व्याजाचा परतावा मिळणार कधी? – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
कडुस, ता. १६ ः पीक कर्जाची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ६ टक्के व्याजाचा परतावा देण्याचे जाहीर करून दीड वर्ष उलटले. शेतकऱ्यांनी पीक कर्जावर दोन वेळा सहा टक्के व्याज भरले, आता तिसऱ्यांदा ६ टक्के व्याज भरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. गेल्या दोन वेळा भरलेल्या व्याजाचा परतावा मिळाला नाही. आता तिसऱ्यांदा व्याज भरायला पैसे कुठून आणायचे, असा सवाल बळीराजा करीत आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे जाहीर केले होते, याला तीन वर्षे उलटली. अजूनही शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच शून्य टक्के व्याजाने मिळणाऱ्या पीक कर्जावर सहा टक्के व्याज भरायला लावले. कर्जाची व्याजासह मुदतीत परतफेड केल्यास ही व्याजाची रक्कम शेतकऱ्यांना परत दिली जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती.
गेल्या वर्षाच्या खरीप व त्यानंतर रब्बीसाठी उचललेल्या पीक कर्जाची शेतकऱ्यांनी व्याजासह परतफेड केली. आता यंदाच्या खरिपासाठी उचललेल्या पीक कर्जाची सहा टक्के व्याजासह परतफेड करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना ही रक्कम सप्टेंबर महिन्याअखेर भरणे क्रमप्राप्त आहे. मुदतीत परतफेड केली तरच व्याजाचा परतावा मिळणार, यासाठी शेतकऱ्यांची पैशांची जमवाजमव करण्यासाठी पळापळ सुरू झाली आहे.
थकबाकीदार राहायला नको व व्याजाचा परतावा मिळेल, म्हणून शेतकऱ्यांनी याअगोदरच गेल्या वर्षाच्या खरीप व रब्बी हंगामातील पीक कर्जाची व्याजासह रक्कम उसनवारी करून भरली. ही उसनवारी शेतकऱ्यांच्या अंगाशी आली आहे. आता यंदाच्या खरिपातील पीक कर्जाची परतफेड कशी करायची, ही समस्या अनेक शेतकऱ्यांना भेडसावत आहे. अजूनही पन्नास हजाराचे अनुदान आणि व्याजाचा परतावा शेतकऱ्यांना मिळाला नाही. यासाठी अजून किती दिवस प्रतीक्षा करायची, असा सवाल कडुस सोसायटीच्या संचालिका भावना शेंडे, पंडित मोढवे, शंकर कावडे, दोंदे सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कदम, जितेंद्र बारणे, महादू बनकर आदींनी केला आहे.
————————
काही गरीब शेतकऱ्यांना व्याज भरण्यासाठी खासगी सावकारांकडून कर्ज घ्यावे लागत आहे. शेतकरी कर्जाच्या खाईत रुतत चालला आहे. शासनाने दिलेला शब्द पाळला पाहिजे. – अशोक बंदावणे, उपाध्यक्ष, कडुस सोसायटीचे
————————-
वरिष्ठ कार्यालयाकडून पात्र शेतकऱ्यांची माहिती मागवली होती. ती पुढे पाठवली आहे. पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान आणि व्याजाच्या परताव्याचा प्रश्न मार्गी लागावा, ही अपेक्षा आहे. – विलास भास्कर, जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares