Hingoli : शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
कळमनुरी : अतिवृष्टीमध्ये नुकसान होऊनही वाकोडी सर्कलमधील गावांना मिळणाऱ्या शासकीय मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे, असा आरोप करत प्रशासनाच्या निषेधार्थ बुधवारी (ता. १४) शेकडो शेतकऱ्यांनी ईसापूर धरणाच्या पाण्यामध्ये जलसमाधी आंदोलन केले.
जुलै ते ऑगस्ट दरम्यान तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नदी- नाल्या काठच्या व ईसापूर धरणामधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे वाकोडी सर्कलमधील अनेक गावांतील शेतीला मोठा फटका बसला आहे. असे असताना पंचनामे करताना वाकोडी सर्कल अंतर्गत गावांमधून नुकसान दाखवण्यात आले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शासनाकडून मिळालेल्या मदतीमध्ये १९ गावांतील शेतकऱ्यांचा समावेश नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे होते.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी ईसापूर धरणाच्या पाण्यामध्ये जलसमाधी आंदोलन केले.
आंदोलनाची माहिती मिळताच नायब तहसीलदार सतीश पाठक, मंडळ अधिकारी श्री. पावडे, सहायक पोलिस निरीक्षक श्रीनिवास रोयलावार हे घटनास्थळी दाखल झाले. आंदोलक शेतकऱ्यांशी अधिकाऱ्यांनी संवाद साधला. आंदोलक शेतकऱ्यांच्या तीव्र भावना पाहता वाकोडी सर्कल अंतर्गत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना इतर मंडळाप्रमाणे अतिवृष्टीचे अनुदान देण्यात येईल, दोषी कर्मचाऱ्यांवर शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
यावेळी सखाराम उबाळे, माधवराव सुरोशे, राजीव जाधव, बापूराव जाधव, नागोराव करंडे, विनोद बांगर, शिवप्रसाद म्हस्के, श्यामराव फटिंग, शिवाजी मस्के, राम देशमुख, मंचकराव इंगळे यांच्यासह वाकोडी सर्कल अंतर्गत गावांमधील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares