शिबिराला प्रारंभ: लायन्स क्लब प्लास्टिक सर्जरीने 310 जणांचे व्यंग करणार दूर ; आजपासून शस्त्रक्रिया – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
लायन्स क्लब औरंगाबाद-चिकलठाणातर्फे आणि महात्मा गांधी मेमोरियल रिसर्च सेंटर, औरंगाबाद ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशन यांच्या सहकार्याने डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ४६ व्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे मंगळवारी (१३ सप्टेंबर) उद‌्घाटन झाले. पहिल्या दिवशी ५२५ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३१० जणांवर पुढील चार दिवसांत शस्त्रक्रिया करून त्यांच्यातील व्यंग दूर करण्यात येणार आहे. नाकावरील बाह्य विकृती, चेहऱ्यावरील व्रण व डाग, दुभंगलेले ओठ, पडलेली पापणी आदींवर १७ सप्टेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
सिडको एन-१ भागातील लायन्स नेत्र रुग्णालयात झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन मेळघाटच्या महाराष्ट्र ट्रस्टचे डॉ. आशिष सातव यांच्या हस्ते झाले. डॉ. राज लाला प्रमुख पाहुणे होते. लायन्सचे प्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया, उपप्रांतपाल सुनील देसरडा, ड्रगिस्ट-केमिस्ट संघटनेचे निखिल सारडा, डॉ. कविता सातव, डॉ. उज्ज्वला दहिफळे, क्लबचे अध्यक्ष विजय अग्रवाल, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, प्रीती जैन, अरविंद माछर आदी उपस्थित होते.डॉ. राज लाला यांनी डॉ. दीक्षितांनी सुरू केलेले समाजसेवा आणि रुग्णसेवेचे व्रत पुढे सुरू ठेवण्याची हमी दिली.
मुलीच्या पापण्यांवर इलाज
बुलडाणा जिल्ह्यातील महेंद्र जामवतकर हे आपली पाच वर्षांची मुलगी अश्विनी हिला घेऊन आले आहेत. तिच्या डोळ्याच्या पापण्या जन्मापासूनच पूर्णपणे उघडत नाहीत. त्यामुळे मुलीच्या भविष्याबाबत त्यांना चिंता वाटत होती. खासगीत इलाजही परवडत नाही. त्यामुळे इथे आलो आहे, असे ते म्हणाले.
तिरळेपणातून मिळेल मुक्त्ती
जालना जिल्ह्यातील शेतकरी गजानन बोंद्रे यांच्या दोन वर्षांच्या मुलींच्या डोळ्यात जन्मजात तिरळेपणा आहे. हा दोष दूर करण्यासाठी खासगी रुग्णालयातील उपचार परवडणारे नाहीत म्हणून ते या शिबिरात आले होते. येथील उपचारानंतर आपल्या मुलीला त्यातून मुक्तता मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
खराब चेहरा बरा होईल
सिल्लोड तालुक्यातील पालोदचे रहिवासी सूर्यकांत पालोदकर यांचा २०२० मध्ये दुचाकी अपघातात एक डोळा निकामी झाला होता, तसेच चेहऱ्यावरही व्रण उमटले होते. आता शिबिरातून माझी समस्या सुटेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares