Video Valuable Companies List : यवतमाळच्या शेतकरी पुत्राची कमाल, ग्रामहित फोर्ब्सच्या 100 गुणवंत कंपन्यांच्या यादीत – TV9 Marathi

Written by

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल
Sep 04, 2022 | 3:26 PM
यवतमाळ : जिल्ह्यातील वरुड तुका राहणाऱ्या शेतकरी पुत्राची कंपनी फोर्ब्सतर्फे जाहीर 100 गुणवंत कंपनीच्या यादीत (Companies List) आली. ग्रामहित (Gramhit ) ही शेतमालाच्या बाजारपेठेतील उतार-चढावात शेतकऱ्यांना सुरक्षितता मिळवून देते. आता ही ग्रामहित कंपनी फोर्ब्सद्वारे आशिया खंडातील नामांकित अग्रगण्य सामाजिक उद्योजकता क्रमवारीत निवडली गेली आहे. जगातील गुंतागुंतीच्या समस्या नावीन्यपूर्ण रीतीने सोडवण्याच्या उद्देशाने वस्तू अथवा सेवा पुरवितात, अशी ही स्टार्ट अप कंपनी आहे. फोर्ब्सचे (Forbes) यादीत स्थान मिळवणे ही अतिशय अवघड प्रक्रिया असते. फोर्ब्स अशा कंपन्यांची कामगिरी या निवडीच्या निमित्याने जगासमोर मांडून नव्या सामाजिक उद्योजकांना प्रोत्साहन देते. यंदा या निवड प्रक्रियेत 650 कंपन्यांनी आपला सहभाग नोंदवला होता.
पंकज महल्ले, श्वेता ठाकरे ( महल्ले) हे उच्च शिक्षित शेतकरी जोडपे ग्रामहितचे संस्थापक संचालक आहेत. कंपनी शेतकऱ्यांना शेतमाल साठवून विक्री करण्याची शास्त्रोक्त व आधुनिक पद्धत उपलब्ध करून देते. शेतमाल विक्री सगळीकडेच एका अनिष्ट चक्रव्यूहात अडकलेली आहे. पिककाढणी हंगामात एकाच वेळी बहुतेक शेतकरी आपला माल विविध कारणांनी विक्रीला आणतात. स्वाभाविकच व्यापारी वर्ग दर पाडतो. देणेकऱ्यांच्या दबावामुळे व्यवहार मोकळे करण्यासाठी शेतकरी मिळेल, त्या भावात माल विकून मोकळा होतो. असे होऊ नये यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. पहिली म्हणजे, माल साठवणुकीची उत्तम, शास्त्रीय व्यवस्था. दुसरी म्हणजे साठवून ठेवलेला शेतमाल तारण ठेवून सुलभ व कमीत कमी व्याजदरात कर्जाची उपलब्धता. शेतकऱ्याला माल विकायचा असल्यास घरूनच मोबाईलचे क्लिकवर विक्री व्यवहार पूर्ण करताना तारण कर्ज परस्पर वळते करून घेतले जाते. वारंवार बाजारपेठेत जाण्याची शेतकऱ्याला गरज पडत नाही. या दोन्ही तिन्ही बाबी शेतकऱ्याच्या गावात, परिसरात उपलब्ध असतील तर ते अधिकच चांगले ठरते.
ग्रामहित नेमकी हीच व्यवस्था शेतकऱ्यांना उपलब्ध करून देते. आजवर यवतमाळ व अकोला जिल्ह्यातील सुमारे तीन हजार शेतकरी कुटुंबानी ग्रामहितचे सहकार्याने या पद्धतीचा लाभ घेतला आहे. अशी माहिती शेतकरी महिला सुरेखा नेवारे यांनी दिली. पंकज यांनी स्थानिक सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालयातून आपले पदवी पातळीवरील ( BSW) शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शेतीचे क्षेत्रात काम करण्याचा अनुभव घेऊन मग टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबईमधून समाजकार्याची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. काही वर्ष टाटाच्याच csr प्रकल्पात मोठ्या पगारावर काम केले. श्वेताने अभियांत्रिकी पदवीनंतर आयआयटी हैद्राबाद येथून पदव्युत्तर पदवी संपादन केली. मात्र शेती नि शेतकऱ्यांची ओढ दोघांनाही गावाकडे घेऊन आली. त्यातूनच ग्रामहितचा शेतकरी हिताचा प्रवास सुरू झाला.

Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares