नेत्यांना निवडणुकीची, उत्पादकांना गळीताची चिंता – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
नेत्यांना निवडणुकीची, उत्पादकांना गळिताची चिंता
गोडसाखर कारखाना; तालुक्यातील कामगारांसह शेतकरी पडले संभ्रमात
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : यंदाचा ऊस गळीत हंगाम जवळ येईल तशी आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या उत्पादक आणि कामगारांच्या मनात हंगामाची काळजी वाढत आहे. दुसऱ्या बाजूला तालुक्यातील नेत्यांना सप्टेंबरनंतरच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. यामुळे गळीत हंगामाबाबतच्या अडचणी आणि नियोजनसंदर्भात प्रशासकांशी चर्चा करावी, असे नेत्यांना वाटत नसल्याचे चित्र सध्याचे आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख आर्थिक केंद्र असलेल्या गोडसाखरेच्या जीवावर राजकीय पोळी भाजून घेणाऱ्यांना कारखान्याच्या चिंतेऐवजी राजकारणातच अधिक रस असल्याचे दिसत आहे. आगामी हंगाम सुरू करण्यासाठी मशिनरींचे ओव्हर ऑईलिंग, दुरुस्तीची कामे आता सुरु होणे अपेक्षित होते. मुळात गोडसाखरची मशिनरी जुनी आहे. बॉयलरची शाश्‍वत उपाययोजना गरजेची आहे. या सर्व कामाला बराच कालावधी लागणार आहे. यामुळे कारखान्याच्या प्रशासकांना याबाबतचे नियोजन विचारण्याचा साधा प्रयत्नही होताना दिसत नाही. हे चित्र एकीकडे असताना तालुक्यातील पुढाऱ्यांना मात्र सप्टेंबरनंतरच्या निवडणुकीची चिंता लागल्याची परिस्थिती आहे.
तालुक्यातील सुमारे सात ते आठ लाख टन ऊस गाळपाचे नियोजन कसे करणार, याचे उत्तर सध्या तरी कोणाकडेच नाही. हक्काचा गोडसाखर सुरू झाल्यास अनेक प्रश्‍नांची उकल होण्यास मदत होणार आहे. गतवर्षी उत्पादकांनी आपापल्या जीवावर कसाबसा ऊस घालविला. त्यासाठी खिशाला चाट बसण्यासह मानसिक तणावालाही सामोरे जावे लागले. यंदाची परिस्थिती काय असेल, याचा अंदाज नाही. आजूबाजूचे कारखाने सुरू असले तरी ऊस घालवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कसरतीच्या टेन्शनने शेतकरी खचत आहे. हक्काचा कारखाना सोडून दुसरीकडे ऊस पाठविताना कोणाकोणाला साष्टांग दंडवत घालायचा, या चिंतेत शेतकरी आतापासूनच आहेत. कामगारांच्या वेतनाचा प्रश्‍न गंभीर आहे. वर्षभर ते पगाराविना काम करीत आहेत. निवृत्त कामगारांच्या देणींचा विषय प्रलंबित आहे. त्यांचा प्रश्‍नही वाऱ्यावरच आहे. या साऱ्या‍ गंभीर समस्या आवासून उभे असताना गोडसाखरेच्या भविष्याबाबत राजकीय पटलावरील ‘शांतता’ पाहून शेतकरी आणि कामगारांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
चौकट…
राजकीय पाठबळ हवे
प्रशासक आपल्यापरीने कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्नशील दिसताहेत. परंतु शासकीय अधिकारी म्हणून एका चौकटीत राहून पाठपुरावा करावा लागत असल्याने त्यांना काही अडचणी आणि मर्यादाही येत आहेत. यामुळे आता राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाच्या नेत्यांचे पाठबळ महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे. मंत्री समितीने तातडीने गोडसाखर चालविण्यासाठीचा निर्णय दिल्यास यंदाचा हंगाम सुरू होण्याच्या आशा आहेत. त्यासाठी संबंधित सत्तारुढ पक्षाचे, किंबहुना सर्वपक्षीय नेत्यांनी एकजुटीने आमच्या वेदना लक्षात घेऊन प्रयत्न करावेत इतकी माफक अपेक्षा उत्पादक व कामगारांची आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares