माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम: शेतकरी व ग्रामस्थांचे प्रश्न सुटणार – आत्माचे उपसंचालक राजाराम गाय… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत शेतकर्‍यांच्या व गावकर्‍यांच्या अडचणी अधिकार्‍यांनी थेट गावात व वस्तीवर जाऊन जाणून घेऊन गावकर्‍यांच्या व शेतकर्‍यांच्या अडचणी सोडवण्यात येत आहेत. या उपक्रमास शेतकरी व ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बुळेवाडी येथील शेतकरी व ग्रामस्थांच्या समस्या शासन दरबारी मांडणार आहे, असे प्रतिपादन आत्माचे कृषी उपसंचालक राजाराम गायकवाड यांनी केले.
राहुरी तालुक्यातील बुळेवाडी येथे माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत आत्माचे प्रकल्प उपसंचालक गायकवाड यांनी आज शेतकर्‍यांशी संवाद साधला. याप्रसंगी शेतकरी तावजी केदार, संजय केदार आदींसह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले, शेतकर्‍यांचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल, यासाठी प्रयत्न करीत आहोत. कृषी विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. किसान क्रेडिट कार्ड, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा, प्रधानमंत्री पीकविमा योजना, प्रधानमंत्री फळ पीक विमा योजना, किसान सन्मान निधी योजनेंतर्गत टीकेवायसीची कामे, तसेच तंत्रज्ञानाच्या प्रचारासाठी सुधारित बियाणे वाटप, शेती शाळा प्रशिक्षण, नॅनो युरिया माती परीक्षण, शेततळे, क्रॉपसॅपबाबत पीकसल्ला, पीक पद्धतीत फेरबदल, यांत्रिकीकरण, सेंद्रीय शेती, तसेच शेतकरी गट स्थापना, शेतकरी उत्पादक कंपनी व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, कृषी माल तारण योजना, जलयुक्त शिवार योजना आदींबाबत त्यांनी सविस्तर माहिती देऊन चर्चा केली. गावात एक ना अनेक प्रश्‍न असून, ते शासन दरबारी मांडले जातील. ते सोडवण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील, असेही आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी अडचणी मांडताना शेतकरी म्हणाले की, ग्रामीण स्तरावरील कुठलीही संस्था गावात अस्तित्त्वात नाही. बुळेवाडी गावात 550 शेतकरी कुटुंबे आहेत. शेतीमाल बाजारात नेण्यासाठी पक्का रस्ता उपलब्ध नाही.
त्यामुळे येथील शेतीमाल इतरत्र घेऊन जाता येत नाही. कोरडवाहू शेती पद्धती आहे. 75 टक्के गावकर्‍यांना आदिवासी दाखला मिळावा. 50 टक्के शेतकर्‍यांची खातेफोड झालेली नाही. घरकुल योजना 25 टक्के राबविण्यात आली आहे. अजून 60 टक्के बाकी आहे. दूध संकलन केंद्र नाही. कुठलीही गावात फळबाग नाही. कम्पार्टमेंट बंडिंग, सीएनबी मातीचे बंधारे अद्यापपर्यंत कामे येथे झालेली नाहीत. महिला व पुरुष बचतगट गावात नसल्याने अनंत अडचणी आहेत, असा समस्यांचा पाढा शेतकऱ्यांनी गायकवाड यांच्या समोर वाचला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares