प्रस्थापित व्यवस्थेविरोधात गरिबांनी एकत्र यावे, अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांचे आवाहन – My Mahanagar

Written by

You subscribed MyMahanagar newsletter successfully.
Something went wrong. Please try again later.
मुंबई – “आहे रे आणि नाही रे” वर्गातील दरी वाढत असून आतापर्यंत या दोन वर्गात समतोल साधण्याचा प्रयत्न करणारी राज्यव्यवस्था पूर्णपणे प्रस्थापित भांडवलशाहीच्या बाजूला गेली आहे. त्यामुळे या व्यवस्थेला ताळ्यावर आणायचे कसे, हेच सर्वात मोठे आव्हान आज देशासमोर असून त्यासाठी देशातील गरिबांनी एकत्र येऊन ही लढाई लढायला हवी, असे आवाहन अर्थतज्ज्ञ आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्यकार प्रा. संजीव चांदोरकर यांनी रविवारी येथे केले.
परिवर्तन मुंबई या संस्थेने वार्षिक पुरस्कार वितरण समारंभाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या व्याख्यानात प्रा. चांदोरकर बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी होते. यावेळी समाजवादी परिवारातील जेष्ठ कार्यकर्ते बच्चुभाई शहा, राष्ट्र सेवा दलाचे सुहास कोते, जनता दलाचे तरुण कार्यकर्ते संजीवकुमार सदानंद आणि अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठी काम करणारे विजय सराटे यांचा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
तत्पूर्वी बोलताना, अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांचा विचार करण्यापूर्वी अर्थव्यवस्थेसमोर किमान काय उद्दिष्टे आहेत, असायला हवी याचा विचार करायला हवा. केवळ राष्ट्रीय उत्पन्न वाढले, शेअर बाजार वधारला, परकीय गुंतवणूक वाढली म्हणजे अर्थव्यवस्थेसमोरील प्रश्न सुटले, असे समजता येणार नाही. अर्थव्यवस्थेसमोरील उद्दिष्टे सर्वसामान्य जनतेचे जीवनमान सुधारण्याची असले पाहिजेत. देशातील कोट्यवधी जनतेच्या दैनंदिन गरजा भागवल्या जात आहेत काय?त्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतात का, चांगले जीवन जगण्यासाठी योग्य आहार घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे का? स्त्रियांच्या रक्तातील कमी असलेले हिमोग्लोबिन वाढते आहे का? लोकांना राहण्यासाठी परवडणाऱ्या किमतीत निवारा उपलब्ध होत आहे का? वयस्कर माणसांना विनाश्रम जगता येते का? अशी उद्दिष्टे देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर असायला हवीत, असे चांदोरकर यांनी स्पष्ट केले. मात्र, या उद्दिष्टांच्या अनुषंगाने विचार केला तर देशातील स्थिती भयावाह होत चालली आहे. रोजगाराअभावी तरुणांचे तांडे शहरांकडे स्थलांतरित होत आहेत. गरीब आणि श्रीमंत यातील दरी प्रचंड वाढली आहे समाज माध्यमांमुळे श्रीमंत वर्गाचे ऐषआरामी जीवन गरीब तरुणांपर्यंत पोहोचत असून यातून धोकादायक अशी वैफल्याची भावना त्यांच्यात निर्माण होत आहे, असे सांगत चांदोरकर यांनी उपलब्ध रोजगाराच्या गुणवत्तेबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. कुटुंबाच्या गरजा भागविण्या इतके वेतन या रोजगारातून मिळते का, स्त्रियांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटत आहे का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. सरकारच्या कार्पोरेट भांडवलशाहीच्या हिताच्या आर्थिक धोरणांमुळे स्वयंरोजगार आणि छोटे उद्योजक उध्वस्त झाला असल्याचा आरोप त्यांनी केला.
आज जगात अन्नटंचाईचे संकट असले, तरी भारत याबाबत सुरक्षित आहे. हे घडवून आणणारे शेतकरी आणि शेती व्यवसाय हे नव्या अर्थव्यवस्थेत पूर्णपणे दुर्लक्षित ठरले आहेत. एक प्रकारे सापत्नभावाची वागणूक या क्षेत्राला मिळत आहे.पर्यावरणाचे संकट आज देशाच्याच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्थेसमोरील मोठे आव्हान ठरले आहे. मानवी इतिहासात प्रथमच लंडनमधील थेम्स नदीचे झरे आटल्याचे पहावे लागत आहे. जगभर लागणाऱ्या वणव्यांची संख्या हजारो नवे लाखोंच्या घरात पोहोचली आहे. दुसरीकडे तापमान, पाऊस, हिमवृष्टी या सगळ्यातच अकल्पनीय बदल होत आहेत. हे आव्हान कोणताही एक देश पेलू शकत नाही. यातून मानवाला ज्या यातना भेडसावत आहेत त्याचे मोजमाप कोण करणार आणि याची जबाबदारी जगातील राज्यकर्ते येणार आहेत की नाही?असा सवालही त्यांनी केला.
यातून बाहेर पडण्यासाठी अर्थव्यवस्थेत जनता केंद्र दृष्टिकोन रुजवण्याची गरज आहे. मात्र गेल्या काही वर्षात भारतातील राज्यकर्त्यांत दृष्टिकोन आहे रे वर्गाच्या, कार्पोरेट भांडवलशाहीच्या बाजूने वळला आहे. यावर उपाय करायचा असेल तर त्यासाठी गरिबांनी धर्म, जात, पंथ, प्रांत हे भेदाभेद सोडून एकत्र येऊन, ही लढाई लढायला हवी, असेही चांदोरकर म्हणाले.
ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी ‘माय महानगर’चे Android App डाऊनलोड करा

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares