लखीमपूर खिरीः दोन सख्ख्या बहिणींचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत, 6 आरोपी अटकेत – BBC

Written by

या बातमीतील काही तपशील वाचकांना विचलित करू शकतो.
एका दलित कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणींचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने उत्तर प्रदेशात खळबळ माजली आहे.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी जिल्ह्यातील ही घटना असून या प्रकरणी 6 आरोपींना अटक केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पण, मुलींना जबरदस्तीने उचलून नेल्याचे किंवा अपहरणाचे आरोप पोलिसांनी फेटाळून लावले आहेत.
संतप्त गावकऱ्यांनी आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी अनेक तास रास्ता रोको आंदोलन केलं होतं.
ही बातमी समोर आल्यानंतर राजकीय पक्षांनी उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, मायावती यांच्यासह काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी हे सरकारचं अपयश असल्याचा आरोप केला आहे.
फोटो स्रोत, VIDEO GRAB/TWITTER
घटनास्थळी दाखल पोलीस अधिकारी
लखीमपूर खिरी जिल्हा शेतकरी आंदोलनादरम्यान चर्चेत आला होता. त्यावेळी केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलावर आंदोलक शेतकऱ्यांना वाहनाने चिरडण्याचा आरोप होता. या घटनेच चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.
लखीमपूर खिरीचे पोलीस अधीक्षक संजीव सुमन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं, "आरोपी दोन्ही सख्ख्या बहिणींना जबरदस्तीने घेऊन गेले नाहीत. मुख्य आरोपी मुलगा याच मुलींच्या घराजवळ राहतो. मुलींना फूस लावून शेतात नेण्यात आलं. तिथे मुख्य आरोपी मुलाने इतर तीन मित्रांची मुलीशी मैत्री करून दिली. या चार आरोपींशिवाय इतर दोघांना पुरावे मिटवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे."
या घटनेची प्राथमिक माहिती पीडीत कुटुंबीयांनी बुधवारी पहाटे मध्यरात्री 11 वाजता पोलिसांना दिली. पोस्टमार्टम काही वेळाने करण्यात येईल. त्यासाठी तीन डॉक्टरांचं पथक बोलावण्यात आलं आहे. तसंच या पंचनाम्याचं व्हीडीओ शूटिंग करण्याची सूचना देण्यात आली आहे.
वरील प्रकार बुधवारी सायंकाळी निघासन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.
"या मुलींचं वय 15 आणि 17 सांगितलं जात आहे. सुरुवातीला तीन जणांनी मुलींवर बलात्कार केला. नंतर त्यांची हत्या करून त्यांचे मृतदेह झाडावर लटकवले," असा आरोप पीडीत कुटुंबीय आणि स्थानिक ग्रामस्थांकडून केला जात आहे.
लखनौ परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षक लक्ष्मी सिंह यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली.
ते म्हणाले, "लखीमपूर खिरी गावाबाहेर एका शेतात या दोन मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांचे मृतदेह त्यांच्याच ओढणीने लटकल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं. त्यांच्या मृतदेहांवर कोणत्याच प्रकारे जखमांचे व्रण नाहीत. शवविच्छेदनानंतर आणखी माहिती समोर येईल."
या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. संतप्त गावकऱ्यांनी निघासन चौकात काही वेळ निषेध आंदोलनही केलं.
आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात होती.
फोटो स्रोत, Ani
प्रशांत कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक, उत्तर प्रदेश
निघासन चौकात आंदोलनास बसलेल्या आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना बरीच मेहनत करावी लागली.
दरम्यान, दोषींना तत्काळ अटक करण्यात येईल, असं आश्वासन उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी दिलं.
सोशल मीडियावर या घटनेशी संबंधित अनेक व्हीडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये पोलीस अधीक्षक संजीव सुमन यांच्यासह काही वरीष्ठ अधिकारी आंदोलकांना समजवताना दिसत आहेत.
या प्रकरणातील दोषींकवर तातडीने कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन पोलीस संतप्त संतप्त ग्रामस्थांना देत असल्याचं व्हीडिओमध्ये स्पष्ट दिसतं.
फोटो स्रोत, Getty Images
फाईल फोटो
मात्र, पोलिसांनी या प्रकरणात जबरदस्तीने शवविच्छेदन करण्यात आल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या.
मृतांच्या कुटुंबीयांच्या सहमतीने आणि त्यांच्या उपस्थितीत वरीष्ठ डॉक्टरांकडून शवविच्छेदन करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.
तसंच पीडित कुटुंबाच्या सर्व वाजवी मागण्या मान्य केल्या जातील पण कायदा आणि सुव्यवस्था राखणं याला आमचं प्रथम प्राधान्य आहे, असं त्यांनी सांगितलं.
पण कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तीन तरूण दुचाकीवरून आले. त्यांनी गवत कापत असलेल्या दोन्ही बहिणींना उचलून नेलं. यानंतर त्यांची हत्या करण्यात आली.
लखीमपूर प्रकरण समोर आल्यानंतर काही जण याची तुलना बदायूं बलात्कार प्रकरणाशी करत आहेत. 2014 साली बदायूँ जिल्ह्यात दोन दलित बहिणींचे शव झाडावर लटकलेले आढळून आले होते.
या प्रकरणात मुलींवर सामूहिक बलात्कार आणि हत्येची ही घटना होती. याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने केला होता.
लखीमपूर खिरीच्या या घटनेवरून राजकीय पक्षांच्या तिखट प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विट करून म्हटलं, "निघासन पोलीस ठाणे हद्दीत दोन दलित बहिणींचं अपहरण करून त्यांची हत्या केल्यानंतर पोलिसांनी विनासहमती शवविच्छेदन केल्याचा त्यांच्या वडिलांचा आरोप अत्यंत गंभीर आहे. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांनंतर आता दलितांच्या हत्या ही हाथरस की बेटी हत्याकांडाची क्रूर पुनरावृत्ती आहे."
बसपा सुप्रीमो मायावती यांनी ट्विट करून म्हटलं, "लखीमपूर खिरी येथे आईसमोर दोन दलित मुलींचं अपहरण आणि अत्याचारानंतर त्यांचे मृतदेह झाडाला लटकवण्याचा हृदयद्रावक घटना चर्चेत आहे. अशा दुःखद आणि लज्जास्पद घटनेची निंदा करावी तितकी कमी आहे. यूपीमध्ये गुन्हेगार निर्ढावले आहेत, कारण सरकारचं प्राधान्य वेगळ्याच गोष्टींना आहे."
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी ट्विट करून म्हटलं, "लखीमपूरमध्ये दोन बहिणींच्या हत्येची घटना हृदयद्रावक आहे. मुलींचं दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आलं, असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. रोज वर्तमानपत्र आणि टीव्हीमध्ये खोट्या जाहिराती देण्याने कायदा आणि सुव्यवस्था चांगली होत नसते. उत्तर प्रदेशात महिलांविरुद्ध क्रूर गुन्ह्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे."
लखीमपूर खिरी जिल्हा यापूर्वीही महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या प्रकरणामुळे अनेकवेळा चर्चेत राहिला आहे.
2020 मध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि हत्येच्या घटना समोर आल्या होत्या.
जून 2011 मध्ये निघासन पोलीस ठाणे परिसरात एका मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणात नंतर एका पोलीस निरीक्षकासहित 11 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं होतं.
नंतर 28 फेब्रुवारी 2020 मध्ये दिलेल्या निर्णयात पोलीस कॉन्स्टेबल आतिक अहमद हाच 14 वर्षीय मुलीची हत्या आणि नंतर मृतदेह झाडाला लटकवून आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात दोषी आढळून आला. या पोलीस कर्मचाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares