''एमआयडीसी''ची आश्वासने विरली हवेत – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
आंबेठाण, ता. ७ : जमीन संपदनावेळी एमआयडीसीने स्थानिक शेतकरी आणि उद्योजक यांना दिलेली आश्वासने हवेत विरत आहे. जमीन संपादनानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न तर प्रलंबित आहेच पण ज्या उद्योजकांनी प्लॉट घेतले आहेत त्यांनाही विविध सुविधांची वानवा जाणवत आहे. त्यामुळे शेतकरी आणि गुंतवणूकदार यांना एमआयडीसीला ''क्या हुआ तेरा वादा'' असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.
चाकण भागात एमआयडीसीचे चार टप्पे झाले असून पाचवा टप्पा प्रस्तावित आहे. संपादनानंतर कित्येक वर्षे उलटली तरी मूळ जागमालकांचे आणि त्यांनंतर गुंतवणूकदार यांचे प्रश्न आजही तसेच आहेत. भूमिपुत्र शेतकऱ्यांना नोकऱ्या, शेतकऱ्यांचे परताव्याचे वाटप, काहींचे वादावादीत रखडलेले पेमेंट असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तर दुसरीकडे ज्यांनी एमआयडीसीत प्लॉट घेतले आहेत त्यांना सुविधांची वानवा जाणवत आहे. यात सुसज्ज रस्ते, कचऱ्याची समस्या, सांडपाणी व्यवस्था, अतिक्रमण अशा अनेक समस्यांना व्यावसायिकांना सामोरे जावे लागत आहे.
चाकण एमआयडीसीच्या टप्पा क्रमांक दोनमधील अंतर्गत रस्त्याची तर मोठी दुर्दशा झाली असून, अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहने अपघातग्रस्त होत आहेत. एमआयडीसी प्रशासनाने तात्काळ पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करून खड्डे भरावे, अशी मागणी उद्योजक आणि वाहनचालकांकडून केली जात आहे.
वराळे, भांबोलीत रस्त्याची दुरवस्था
चाकण औद्योगिक वसाहत टप्पा क्रमांक दोनमध्ये वराळे, भांबोली, सावरदरी, शिंदे, वासुली आणि खालूम्बरे या सहा गावांचा समावेश होतो. यापैकी वराळे, भांबोली, वासुली आणि शिंदे या भागात एमआयडीसीच्या रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. ६० मीटर आणि ७५ मीटर रुंदीचे रस्ते काही प्रमाणात सोडले तर अंतर्गत येणाऱ्या जवळपास सर्वच रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.तसेच अनेक ठिकाणी स्थानिक नागरिक आणि उद्योजक यांनी रस्ता क्रॉसिंग करण्यासाठी खोदाई केल्याने रस्ता मोठ्या प्रमाणात उखडला जात आहे.
खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात
बहुतांश ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्याने रस्त्याला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सतत पाणी साचू लागल्याने रस्ते उखडायला लागले आहेत. त्यामुळे खड्डे पडत असून त्यात पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. यात वाहनाचे नुकसान देखील होत आहे.यात दुचाकी किंवा पायी चालणाऱ्या नागरिकांचे आणि कामगारांचे मोठे हाल होत असून त्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
02305, 02306
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares