भाजपचे सरकार शेतकरी विरोधी – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
ओतूर, ता. १३ : ‘‘कांद्याला मिळणारा अत्यल्प बाजारभाव बघता कांदा उत्पादक शेतकरी अतिशय अडचणीत सापडला आहे. शेतकरी सुखी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने उभे राहिले पाहिजे. शेतकरी एकजूट व आंदोलनामुळे शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकारला मागे घ्यावे लागले. शेवटी नरेंद्र मोदी यांनाही शेतकऱ्यांपुढे झुकावे लागले, एवढी ताकद शेतकरी एकजुटीत आहे. भाजप सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असून, शेतकऱ्यांना नष्ट करण्याचे धोरण राबवीत आहे,’’ अशी टीका माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
ओतूर (ता. जुन्नर) येथे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आणि जुन्नर तालुका शेतकरी संघटना यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जनआक्रोश मोर्चा ट्रॅक्टरवर काढला होता. त्यावेळी आयोजित सभेत मुंडे बोलत होते. यावेळी ओतूर शहरातून शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. मुंडे यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत रॅलीत सहभाग घेतला होता. यावेळी आमदार अतुल बेनके, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, बाजार समितीचे माजी सभापती ॲड. संजय काळे, शेतकरी नेते तान्हाजी बेनके, अंबादास हांडे, लक्ष्मण शिंदे, संजय भुजबळ, प्रमोद खांडगे, जुन्नर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक घोलप, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, मोहित ढमाले, बबन तांबे, माजी पंचायत समिती सभापती विशाल तांबे, शरद बँकेचे संचालक विनायक तांबे, गजानन महाराज शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव वैभव तांबे, अनिल तांबे, गीता पानसरे, तान्हाजी डुंबरे, सचिन आंबडेकर, प्रशांत डुंबरे, नीलेश लोहोटे, उज्ज्वला शेवाळे, सुरेखा वेठेकर, प्रभाकर शिंदे, बुधाजी शिंगाडे, संतोष तांबे, वाय. जी. गायकर आदी उपस्थित होते.
अतुल बेनके म्हणाले, ‘‘कांदा दरवाढीबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासमवेत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांची भेट घेतली असून, त्यांनी राज्य सरकारने याबाबत कोणताही प्रस्ताव पाठवला नसल्याचे सांगितले. राज्य सरकारने कांदा प्रश्नी निर्यातीवरील कर कमी करण्यासाठी प्रस्ताव पाठवायला हवा. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार व धनंजय मुंडे यांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. ठाकरे सरकारच्या काळात असा प्रस्ताव दिल्याने मागील वर्षी कांदा निर्यातीवरील कर कमी केला होता. परंतु, नविन सरकारचे मंत्री जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सत्कार समारंभात रमले आहेत.’’
दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी विमा योजना सुरू करून शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षीत करावे, अशी मागणी केली असता बाजार समितीचे माजी सभापती ॲड. संजय काळे यांनी आगामी काळात ती राबवण्याचे मान्य केले. अतुल बेनके यांनी काव्यपंक्तीतून केंद्र व राज्य सरकारवर टिका करून शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांची मांडणी केली.

या आंदोलनावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी स्वीकारले. जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे व सहायक पोलिस निरिक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. जयप्रकाश डुंबरे यांनी सूत्रसंचलन केले. पांडुरंग पवार यांनी आभार मानले.

शेतीत लागणाऱ्या खते व औषधांच्या किमती वाढल्या, मजुरी वाढली. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादनाचा खर्च तिप्पट झाला असून, बाजारभाव मात्र निच्चांकी आहे. परंतु, सरकारला याबाबत काही पडले नाही. सत्तांतरनाट्य झाले, मंत्रिमंडळ स्थापन झाले, पालकमंत्र्यांच्या निवडी होतील, पण शेतकरी व जनतेच्या समस्या सोडविणार कधी?’
– धनंजय मुंडे, माजी मंत्री
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares