लक्षवेधी: भारताच्या परराष्ट्र धोरणाची दिशा – Dainik Prabhat

Written by

चीन संपूर्ण जगाची व्यवस्था आपल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करत आहे. अशावेळी भारताच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा कस लागतो आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत 2047 पर्यंत एक विकसित देश बनेल, अशी अपेक्षा व्यक्‍त केली आहे. अनेक देश आर्थिक संकटात आहेत. भारताचेही काय होणार, अशी चिंता अर्थतज्ज्ञांना होती; पण भारत त्यातून अतिशय मजबुतीने बाहेर पडला. आर्थिक वाढीचा वेगही वाढतो आहे; पण उद्दिष्ट अजून गाठायचे आहे. आपली चीनशी तुलना करायची तर चिनी अर्थव्यवस्था आपल्या तुलनेत पाचपटीने पुढे आहे. तरी जागतिक राजकारणात होणारे ध्रुवीकरणही भारताच्या बाजूने दिसू लागले आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पंचशील तत्त्वे हा पाया आहे आणि सध्या तरी भारताने हा पाया सोडलेला नाही. आता आपल्यासमोर आव्हान आहे ते देशाच्या अंतर्गत एकात्मतेचे. आपल्याकडे विविधतेत एकता असल्याचे म्हटले जाते, पण चर्चा केवळ विविधतेचीच होते. त्यातील एकतेवर आता भर देण्याची गरज आहे.
भारत खऱ्या अर्थाने विकसित व्हायचा असेल तर त्यात देशाच्या परराष्ट्र धोरणाचे योगदान तितकेच महत्त्वाचे आणि मोठे असणार आहे. सध्या भारताचे परराष्ट्र धोरण खूप आक्रमक आहे. पण देशासमोरील आव्हानेही तितकीच जटील आहेत. पाकिस्तान आणि चीन यांची मैत्री तुटण्याची आवश्‍यकता आहे. चीनला रोखणे हे दहशतवादापेक्षाही मोठे आव्हान आहे. भारताचे आर्थिक धोरणही खूप बदलले आहे. पूर्वी भारताचा आर्थिक विकास हा ढोबळ आर्थिक घटकांवर होत असे, म्हणजे विकेंद्रीकरणाची बाब केवळ कागदावरच होती. प्रत्यक्षात समाजातील काही लोकांनाच आर्थिक विकासाचे फायदे मिळत होते. नंतर ही परिस्थिती बदलली आणि मायक्रो म्हणजे सूक्ष्म आर्थिक विकासावर भर देण्यात आला. किंबहुना हा विचारच सरकारचा प्राधान्यक्रम बनला. तळागाळातील लोक पुढे येऊ लागले आणि मध्यमवर्गाचा विस्तार झाला. महिला, अनुसूचित जाती आणि भूमीहीन शेतकरी यांसारखे वंचित घटक हे पायाभूत आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनामुळे मजबूत बनले आहेत.
भारत जगातील एक महत्त्वाची शक्‍ती म्हणून पुढे येऊ लागला आहे. चीनच्या विस्तारवादी धोरणाला आळा घालण्यासाठी भारताची उपयुक्‍तता आता जगाच्या लक्षात येऊ लागली आहे. श्रीलंका, पाकिस्तान, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिकी देश या सगळ्यांनाच चीनच्या या विस्तारवादी धोरणाचा कमीअधिक प्रमाणात फटका बसला आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान तर उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. भारत आणि चीनमधील संघर्षही तीव्र होताना दिसतो आहे. चीनला महाशक्‍ती बनून जगाची राजकीय व्यवस्था स्वत:च्या मर्जीने चालवायची आहे, तसा त्याचा प्रयत्नही आहे. हे करताना कोणताही विधिनिषेध बाळगायचा नाही हे त्याचे धोरण आहे. म्हणूनच उत्तर कोरिया, पाकिस्तान यांसारख्या जगाच्या दृष्टीने अत्यंत घातक देशांनाही चीन पाठीशी घालताना दिसतो. अमेरिकेविरोधात महाशक्‍ती म्हणून उभे राहण्याच्या नादात चीन जागतिक राजकारणात एकाकी पडतानाच दिसतो आहे. त्यातच रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे तर सर्व महाशक्‍तींचे लक्ष भारताकडे एकवटलेले आहे. भारतासाठी सध्या आव्हानात्मक स्थिती आहे.
भारताचे धोरण, निर्णय आता जागतिक राजकारणात महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. भारत कोणत्याही परिस्थितीत शीतयुद्धाप्रमाणे स्थिती निर्माण होऊ देऊ इच्छित नाही. सर्वांत मोठे आव्हान पाकिस्तान आणि चीन यांची युती तोडण्याचे आहे. दहशतवाद आज जागतिक समस्या बनला आहे आणि पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून आहे. चीन पाकिस्तानला मदत करत आहे. अर्थात चीन पाकिस्तानला अमेरिकेप्रमाणे दानधर्म करत नाही, तर मदतीच्या बदल्यात पाकिस्तानकडून अनेक गोष्टी मिळवत आहे. त्याचा भारतालाही धोका आहे आणि पर्यायाने जगालाही ते धोकादायक आहे. पाकिस्तानचे दहशतवादाला खतपाणी देण्याचे धोरण आणि चीनची त्याला असलेली साथ या दोन्ही गोष्टी केवळ भारताच्यादृष्टीनेच नाही तर जगाच्या दृष्टीनेही धोकादायक आहेत. अफगाणिस्तानात दोन दशकांहूनही अधिक काळ तळ ठोकूनही अमेरिकेला पाकिस्तानप्रणित दहशतवाद आणि पाकिस्तान या दोन्हीवरही काबू मिळवता आला नाही की, अफगाणिस्तानातील दहशतवादी कारवाया रोखता आल्या नाहीत. यातच सर्व काही आले.
भारत याबाबतीत आक्रमकपणे बऱ्याच गोष्टी करू शकतो. पाकिस्तानला जगात एकाकी पाडण्यात भारताला चांगलेच यश आले आहे. पाकिस्तान आणि चीन यांची मैत्री तुटण्याची आता गरज आहे. चीनशी थेट संघर्ष करणे भारताच्या भल्याचे नाही. पण पाकिस्तानची कोंडी केल्याने दक्षिण आशियात चीनही कमजोर पडू शकतो. त्यासाठी पाकव्याप्त काश्‍मीरचे भारतात विलीनीकरण होणे अत्यंत आवश्‍यक आहे. पाकिस्तानमुळे अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी आपला संपर्क तुटला आहे. पाकव्याप्त काश्‍मीर ताब्यात घेतले तर तो प्रश्‍न सुटेल आणि पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांनाही मोठा आळा बसेल.
भारताचे परराष्ट्र धोरण एका निश्‍चित दिशेने पुढे चालले आहे. जागतिक राजकारण झपाट्याने बदलत आहे. येत्या काही काळात जगाच्या राजकारणाचे केंद्र युरोप आणि अमेरिका नाही तर आशिया असेल आणि या राजकारणात आपल्याला कुणीही प्रतिस्पर्धी नकोत अशी चीनची भूमिका आहे. त्याला भारत टक्‍कर देऊ शकतो आणि म्हणूनच भारताला सर्व बाजूंनी कोंडीत पकडण्याचे चीनचे धोरण आहे. या परिस्थितीत चीनशी थेट दोन हात न करता राजकीय मुत्सद्देगिरीचा वापर करत स्वत:चे स्थान तयार करून ते टिकवण्याचे आव्हान भारतासमोर असणार आहे. आक्रमकता आणि संयम याचे अजब मिश्रण भारताच्या परराष्ट्र धोरणात दिसून येईल. येणाऱ्या काळात भारताचे परराष्ट्र धोरण काहीसे असेच असेल अशी अपेक्षा आहे.
ईपेपरराशी-भविष्यकोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

Copyright © 2022 Dainik Prabhat
Login to your account below
Please enter your username or email address to reset your password.source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares