मंडणगड ः चित्रा नक्षत्रात फुललेला निसर्ग चित्रमय – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
Rat13p5.jpg ःOP22L49784 मंडणगड ः शेतीच्या संरक्षणाकरिता बांधण्यात आलेले रंगीबेरंगी साड्यांचे कुंपण, बुजगावणे आणि फुललेला निसर्ग चित्रमय दिसत आहे. (सचिन माळी ः सकाळ छायाचित्रसेवा)
चित्रा नक्षत्रात फुललेला निसर्ग चित्रमय
मंडणगड तालुका; रंगीबेरंगी साड्यांचे शेतीला कुंपण, बुजगावणी
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १३ ः चित्रा नक्षत्रात तालुक्यातील निसर्ग फुलोऱ्यावर आला असून, सर्वत्र रंगीबेरंगी फुलांचे ताटवे लक्ष वेधून घेत आहेत. शेतीला वन्यजीवांची प्रमुख समस्या शेतकऱ्यांना भेडसावताना दिसत आहे. यावर उपाय म्हणून घरातील जुन्या साड्या वापरून शेतीला तटबंदी करत अटकाव केला आहे. शेतात बुजगावणी उभी करून मनुष्याचा भास निर्माण केला आहे. निसर्गाच्या हिरव्या रंगात हे रंगीबेरंगी कुंपण लक्ष वेधून घेत आहे. हे सर्व दृश्य एखाद्या चित्रसारखे दिसते आहे.
रानडुक्कर, मोकाट जनावरे आणि केलटी, वानरांमुळे शेतीतील पिकांचे नुकसान होत आहे. रोपं ओरबाडून खात असल्याने खाण्यापेक्षा अधिक नुकसानच जास्त करत आहेत. शेतातील हिरवे पीक वन्यप्राण्यांच्या नजरेला पडू नये यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत. शेती वाचवण्यासाठी ठिकठिकाणी साड्यांचे व कापडाचे कुंपण तयार करून तटबंदी करत शेती वाचवण्याची धडपड शेतकरी करताना दिसत आहेत.
तालुक्यात सध्या भात, नाचणी पालेभाज्यांचे उत्पादन सुरू आहे. वांगी, लाल माठ, भेंडी, पावटा, पालक, मुळा, पडवळ, हिरवी मिरची, केळी, कलिंगड याचे उत्पादन घेण्याचा प्रयोग शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवला आहे. वन्यजीवांपासून होणारे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी गोठे, बंदरवाडी, बोरखत, नायणे, वडवली, कोन्हवली, देव्हारे, कुडुक बुद्रुक, उमरोली, पाले, तुळशी, चिंचघर, वेळाससह तालुक्यातील पाणथळ खलाटी परिसरात जंगली जनावरांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होतो.
या भागातील शेतकऱ्यांनी जुन्या साड्यांचा वापर करण्यास सुरवात केली आहे. या भागात शेताच्या बांधावर बांधलेल्या रंगीबेरंगी साड्या लक्ष वेधून घेत आहेत. शेतातील पिकाचे संरक्षण करण्यासाठी पडद्याची तटबंदी उभी करून वन्यप्राण्यांना चकवा देण्याचा प्रयत्न या कल्पनेतून केला जात आहे. मात्र, तरीही वानर प्रजाती या तटबंदीला सहज भेदतानाचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान अजूनही होतच आहे. आधीच तालुक्यातील पडीक क्षेत्र वाढत आहे, त्यात ही समस्या वाढू लागल्याने शेतकरी नाउमेद झाले आहेत.
कोट
रंगीबेरंगी साड्यांचे कुंपण पाहून जमिनीवर वावरणारे जंगली श्वापदे आपला मार्ग बदलतात; मात्र वानरांवर त्याचा फारसा प्रभाव होत नाही. शेती करण्याच्या कमी प्रमाणामुळे एकाच शेतकऱ्याचे नुकसान होते; मात्र या साडी कुंपणामुळे होणारे नुकसान कमी होण्यास मदत होते.
– नथुराम कळवणकर, शेतकरी.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares