Saamana: “हिंदुत्ववाद्यांच्या राज्यात फुलं फक्त मंत्र्यांसाठी, देव कोरडेच!”, सामनातून… – TV9 Marathi

Written by

|
Sep 02, 2022 | 7:11 AM
मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकावर टीका करण्यात आली आहे. सरकारच्या हिंदुत्वाच्या विचारावर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. “हिंदुत्ववाद्यांच्या राज्यात फुलं फक्त मंत्र्यांसाठी, देव कोरडेच!”, असं म्हणत सरकावर टीका करण्यात आली आहे.”साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र दिलाय हे खरे, पण घरातील चुलीच विझल्या, पोटातील आगडोंब उसळला तर फुलांच्याही ज्वाला होतील. शिर्डीतील वातावरण सध्या हेच सांगत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या डेप्युटींसह ‘अर्जंट’ दिल्लीस जावे व शिर्डीतील हार-फुलांसंदर्भात काय निर्णय घ्यावा यावर निकाल घेऊन यावे. तोपर्यंत साईबाबांनी भक्तांना शांत राहण्याची सुबुद्धी द्यावी. लोक भडकले, फुले पेटली तर संत साईबाबांवर ईडी आणि सीबीआय कारवाईचे आदेश दिले जातील. तेव्हा फुलांनो, कळ्यांनो, संतांनो शांत रहा! देवांनो गप्प बसा. फुले फक्त मंत्र्यांसाठी आहेत. या नव हिंदुत्ववाद्यांच्या (Hindutva) राज्यात देव कोरडेच राहणार आहेत!”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
आपल्या राज्यात सध्या हिंदुत्वाच्या नावाने बऱ्याच गमतीजमती सुरू आहेत व त्यावरून देव आणि संतांच्या दरबारात राडे केले जात आहेत. सर्वधर्मीय संत व श्रद्धेचे पीठ असलेल्या साईबाबांच्या शिर्डीतील हार, फुले, नारळ बंदी उठायला तयार नाही. भक्तांनी शिर्डीत हार, फुले, नारळ वगैरे न्यायचे नाहीत हा फतवा उठवायला महाराष्ट्रातील तोतया हिंदुत्ववाद्यांचे सरकार तयार नाही. कोरोना काळात मोदी सरकारच्याच आदेशाने मंदिरे बंद होती. देव बंदीवान होते. मंदिर बंदीचा फतवा पेंद्र सरकारचा, पण महाराष्ट्रातील भाजपवाले ‘ठाकरे’ सरकारविरोधात ‘घंटानाद आंदोलने करीत होते. मंदिरे उघडा म्हणून छाती पिटत होते; पण बाबांनो, ‘सब कुछ बंद’चा फतवा तुमच्याच मोदी सरकारचा होता ना? बरं, कोरोना निर्बंध शिथिल केल्यानंतर राज्यातील मंदिरे उघडल्यावरही प्रशासनाने संसर्ग नको या कारणास्तव हार, फुले, नारळ, प्रसाद वगैरे नेण्यावर बंदी कायम ठेवली होती. पुढे ती उठवली, पण शिर्डीतील साईबाबांना मात्र हार, फुले, प्रसादापासून आजतागायत वंचित ठेवले आहे. हा निर्णय म्हणे मंदिर प्रशासनाचा आहे. पण काय हो, हे मंदिर प्रशासन जामा मशिदीच्या इमामाने नेमले की रोमच्या मुख्य पोप साहेबांनी नेमले? त्या मंदिर प्रशासनाचे कर्तेधरते मंत्रालयातले शासनच आहे ना? की त्यासाठीही आपल्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली दरबारातून हार-फुले मंजुरीचा फतवा आणावा लागेल? एपंदरीत काय, तर साईंच्या दरबारात सगळाच खेळखंडोबा सुरू आहे. या नव हिंदुत्ववाद्यांना मंदिरातील हार-फुलांचे वावडे का बरे असावे? एका बाजूला नव हिंदुत्ववादी तोतयांचे सरकार दहीहंडी उत्साहात साजरी करा सांगते. गर्दीवर कोणतेही निर्बंध ठेवत नाही.
अगदी मुंबईसह राज्यात कोरोना, स्वाईन फ्लू अमाप वाढत असला तरी मुख्यमंत्री व त्यांचे डेप्युटी साहेब गर्दीतल्या राजकीय हंडय़ा पडत फिरत होते. आता सार्वजनिक गणेशोत्सव वगैरेही जोरात साजरे करा असे सांगितले गेले. ते चांगलेच झाले. म्हणजे संपूर्ण राज्यात कसली म्हणजे कसलीच बंदी नाही. मग फक्त शिर्डीतील साई दरबारात हार, फुले, नारळ वगैरेंच्या बंदीचे कारण काय? मुळात देव आणि संत काही ‘हार, फुले, नारळ, प्रसाद घेऊन या नाही तर मी तुम्हाला पावणार नाही,’ असे सांगत नाही. साईबाबा तर फकीरच होते. संत म्हणून तेच लोकांना देत होते. पाण्याचे दिवे पेटवून प्रकाश देणाऱ्या या संताच्या नावाने शिर्डी व आसपासच्या परिसरात हजारो लोकांच्या चुली आज पेटत आहेत. शिर्डीतील हार, फुले, नारळ, प्रसादाची दुकाने गोरगरीबांची आहेत. ती गेल्या दीड-दोन वर्षांपासून बंद आहेत. दुसरे म्हणजे शिर्डीतील या बंदीमुळे या पंचक्रोशीत गेल्या अनेक दशकांपासून फुलशेती करणारे छोटे शेतकरी, व्यावसायिक अडचणीत आहेत. त्यांच्या व्यवसायावरच या बंदीची कुरहाड पडली आहे. विक्रेते, शेतकरी, मजूर अशा लाखो लोकांच्या पोटापाण्याचा, रोजगाराचा प्रश्न शिर्डीच्या साई दरबाराशी जोडला गेला आहे व हे सर्व लोक गेल्या अनेक दिवसांपासून हार-फुलांवरील बंदी उठवा म्हणून आंदोलने करीत आहेत, उपोषणे करत आहेत. शिर्डी संस्थानच्या सुरक्षा रक्षकांच्या लाठया खात आहेत. शिर्डीचे दिगंबर कोते, कोपरगावचे संजय काळे यांनी या प्रश्नी लोक आंदोलन उभे केले, पण नव हिंदुत्ववादी शासनकर्ते गप्प आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात एकटया शिर्डीतील हार-फुलांवरच रोष का ? राज्यातील सगळाच शेतकरी श्रीमंत नाही. फुलशेती करणारे तसे गरीबच, पण सरकार गरीब फुलशेती करणाऱ्यांकडे ढुंकून पाहायला तयार नाही. नव्या सरकारचे मंत्री व इतर वतनदार सत्कारांत हार-फुले आणि तुरे स्वीकारत आहेत. स्वतःवर ट्रक ट्रक भरून फुले उधळून घेत आहेत, पण साईंच्या शिर्डी संस्थानात मात्र हार-फुले आणायची नाहीत असा जालीम फतवा कायम आहे.
श्रीमान राधाकृष्ण पाटील व त्यांचे खासदार चिरंजीव हे या भागातील वतनदार आहेत, पण हार-फुलांच्या प्रश्नी सरकार नावाचे मंदिर प्रशासन त्यांचेही ऐकत नसेल तर जळो ती तुमची वतनदारी! आता यासंबंधी निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. ही समिती अंतिम अहवाल देईल आणि मग शासनस्तरावर म्हणे योग्य निर्णय घेतला जाईल. शिर्डीतील साईबाबांना हार-फुले आणि नारळ वाहण्यास परवानगी देणे, हा एवढा गहन आणि किचकट प्रश्न आहे का? साईभक्तांच्या आणि स्थानिक गरीब जनतेच्या सहनशीलतेचा तुम्ही किती अंत पाहणार आहात? साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र दिलाय हे खरे, पण घरातील चुलीच विझल्या, पोटातील आगडोंब उसळला तर फुलांच्याही ज्वाला होतील. शिर्डीतील वातावरण सध्या हेच सांगत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या डेप्युटींसह ‘अर्जट’ दिल्लीस जावे व शिर्डीतील हार-फुलांसंदर्भात काय निर्णय घ्यावा यावर निकाल घेऊन यावे. तोपर्यंत साईबाबांनी भक्तांना शांत राहण्याची सुबुद्धी द्यावी. लोक भडकले, फुले पेटली तर संत साईबाबांवर ईडी आणि सीबीआय कारवाईचे आदेश दिले जातील. तेव्हा फुलांनो, कळ्यांनो, संतांनो शांत रहा! देवांनो गप्प बसा. फुले फक्त मंत्र्यांसाठी आहेत. या नव हिंदुत्ववाद्यांच्या राज्यात देव कोरडेच राहणार आहेत!
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares