आंदोलन: तळेगाव, आसेगाव मंडळ अतिवृष्टीतून वगळल्याने शेतकरी कमालीचे संतप्त – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
चांदूर बाजार तालुक्यातील सात महसूल मंडळांपैकी तळेगाव व आसेगाव या दोन महसूल मंडळांना अतिवृष्टीतून वगळल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लोकविकास संघटनेच्या नेतृत्वात मंगळवारी रास्ता रोको आंदोलन केले. तर भारतीय जनता पक्षाने एक दिवसाआधीच तहसीलदारांना निवेदन देऊन झालेल्या प्रकाराची चौकशी करीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली.
तहसील कार्यालयासमोर करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर आंदोलनकर्त्यांना पांगवण्यात आले. त्यानंतरच वाहतूक सुरळीत झाली. गेल्या तीन महिन्यांपासून चांदूर बाजार तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात एकसारखा पाऊस पडत आहे. दरम्यान अतिवृष्टी झालेली असतानाही संबंधित यंत्रणेने तळेगाव व आसेगांव या दोन मंडळांचे सर्वेक्षण केले नाही.
त्यामुळे तेथील शेतकरी शासनाच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.संतप्त शेतकऱ्यांच्या मते सात महसूल मंडळांपैकी या दोनच महसूल मंडळांना वगळण्यात आल्याने कृषी व महसूल विभागाचा घोळ चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान या दोन्ही मंडळात समाविष्ट शेकडो शेतकऱ्यांनी भाजपच्या नेतृत्वात तहसीलदारांची भेट घेऊन आपली मागणी नोंदविली. त्याचवेळी आज, मंगळवारी संतप्त शेतकऱ्यांनी लोकविकास संघटनेच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान वंचित सर्व शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्यात येईल, असे भारतीय जनता पक्षाच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
अहवाल जिल्ह्याला पाठवला
राज्य सरकारच्या नियमानुसार ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला तरच त्या ठिकाणी अतिवृष्टी घोषित केले जाते. त्यानुसार तालुक्यातील सातपैकी ५ मंडळांमध्येच अतिवृष्टी झाली. तसा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला आहे. तळेगाव आणि आसेगाव या दोन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी नाही. परंतु सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तसा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवल्याचे तहसीलदारांनी सांगितले..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares