर त्याला चुकीचे ठरवता येणार नाही.
राजकारणात हार-जीत असते. परंतु भाजपला हे मान्य नसावे असे वाटते. कारण हा पक्ष सत्तेत आल्यापासून काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांना संपविण्याचा चाललेला प्रयत्न म्हणजे ‘कुठे नेऊन ठेवलंय राजकारण?’ असा सवाल उपस्थित करणारा आहे. राजकारण हे खिलाडूवृत्तीने खेळायचे असते हे भाजपच्या प्रमुख नेत्यांना मान्यच नाही. म्हणूनच देशात काही ठिकाणी बहुमत विरोधकांना आणि सत्ता मात्र भाजपला असे विचित्र दृश्य दिसून आले. विरोधी आमदार फोडण्यासाठी पैशांच्या थैल्या रित्या केल्या जाऊ लागल्या. स्वार्थी आणि लबाड लोकप्रतिनिधी भाजपच्या जाळ्यात सहजपणे अडकले. महाराष्ट्रातही तीन महिन्यांपूर्वी गलिच्छ राजकारण झाले. सत्तालोलुपांमुळे अचानक दुसरी शिवसेना जन्माला आली. आेंगळवाण्या राजकारणाचा हा भाग म्हणता येईल. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात अनेक समस्या असताना सत्तेसाठी पछाडलेले नेते लाज सोडून राजकारणात रमल्याचे पाहून सर्वसामान्यांची तळपायाची आग मस्तकात जात आहे. महाराष्ट्रात विविध कालखंडात वेगवेगळ्या प्रकारचे राजकारण होत आले आहे. आता मात्र या राजकारणाने ‘हीन’ हा शब्दही फिका पडावा इतपत खालची पातळी गाठली आहे. राजकारणात कोण कुणाचे कायमचे शत्रू किंवा मित्र असू शकत नाहीत, असे म्हणतात आणि ते त्रिवार सत्य असले तरी विरोधकांना कायमचे नेस्तनाबूत करण्यासाठी खालच्या पातळीवरचे राजकारण करायचे म्हणजे कहरच झाला. महाराष्ट्रात ठाकरे गेले आणि शिंदे आले. परंतु हे सरकार अद्यापही स्थिरस्थावर झाल्यासारखे वाटत नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी आपली खुर्ची कशी शाबूत राहील, याची चिंता आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे, महागाईने सर्वसामान्य माणूस पिचला आहे, अशावेळी प्रशासन गतिमान होऊन काम करतेय असे कुठेही दिसत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वरिष्ठांच्या सरबराईत गुंतले आहेत.
त्यांच्यासह त्यांच्या सहकारी मंत्र्यांचे लक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे आहे. स्वाभाविक आगामी काळात घाऊक फोडाफोडीला ऊत येणार हे सांगायला कुणा राजकीय तज्ज्ञाची गरज नाही. वाट्टेल ते करा, पण सत्ता मिळवा, हा भाजपचा एक कलमी कार्यक्रम (की मंत्र?) असून, ‘शिवसेने’चे मुख्यमंत्री हा कार्यक्रम प्रामाणिकपणे राबविणार यात शंका असू नये. उत्सवांच्या निमित्ताने चालणारे राजकारण उबग आणणारे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे शासकीय काम बाजूला ठेवून केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्यासोबत फिरणार असतील तर महाराष्ट्रातील आगामी राजकारण कसे असेल, हे सहज लक्षात येईल. अर्थात पक्षवाढीचा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे. पण मंत्री लोकांची कामे करण्यापेक्षा तोडफोडीचे राजकारण करण्यात अधिक मग्न असल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत, त्यांनी राजकारणात जरूर मोठे व्हावे, सर्वांना त्यांचा अभिमान असेल. परंतु राजकारणासाठी आपल्या व्यक्तिमत्वाची पातळी खालावणार नाही, याची त्यांनी काळजी घ्यायला हवी.
राजकारणात खुशमस्करी केल्याशिवाय काही साध्य करता येत नाही. फार थोडेच राजकारणी आहेत जे कोणतीही भीडभाड न ठेवता रोखठोक बोलून मोकळे होतात. आपले नेते दुखावले जातील याचीही त्यांना पर्वा नसते. असे मोजके राजकारणीच कुठे तरी आशेचे किरण असतात. भाजपचे हेवीवेट नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यापैकी एक आहेत. या स्पष्ट बोलण्याची त्यांना शिक्षाही मिळते. सध्या त्यांचे राजकीय खच्चीकरण सुरू आहे की काय, असे वाटावे अशी परिस्थिती आहे. मी स्वतःचे कटाऊटस् लावत नाही किंवा कुणाला हार घालत नाही, या वाक्याची क्लिप फिरत आहे. हा टोला नेमका कुणाला हाणलाय हे उघड झाले नसले तरी जनतेने आपापल्यापरीने जो काय अर्थ लावायचा तो लावला आहे. त्यांचे वक्तव्य आणि पक्षातून त्यांची महत्वाच्या समित्यांवरून झालेली गच्छंती याचा संबंध नाकारता येत नाही. ते काहीही असले तरी बेछुट सुटलेल्या नेत्यांचे कान टोचणारा गडकरी यांच्यासारखा ‘सोनार’ हा प्रत्येक पक्षात असायलाच हवा. गडकरी यांच्याप्रमाणेच आणखी एका नेत्याने भाजपच्या नेत्यांना घरचा आहेर दिला आहे, किंबहुना भाजपचे राजकारण योग्य वाटत नाही हे सामान्य माणसाला वाटते त्यावर या नेत्याने शिक्कामोर्तब केले आहे. हा नेता म्हणजे पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट! राजकारणातील तत्वांना तिलांजली देण्याच्या भाजप नेत्यांच्या कार्यप्रणालीवरच त्यांनी बोट ठेवले आहे. त्यांनी सरसकट सर्वांना पक्षात प्रवेश देण्याच्या पद्धतीवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. सत्ता समीकरण जुळविताना कोणालाही प्रवेश दिला जातोय, ही भाजपच्या सच्चा कार्यकर्त्याची खदखद बापट यांनी बोलून दाखविण्याचे धाडस केले आहे. गडकरी यांच्याप्रमाणे तेही कदाचित उद्या पक्षात नावडते होतील. पण जाणीवपूर्वक भरकटवलेल्या राजकारणाला चेकमेट देण्यासाठी असे गडकरी, बापट भाजपतच नव्हे तर प्रत्येक पक्षात पाहिजेत.
ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी ‘माय महानगर’चे Android App डाऊनलोड करा

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares