लोकाभिमुख धर्मगुरू – MSN

Written by

लोकाभिमुख धर्मगुरू
लोकाभिमुख शंकराचार्यज्योतिष आणि द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती (वय ९९) यांच्या निधनाने एका लोकाभिमुख धर्मगुरूचा जीवनप्रवास थांबला. धर्माची शिकवण देतानाच समाजातील सद्यस्थितीकडे पाठ न फिरविता स्पष्टपणे व्यक्त होणे, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. धर्मप्रसार, धर्माचरण, नैतिकता आणि संस्कार यांची कास धरण्याचा आग्रह त्यांनी सतत केला. त्यासाठी अखंड प्रवासही केला आणि नागरिकांमध्ये मिसळून त्यांच्याशी संवादही साधला. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील रिगरोही येथील. मूळ नाव पोथीराम उपाध्याय.
नवव्या वर्षी त्यांनी घर सोडून ईश्वराचा शोध सुरू केला. काशीमध्ये स्वामी करपात्री महाराज यांच्याकडे त्यांनी वेदशास्त्राचे अध्ययन केले. याच काळात ते स्वातंत्र्यलढ्यात उतरले. १९४२च्या ‘छोडो भारत’ आंदोलनात त्यांनी तुरुंगवास भोगला. ‘रामराज्य परिषद’ या राजकीय पक्षाचे अध्यक्षपदही भूषविले. स्वातंत्र्यानंतर ते पुन्हा आध्यात्मिक जीवनाकडे वळले. शारदापीठाचे शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंद यांनी त्यांना दंडसंन्यास देऊन ‘स्वामी स्वरूपानंद सरस्वती’ असे त्यांचे नामकरण केले. पुढे १९८१मध्ये ते द्वारका पीठाच्या शंकराचार्यपदी विराजमान झाले. अन्य धर्मगुरूंप्रमाणे राजकीय-सामाजिक बाबींवर त्यांनी भाष्य करणे टाळले नाही. ते विविध विषयांवर व्यक्त होत.
गंगा नदीचे प्रदूषण, समान नागरी कायदा, जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७०, नोटाबंदी, शेतकरी आंदोलन अशा मुद्द्यांवर त्यांनी भूमिका घेतली. शनी शिंगणापूर येथे महिलांनी दर्शन घेऊ नये, तसेच साईबाबांची पूजा करणे धर्माविरूद्ध आहे, अशा काही विधानांमुळे ते वादाच्या भोवऱ्यातही सापडले. दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी बाबरी मशिदीच्या पतनानंतर स्थापन केलेल्या रामालय ट्रस्टमधील २५ धर्माचार्यांमध्ये त्यांचाही समावेश होता. रामजन्मभूमी आंदोलनातही ते सहभागी झाले; तथापि, त्यांनी विश्व हिंदू परिषदेला कायमच विरोध केला. त्यामुळे त्यांच्यावर ‘काँग्रेसी’ म्हणून टीकाही झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर त्यांनी टीका केली; तशीच टीका त्यांनी राहुल गांधी यांच्यावरही केली. ज्ञानसंपदेने लोकादरास प्राप्त झालेल्या आचार्यांना श्रद्धांजली.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares