शिबिराला वीज ग्राहकांचा प्रतिसाद – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
48296
——–
शिबिराला वीज ग्राहकांचा प्रतिसाद
इचलकरंजीत समस्या निवारणासाठी ‘स्वाभिमानी’च्या पुढाकाराने आयोजन
इचलकरंजी, ता. ७ : महावितरणच्या गावभाग उपविभागात झालेल्या वीज ग्राहक समस्या निवारण शिबिराला वीज ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला. ग्राहकांनी घरगुती वीज मीटरपासून शेती पंपापर्यंत अनेक समस्या मांडत त्याची निवारण करण्याची मागणी केली. अशा विविध समस्यांची नोंद घेत याची अंमलबजावणी तत्काळ करणार असल्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांनी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने या समस्या निवारण शिबिराचे आयोजन केले होते.
२०१९ व २०२१ च्या महापुरामुळे घरगुती शेती पंपाचे बंद असलेली मीटर, प्रलंबित नवीन जोडण्या, चार महिन्यांपासून शेती पंपाचा विद्युतपुरवठा बंद, प्रलंबित सरासरी वीज बिले दुरुस्त करावीत यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कार्यकारी अभियंता श्री. राठी यांची भेट घेतली. मोठ्या प्रमाणात समस्या असल्याने यासाठी सुंदर बागेनजीक महावितरणच्या गावभाग उपविभागात शिबिर घेण्याचे ठरले. त्यानुसार वीज ग्राहकांच्या विविध समस्या महावितरणने ऐकून घेतल्या. पाण्यात बुडालेले मीटर दुरुस्त करणे, नवीन मीटर बसवून देणे, पावसाळ्यात मोटारी बंद राहू नये, सरासरी बिले तत्काळ दुरुस्त करावीत, वीजपुरवठा कायमस्वरूपी प्रवाहित ठेवावा, वेळोवेळी नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळावी, तक्रार नोंद झाल्यानंतर त्वरित दुरुस्ती करावी, शेतातील लोबंकळणाऱ्या तारा ओढून घ्याव्यात, वीज बिल घरपोच मिळावे, यासह विविध समस्यांचे गाऱ्हाणे महावितरणसमोर मांडले. याची दखल घेत या कामाची अंमलबजावणी त्वरित करण्याचे महावितरणने सांगितले. महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल पाटील, अभियंता विजय कोठावळे, अभियंता अमित कळसूर, स्वाभिमानीचे शहराध्यक्ष बसगोंडा बिरादार, आण्णासाहेब शहापुरे, सतीश मगदूम, अभिषेक पाटील, शिवाजी काळे आदी उपस्थित होते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares