केंद्र सरकारने तांदूळ निर्यातीवरील बंदी तातडीने मागे घ्यावी: किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांची… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
केंद्र सरकारने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी लागू केली असून बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर 20 टक्के निर्यातकर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे तांदूळ उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय होणार असल्याने केंद्र सरकारने तांदूळ निर्यातबंदी तातडीने उठवावी, अशी मागणी किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सोमवारी (12 सप्टेंबर) केली आहे.
शेतकऱ्यांना शेतीमालाला दोन पैसे मिळायला लागताच यापूर्वीची सरकारे निर्यातबंदी लागू करून शेतीमालाचे भाव पाडायचे. भाजप सरकार असे करणारा नाही, उलट हे सरकार शेतकऱ्यांच्या हातातील बेड्या तोडेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र कांदा, गहू आणि आता तांदळावर निर्यातबंदी लागू करून केंद्र सरकारने आपल्या कथनी आणि करणीत अंतर असल्याचे सिद्ध केले आहे.
खरिपात भात उत्पादन घटण्याचा अंदाज असून, घाऊक आणि किरकोळ बाजारात तांदळाचे दर वाढले असल्याने व पशुखाद्य आणि इथेनॉल मिश्रणासाठी तांदळाची उपलब्धता घटली असल्याने निर्यातबंदी लागू केल्याचा लटका युक्तिवाद केंद्र सरकारकडून केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र देशांतर्गत तांदळाची उपलब्धता पाहता निर्यातबंदी लागू करण्याची आवश्यकता नाही.
यंदा खरिपात भाताचे क्षेत्र घटल्यामुळे उत्पादनात केवळ 60 ते 70 लाख टन घट येणार आहे. देशांतर्गत तांदळाच्या एकूण उत्पादनाच्या तुलनेत ही घट केवळ 4.5 ते 5 टक्के इतकीच आहे. देशात गेल्या वर्षी 2021-22 मध्ये विक्रमी 1302.9 लाख टन भात उत्पादन झाले होते. त्याआधीच्या वर्षी 1243.7 लाख टन भात उत्पादन झाले होते. तांदूळ उत्पादनाची ही आकडेवारी पहाता तांदळावर निर्यातबंदी लागू करण्याची आवश्यकता नाही.
यंदा उत्पादनात काहीशी घट अपेक्षित असली तरीही देशात तांदळाचा अतिरिक्त साठा उपलब्ध आहे. बफरस्टॉकसाठी देशाला 135 लाख टन तांदूळ लागतो. प्रत्यक्षात अन्नमहामंडळाकडे 470 लाख टन तांदूळ साठा उपलब्ध आहे. म्हणजे गरजेपेक्षा 335 लाख टन अधिक तांदूळ उपलब्ध आहे.
देशात गेल्या वर्षी विक्रमी भात उत्पादन झालेले असतानाही अन्नमहामंडळाकडे 662 लाख टन तांदूळ साठा उपलब्ध होता. यंदा 4.5 ते 5 टक्के उत्पादन घटण्याची शक्यता असताना 470 लाख टन बफरस्टॉक अन्नमहामंडळाकडे उपलब्ध आहे. असे असताना, केंद्र सरकार तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्न किसान सभेने केला.
अन्यथा आंदोलन करणार
तांदळाचे भाव पाडून कॉर्पोरेट कंपन्यांना नफा कमविता यावा यासाठीच केंद्र सरकारने रात्रीतून घुमजाव करत तांदूळ निर्यातबंदीचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने हा शेतकरी विरोधी निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा तांदूळ उत्पादक रस्त्यावर उतरतील, असा इशारा किसान सभेचे डॉ. अजित नवले, डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares