पशुसंवर्धन विभागातील रिक्त जागा भराव्या: गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांची मंत्री विखे पाटील यां… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
अहमदनगर जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील तसेच कोपरगाव येथील वळूमाता प्रक्षेत्र कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचारी वर्गाची अनेक पदे सध्या रिक्त असल्याने गोपालकांना तसेच शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणी विचारात घेऊन या रिक्त जागा तातडीने भराव्यात, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी बुधवारी (14 सप्टेंबर) केली.
यासंदर्भात परजणे यांनी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, नगर जिल्ह्यात राज्यस्तरावरील सहायक आयुक्त पदाच्या चार जागा, सहायक पशुधन विकास अधिकारी पदाच्या तीन जागा, तर पशुधन पर्यवेक्षक पदाच्या दोन जागा रिक्त आहेत. तसेच अहमदनगर जिल्हा परिषद स्तरावरील पशुधन विकास अधिकारी पदाच्या सात जागा, सहायक पशुधन विकास अधिकारी पदाची एक जागा, तर पशुधन पर्यवेक्षक पदाच्या 43 जागा सध्या रिक्त आहेत.
याशिवाय पशुसंवर्धन विभागांतर्गत असलेल्या कोपरगाव येथील वळुमाता प्रक्षेत्र कार्यालयामध्ये राज्यस्तरावरील सहायक आयुक्त पदाची एक जागा, सहायक पशुधन विकास अधिकारी पदाच्या दोन जागा, सहायक वैरणविकास अधिकारी पदाची एक जागा, चालक पदाची एक जागा, तर कनिष्ठ लिपीक पदाची एक जागा रिक्त आहे. रिक्त असलेल्या जागांमुळे संबंधित विभागातील कामकाजावर विपरित परिणाम होत असून या दोन्हीही विभागांशी संबंधित गोपालक व शेतकरी वर्गामधून नाराजी दिसून येत आहे. कार्यालयात संबंधित अधिकारी वर्ग व कर्मचारी कमी असल्याने जनावरांसाठी असलेल्या शासकीय सुविधा, वैद्यकीय सेवा वेळेवर उपलब्ध करुन देण्यास अनेक अडचणी येतात.
मुळात अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्रात दुग्धोत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात दुधाळ पशुधनाची संख्याही मोठी आहे. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावरच अवलंबून आहे. अशा परिस्थितीत गोपालकांना वेळेवर सुविधा उपलब्ध होत नसल्याने अनेक संकटाचा सामना त्यांना करावा लागत आहे. ही गंभीर समस्या विचारात घेऊन व दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने नगर जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त जागा तातडीने भराव्यात. त्यासाठी संबंधित विभागास आपले निर्देश व्हावेत, अशीही मागणी परजणे यांनी मंत्री विखे पाटील यांना पत्रातून केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares