हद्दवाढ विरोधी समिती – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
48998
शहरात सुविधा द्या; मग विचार करू
हद्दवाढ विरोधी समिती आक्रमक; प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा
कोल्हापूर, ता. ८ ः कोल्हापूरच्या हद्दवाढीला शंभर टक्के विरोध आहे, असे नाही; पण महापालिकेने प्रथम शहरात व्यवस्थित सुविधा द्याव्यात, त्यानंतर विचार करू. जी गावे प्रस्तावित आहेत त्यांचा कसा व किती कालावधीत विकास करणार याचा आराखडा बनवा. शासकीय अधिकाऱ्यांची त्रिसदस्यीय समिती नेमून गावांना तो समजून सांगावा, असे महापालिका हद्दवाढविरोधी सर्वपक्षीय कृती समितीने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना आज सांगितले. हद्दवाढ कृती समितीकडून सेवांबाबतची अरेरावीची भाषा योग्य नसून हद्दवाढीसाठी योग्य प्रक्रिया राबवली नाही तर सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल, असा इशारा दिला.
हद्दवाढीवरून प्रस्तावित गावातील आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थांनी निमंत्रक राजू माने यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकांना निवेदन दिले.
वडणगेचे सरपंच सचिन चौगुले म्हणाले, ‘‘गावांत सुविधा लवकर मिळतात. महापालिकेचा पाणी दर परवडणारा नाही. शेती जर पिवळ्या पट्ट्यात गेली तर शेतकरी उद्‌ध्‍वस्त होईल. कोणतीही सुविधा मोफत देत नाही. सेवा बंद करा, शहरात येऊ देणार नाही, ही अरेरावीची भाषा बरोबर नाही. आम्हालाही दूध, भाजीपाला पुरवठा बंद करता येणार नाही. चुकीचे मुद्दे उपस्थित करून हद्दवाढ समिती ग्रामीण, शहरी जनतेत भांडणे लावत आहे.’’
नारायण पोवार म्हणाले, ‘‘तीन शासकीय अधिकाऱ्यांची समिती गावांत पाठवून विकासाचे मुद्दे पटवून द्या. त्यानंतर गाव निर्णय घेईल. रेडझोनमध्ये बांधकामे केली जात आहेत. तुम्ही शहरात चांगले करा, आपोआपच ग्रामीण भाग आकर्षित होऊन शहरात येतील.
राजू माने म्हणाले, ‘‘हद्दवाढीने विकास होणार आहे, हे पटवून द्या. ४२ गावांत १३०० एकर खुली जागा आहे. पिकाऊ शेती आहे. महापालिकेची आरक्षण टाकण्याची ख्याती असल्याने ग्रामस्थांना भीती आहे. पुणे महापालिकेने क्षेत्राच्या पाच किलोमीटर अंतरावर सुविधा दिल्या, त्यामुळे ती महापालिकेत आली.’’
प्रशासक डॉ. बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, नगररचनाचे सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन यांनी महापालिका सुविधांसाठी ग्रामीण, शहरी भेदभाव करत नाही असे सांगितले. सूचनांचा विचार करू असे सांगितले.
या वेळी मधुकर जांभळे, बी. ए. पाटील, प्रकाश टोपकर, बबन शिंदे, कृष्णा धोत्रे, उदय जाधव, भगवान पाटील, संभाजी पोवार आदी उपस्थित होते.
पंचगंगा गटारगंगा बनवायची का?
जयंती व दुधाळी नाला पंचगंगेत थेट मिसळतो. त्यामुळे दोन्ही काठावर शहर वाढवून नाले मिसळू लागले तर मोठी समस्या निर्माण होईल. पंचगंगा नदीला गटारगंगा बनवायची आहे का, असा प्रश्‍न सचिन चौगुले यांनी उपस्थित केला.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares