वाचायलाच हवीत : गौरीच्या गावाची वाट – Loksatta

Written by

Loksatta

डॉ.वंदना बोकील-कुलकर्णी
‘स्त्रीचं स्वातंत्र्य कशात आहे हे तिला तरी नेमकं कळलंय का?’ असा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो. ‘मोकळंढाकळं वागणारी आणि पुरुषांची बरोबरी करणारी स्त्री म्हणजे स्वतंत्र’ अशीही एक रूढ प्रतिमा तयार करण्यात आली आहे; पण स्त्रीचं स्वातंत्र्य आणि व्यक्तिवाद या संकल्पनांना असलेले अनेक पैलू उलगडून दाखवले ते लेखिका गौरी देशपांडे यांनी. तेही या संकल्पना स्त्रीसाठी नाहीतच असा समज ठाम असल्याच्या काळात. आपल्या आत डोकावून पाहायला, माणूस म्हणून स्वत:ला तपासायला भाग पाडणारी गौरी यांची ‘एकेक पान गळावया’ आणि ‘आहे हे असं आहे’ ही पुस्तकं म्हणूनच वाचायलाच हवीत अशी..
तसं पुष्कळच लिहिलेय गौरीनं; पण तिच्या गावाची वाट दाखवणारी दोन पुस्तकं महत्त्वाची. माझ्या मते, प्रत्येक सुजाण वाचकाच्या घरात असायलाच हवीत ती गौरी देशपांडे यांची दोन पुस्तकं म्हणजे, ‘मौज प्रकाशन’ने काढलेला १९८० मधला ‘एकेक पान गळावया’ हा तीन लघुकादंबऱ्यांचा संग्रह आणि ‘आहे हे असं आहे’ हा २४ लघुकथांचा संग्रह. या कथा १९६८ पासून प्रसिद्ध होत गेलेल्या. मात्र त्यांचा एकत्रित संग्रह प्रकाशित झाला १९८६ मध्ये. पुलंनी कुसुमाग्रजांच्या ‘विशाखा’ या कवितासंग्रहाबद्दल म्हटलं की, ‘आमचं तारुण्य जन्माला आलं ते कुसुमाग्रजांनी साहित्यावकाशात सोडलेल्या ‘विशाखा’ नामक नक्षत्रावर.’ तसं माझ्या मते, ६० च्या दशकात जन्माला आलेली पिढी कृतज्ञतेनं म्हणते की, ‘आमचं तारुण्य गौरी देशपांडेच्या ‘एकेक पान गळावया’ने सजग बनवलं.’(इथे गौरी देशपांडे यांचा एकेरी उल्लेख तिच्या प्रेमाखातर)
‘एकेक पान गळावया’च्या आधी ‘सत्यकथा’, ‘स्त्री’मधून गौरीच्या काही लघुकथा वाचल्या होत्या; पण खळबळ निर्माण केली ती ‘एकेक पान’नं. काय असं आहे त्यात की आजही ती खळबळ आठवली की रोमांच उभे राहतात.. गौरी भेटेतो जे बरंच काही वाचलं होतं त्यामुळे वाचक म्हणून एक प्रकारे काहीसं ‘कंडिशिनग’ झालं होतं. लेखिकांच्या लेखनात तर काही महत्त्वाचे अपवाद सोडले तर भावनांचे लोटच्या लोट! अगदी गटांगळय़ा खाव्यात इतके. साहित्यात रूढ झालेल्या अनेक प्रथा नाकारल्या गौरीनं. उंच-सडसडीत, लांबलांब बोटांचा, अनाग्रही, अबोल, पण अधूनमधून उपरोधिक बोलणारा पुरुष आणि असुंदर नायिका भेटली ती तिच्या या पुस्तकांत. किडक्या दातांची, हडकुळी, चष्मा लावणारी (हो, एके काळी चष्मा असणाऱ्या मुलींची स्थळं नाकारली जात.) अशा वर्णनाची आणि तरी लोक- विशेषत: पुरुष- वळून वळून आपल्याकडे का पाहतात, हा प्रश्न पडलेली. कारण तिचं खरं सौंदर्य आहे तिच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वात. तिच्या ‘कारावासातून पत्रे’मधला अकबर नायिकेला म्हणतो, ‘कमाल की लडकी हो आप, और एक मर्द जैसी स्वतंत्रता.’ ही ‘पुरुषासारखी’ स्वतंत्र, जगभर फिरणारी, नोकरी करणारी, मुलीची आई असणारी (मुलग्याची नव्हे!), पण रूढ आईपणा न करणारी. खरं तर कुठलाच रूढपणा न करणारी, फटकळ, बुद्धिमान, स्वत:चे निर्णय स्वत:च घेणारी, प्रचंड उत्कट आणि संवेदनशील अशी नायिका त्यापूर्वी फार दिसली नव्हती. ही अशी ‘जोडा’ घालणारी दमदार बाई त्या काळी मुळीच पचली नाही. अजूनही सरसकट पचते असं नाही. (पण तरी ‘एकेक..’ची ११वी आवृत्ती आणि ‘आहे हे’ची सातवी चालू आहेत.) ‘कारावासातून पत्रे’ ही ‘एकेक पान..’मधली पहिली लघुकादंबरी. स्वातंत्र्य हे मूल्य गौरीला किती महत्त्वाचं वाटत होतं, त्याचं प्रखर दर्शन म्हणजे ही कादंबरी. पत्राच्या स्वरूपात लिहिलेली. पुन्हा ही सर्व पत्रं नायिकेनं परदेशी गेलेल्या ‘मनू’ला लिहिलेली. कोणत्या कारावासात आहे ही नायिका? तर तो कारावास आहे अनेक रूढ समजुतींचा. माणसाचं स्वातंत्र्य हिरावून घेणारी अवलंबून राहण्याची वृत्ती, हा एक कारावास. सारखा कोणाचा तरी खांदा रडायला लागणं हाही कारावासच. सहसा ही कारागृहं कुणाला दिसतच नाहीत. ज्याला दिसतात, काचतात तो त्यातून बाहेर पडण्याचा निकराचा प्रयत्न करतोच असं नाही. गौरी म्हणतेच की, ‘इतर चार जण नाही का किती आनंदानं या बंदीत राहातात.’ पण तिच्या नायिकेला हे समजलं आहे की, ‘ती’ म्हणजे इतर चार जण नाहीत. तिला कारावास कोणता ते नीट कळलं होतं म्हणून तर तिची सारी तळमळ होती ती त्या कारावासातून मुक्त होण्याची. स्वत:चे अनुभव, स्वत:ची तत्त्वं आणि त्यावरून मांडलेले आडाखे, ठरवलेली दिशा, यांच्यासाठी कसलंही मोल देणारी ही नायिका आहे. स्वातंत्र्य हवं तर जबाबदारीही आलीच. ‘दर वेळी बाहेर पडताना कोणी ना कोणी होतं मदतीला. आता जोवर माझी मी खड्डय़ातून बाहेर येत नाही तोवर ‘मी स्वतंत्र..’ला काही अर्थ नाही.’ हे गौरी इतकं बिंबवते, की खऱ्या आत्मनिर्भरतेची व्याख्या स्वत:साठी करणं शक्य वाटतं. या आत्मनिर्भर होण्याच्या वाटेवर वाटाडय़ा उपयोगाचा नसतो, हेही तिनंच सांगून ठेवलंय.
तिच्यापूर्वी इतकं स्पष्टपणे, इतक्या धारदार शब्दांत असं म्हटलं नव्हतं कुणी. त्यामुळे ही नायिका सहज झेपणारी नव्हतीच. आजही नाही. कारण अगदी भावनिकदृष्टय़ाही कोणावर अवलंबून न राहणं अवघडच. पण तोही एक रस्ता आहेच, असतो, हेही समजतं ते तिच्याचमुळे. सगळं काही पटतं असं अर्थात नाही. तसं कधी नसतंच; पण मतभेदाशिवायची मैत्री हा भाबडेपणा आहे, हेही तीच ठसवते. तिचं लेखन आंतरिक, बौद्धिक नि मानसिक पातळीवरचे बदल घडवतं, ते असं. किती मोलाचं लिहिलंय गौरीनं. याच पुस्तकातल्या ‘मध्य लटपटीत’ आणि ‘एकेक पान गळावया’ या लघुकादंबऱ्यांत ती स्त्री-पुरुष सहजीवनाची जी चित्रं रेखाटते तीही कधी अवास्तव वाटली नाहीत. तेव्हाही नाही वाटली. स्त्री-पुरुष नात्यातल्या मैत्रीचं स्थान, बरोबरीचं नातं तिनं सतत अधोरेखित केलं. लग्न म्हणजे काय, या प्रश्नाचा शोध घेणारी ‘मध्य लटपटीत’ची नायिका विविध जोडप्यांचं नातं तीक्ष्ण नजरेनं, आरपार जोखते. प्रेमाचा, विवाहसंबंधांचा अर्थ शोधते. तिला जो अर्थ सापडला तोच सगळय़ांना सापडेल असं नसतं; पण अशी तपासणी करायला हवी, तर्कबुद्धी वापरायला हवी. नुसतं आंधळेपणानं जगत राहाणं, आला चेंडू टोलवत राहाणं म्हणजे काही अर्थपूर्ण जगणं नव्हे, याचंही भान ती देते.
गौरीच्या लेखनात शरीर आणि शारीर भाव फार ठसठशीत आहे. त्याचं वर्णनही आणि त्या शरीराच्या गरजा, इच्छा आणि तृप्ती हेदेखील. प्रेमातला शारीरभाव तिनं तपशिलांसह रंगवला. उदा. ‘‘तो हसला. खाली बसला. तिच्या कानाच्या पाळीपासून हनुवटीपर्यंत त्याने बोटाने रेघा ओढल्या. मग भुवयांवरून,मग मानेवरून, तिचं मऊसूत पोत आणि दमट टॉवेलची खरखर यांच्या विरोधाची त्याच्या हाताला गंमत वाटली.. गच्च काठोकाठ भरलेल्या तृप्तीनं उसवता उसवता तो म्हणाला..’’ किंवा ‘‘अकबरनं बोटाबोटांनी, कटाक्षांनी,ओठांनी एक एक इंच जिवंत केलेलं शरीर मोठमोठय़ाने आक्रोश करत होतं..’’ अशा लिखाणामुळे तिच्या लेखनावर ‘बोल्ड’ असा शिक्का बसला. कारण बाईनं काय लिहायचं याचेही काही अलिखित नियम बनवले आहेतच समाजानं. माणसाची- विशेषत: स्त्रीची लैंगिकता आणि नैतिकता यांचा संबंध आहे का? असं ती धीटपणे विचारते. याबाबत तिचे काका र. धों. कर्वे यांच्या स्त्री-पुरुष लैंगिकतेबाबतच्या विचारांचा आविष्कार गौरीच्या लेखनात दिसतो. समाजानं घालून दिलेल्या चौकटी मोडत लग्नाचा आणि प्रेमाचा काय बुवा संबंध? हे तिनं स्पष्टपणे विचारलं. सुरुवातीला दचकायला झालं, तरी खोलात जाऊन विचार करता ती काय म्हणू पाहतेय ते कालांतरानं उमगतं. कारण ती शंका काढायला लावते, संशय घ्यायला शिकवते, प्रश्न विचारायला भाग पाडते आणि त्यांची उत्तरं शोधायलाही! त्यासाठी तिच्या शैलीतला परखडपणा कामाला येतो.
‘जिचं घर आरशासारखं लखलखीत ती खरी बाई’ ही समजूत तिच्या नायिकेला परदेशातही आढळते, तेव्हा ही नायिका फटकळपणे विचारते, ‘तुमच्याकडे बायका झाडू आणि पोछा यांनी बनवलेल्या असतात का? आमच्याकडे जिला स्त्रीलिंगी अवयव ती बाई.’ बाईपणाच्या समाजमान्य चौकटी किती खोलवर रुजल्या आहेत, हे दाखवताना तिचा सूर जरा वरचा लागलाय हे खरं; पण बाईचं जगणं आणि बाईचं शरीर यांना जखडून टाकणाऱ्या या प्रचलित व्यवस्थेचा जो प्रचंड राग यातून व्यक्त होतो, तो महत्त्वाचा. याच पुस्तकातली राधा-माधवची कथा पाहा ना. ‘आत्यंतिक जवळिकीतही माणसाचा आतला गाभा अस्पर्श राहतो, प्रेम प्रेमवस्तूचा नाश करतं. प्रेमाला खूप टेकू लागतात तरून जायला आणि मी वेडी त्याचाच आधार घेऊ पाहात होते,’ म्हणून खंतावलेली नायिका यापूर्वी मला कधी भेटली नव्हती. या कादंबरीतली राधा जसं तिचं आणि माधवचं नातं तपासून पाहाते आणि प्रामाणिकपणे वाचकांसमोर मांडते, तसंच मुलांचं आणि आपलं नातंही. काय चुकलं, कुठे कमी पडलं, याचा शोध घेते. उदा.-युगोस्लावियातली एक म्हातारी राधाला ब्रेड शिकवताना म्हणते, ‘पीठ किती नि मीठ किती..ते कसं सांगू. घे अंदाजानं. फुलली ब्रेड तर खा आनंदानं बसून. दगड झाली तर धुणी बडव तिच्यावर.’ राधा म्हणते, ‘मुलं वाढवणं म्हणजे ब्रेड करण्यासारखं आहे’. आई-मुलांच्या नात्याभोवती, विशेषत: आईभोवती जे उदात्त भावनांचं वारूळ जमा केलं जातं, त्यावरची ही जहाल टिप्पणी कशी पचणार होती ८० सालात..
‘आहे हे असे आहे’ या संग्रहातल्या अगदी लहान ३-४ पानी कथांमधून गौरी स्त्री-पुरुष नात्याच्या रूढ सामाजिक वास्तवावर जी उपरोधिक भाष्यं करते त्याची विस्तारित रूपं पुढे तिच्या १० लघुकादंबऱ्यांमधून दिसतात. म्हणून हा संग्रह महत्त्वाचा. ती काळाच्या किती पुढचं पाहात होती, तेही त्यामधून दिसतं. ‘राइट, ऑन सिस्टर’ ही कथा आहे तिची. कथेच्या नायिकेचं नाव सिंधू आणि आडनाव कुलकर्णी. लग्न आणि बायका या विषयावर नेहमी टिंगलखोरपणे आणि हेटाळणीयुक्त सुरात बोलणाऱ्या कुटुंबातील- नवऱ्यासह पुरुषांचा दुटप्पीपणा पाहून तिच्या मनात येतं, ‘या बाप्यांना लग्न, मुलं, बायका यांची इतकी अडचण होते, तर आपण मिळून एक गोष्ट करावी. सगळय़ा-सगळय़ा बायकांनी मिळून एक कॉलनी करावी, मोठ्ठी. तिथे प्रवेश फी सगळय़ा पुरुषांना. सदरा धुऊन हवा ना, टाक पैसे. चपाती करून हवी ना, टाक पैसे. बाई हवी ना शेजेला, टाक पैसे. मूल हवं ना नाव चालवायला, टाक पैसे.’ वरवर विनोदी वाटणाऱ्या या विचारांमागे उभी असणारी पुरुषप्रधान व्यवस्था, वंशसातत्य, लग्नातली असमानता, ताबेदारी याची चरचरून जाणीव देते गौरी. ‘कशी या त्यजू पदाला’ म्हणणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्या सिंधूपेक्षा फार पुढे निघून आली आहे ही सिंधू. याच संग्रहात ‘किलगड’ नावाची एक अप्रतिम कथा आहे. मातृत्व हेच स्त्रीच्या आयुष्याचं खरं सार्थक आहे, या सार्वत्रिक समजाला छेद देणारी. या कथेतील जोडप्याला मूल नसतं. ते मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतात. पुढे त्या दत्तक मुलीचं आणि नायिकेचं कसं जवळिकीचं नातं होतं वगैरे. पण ७० च्या दशकात ही बाब अनोखी होती. आता सर्रास मुलं दत्तक घेतात, निदान शहरात तरी. समिलगी संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीचा विचारही जेव्हा केला जात नसे, त्या काळात गौरीनं कोणताही अभिनिवेश न आणता सहजपणे हा विषय ‘जावे त्याच्या वंशा’ कथेत मांडला. ‘सवय’ कथा पाहा. आपल्या पुरुषाला आवडत राहण्यासाठी बाया काय काय करत राहतात, ते ती दाखवते. ‘आता कुठं जाशील टोळंभट्टा?’ सारख्या कथेत लग्नाचा नवरा आणि प्रियकर या दोन्ही नात्यांत स्वत:च्या विचारांची आणि अपेक्षांची चिकित्सा करणारी आत्मदक्ष आणि अंतर्मुख नायिका ती उभी करते. स्त्री-पुरुष नात्याच्या प्रेमापासून ढोंगीपणापर्यंत असंख्य परी तिनं तपासून पाहिल्या आहेत. लग्नात येणारा तोचतोचपणा, नवरा-बायकोमधल्या ‘सवयी’च्या खेळी, त्यातला अप्रमाणिकपणा, कंटाळवाणा वाटणारा संसार, चाळिशीतही वाटू शकणारं पुरुषाचं आकर्षण, बांधून घालणारं आईपण.. हे तिनं न बिचकता सांगितलंय या संग्रहातील कथांत. समाजात प्रत्यही दिसणारे ढोबळ अन्याय वा अत्याचार सहसा नाहीत तिच्या कथांत; पण सूक्ष्म पातळीवर किती तऱ्हांनी बाईला कमीपणा दिला जातो, तिचं दुय्यम स्थान कसं गृहीत धरलं जातं, ते ती दाखवते.
तिची नायिका स्वत:ला सतत भिंगाखाली ठेवते, निरखते, पारखते, सोलून काढते. स्वत:ला काय हवंय हे बघायला शिकवते आणि नको ते नाकारायला. अलीकडे आलेल्या काही नाटकांतून, चित्रपटांतून असे विषय हाताळले जातात. स्त्रीकेंद्री मांडणी संवेदनशीलतेनं केलेली दिसते. त्याचं श्रेय काही अंशी तरी नक्कीच गौरीनं ही जी भूमी तयार केली त्याला जातं. स्त्रीचं सर्व प्रकारचं स्वातंत्र्य जरा उच्च स्वरात सांगावं लागणं हा गौरीच्या काळाचा निर्णय होता. नंतरच्या कुणाला ते इतकं ठासून सांगायची गरज उरली नाही, कारण गौरीनं त्यासाठी जमीन तयार करून ठेवली. गौरीनंतर लिहिणाऱ्या लेखकांच्या पिढीलाही तिनं निर्माण केलेल्या वाटा बळ देणाऱ्या ठरल्या.
गौरीच्या लेखनात यित्कचितही भावुकता नाही, ऊरबडवा आक्रोश नाही आणि तरी एका प्रगल्भ कारुण्याचा प्रत्यय ते देतं. ‘आहे हे असं आहे’ या शीर्षकात वरवर पाहता नाइलाजानं केलेला स्वीकार आहे असं वाटलं, तरी विलक्षण अशा अंत:स्थ वेदनेचा सूर त्यामागे आहे. पुरुषप्रधान मानसिकता ठासून भरलेला आजूबाजूचा भवताल कळायला गौरीचं लेखन मदत करतं. गाभ्यात अत्यंत संवेदनशीलतेचा प्रत्यय देणारं आणि झोपी गेलेल्याला खडबडून जाग आणणारं हे लेखन आहे. जगत असताना मनावर, विचारांवर चढणारी पुटं झाडून टाकायला मदत करणारं..
vandanabk63 @gmail.com
मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Freedom of woman question woman is independent individualism concepts gauri deshpande amy

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares