आमचा पक्ष दिल्लीपुढे कधीही झुकणार नाही; शरद पवार रोखठोक बोलले – MSN

Written by

वृत्तसंस्था, नवी दिल्ली:
‘दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना आमचा पक्ष कधीही शरण जाणार नाही,’ असे सांगतानाच, ‘भाजपला केंद्रातून सत्ताच्युत करण्यासाठी सर्व बिगरभाजप पक्षांनी एकत्र यावे,’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी येथे केले. तालकटोरा स्टेडियममध्ये झालेल्या पक्षाच्या आठव्या राष्ट्रीय संमेलनात ते बोलत होते. महागाई, बेरोजगारी, शेतकरी आंदोलन हाताळण्याची पद्धत आदी मुद्द्यांवरून त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.
‘सीबीआय, ईडी यांसारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या मोदी सरकारचा आपण लोकशाहीच्या मार्गाने विरोध करायला पाहिजे. आपण एका मोठ्या लढ्यासाठी सिद्ध होण्याची गरज आहे,’ असे ते कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले. ‘ही तीच जागा आहे जेथे बाजीराव पेशव्यांनी १७३७मध्ये तळ ठोकला होता व दिल्लीच्या सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले होते,’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
‘इतरांच्या तुलनेत आमचा पक्ष लहान असेल, परंतु पवार यांच्याप्रति देशभरात आदर आहे,’ असे प्रतिपादन प्रफुल्ल पटेल यांनी केले. या कार्यक्रमात छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, फौजिया खान यांचीही भाषणे झाली.
अजित पवार गेले कुठे?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणाने या संमेलनाचा समारोप झाला. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार त्यांच्या भाषणापूर्वी अजित पवार यांचे भाषण होणार होते. त्यानुसार अजित पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. परंतु, त्या वेळी ते तेथे उपस्थित नव्हते. यामुळे उपस्थितांमध्ये संभ्रम निर्माण झाला. अखेर शरद पवार यांच्या भाषणाने हे संमेलन संपले. दरम्यान, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील अधिवेशन नव्हते. हे राष्ट्रीय अधिवेशन होते. त्यामुळे मी भाषण केले नाही. जे काही बोलायचे ते मी महाराष्ट्रात बोलेन,’ असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares