आत्महत्या: धक्कादायक! प्रौढांप्रमाणेच तरूण शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
आसमानी, सुल्तानी, सावकारी असा बळीराजावर चहुबाजूने बसणारा मार, वाढलेली महागाई, उत्पादित मालाला योग्य बाजारभाव न मिळणे, अशा समस्यांच्या चक्रव्यूहात अडकल्याने शेतकरी आत्महत्यांचे सत्र अद्याप सुरूच आहे. जिल्ह्यात १९० दिवसांत १५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात ३१ ते ५० वयोगटातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ५१ टक्के आहे. याच वयात मुलांचे शिक्षण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, मुला-मुलींचे लग्न अशी कार्ये पार पाडायची असतात. परंतु, यासाठी हाती काहीच उरत नसल्याने त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागतो, हेच वास्तव समोर आले आहे. अगदी १७ ते ३० वयोगटातील २६ टक्के आणि ५१ ते ९० वयोगटातील ३२ टक्के शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी जिल्हा हादरला असून, समस्यांच्या चक्रव्यूहात तरुण शेतकऱ्यांचा ‘अभिमन्यू’ झाला असल्याचे स्पष्ट होत आहे.
मागील अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. शेतकरी आत्महत्या रोखता येईल, अशी कोणतीही परिणामकारक योजना शासनाकडे नाही. शासनाद्वारे केले जाणारे प्रयत्न हे प्रभावी नसल्याचेच या आत्महत्यांवरून दिसून येत आहे. ३१ ते ५० हे वय अधिक जबाबदारी पेलण्याचे राहते. त्यामुळेच एकूण आत्महत्येच्या ५० टक्क्यांवर आत्महत्या याच वयोगटातील शेतकऱ्यांच्या आहेत. यासाठी कारणीभूत असलेल्या समस्यांची समूळ सोडवणूक करण्याचे गंभीरपणे प्रयत्नच झाले नाहीत. कारण शेतकऱ्यांबद्दल कळवळाच राहिली नाही. राजकीय पोळी शेकण्यासाठी शेतकरी आत्महत्यांचे केवळ भांडवल केले जाते. परंतु, शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होणार नाहीत, असे प्रयत्नच केले जात नाहीत.
बोगस बियाणे, वाढती महागाई, कर्जाचे वाढणारे ओझे, सावकारांचा सततचा तगादा, गहाण पडलेली जमीन, घरी अन्न नाही, उसने घेण्याची सोय नाही. अहोरात्र परिश्रम घेत पिक घेतले तर त्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नाही. कारण पिकवणाऱ्या शेतकऱ्याची कोणीच किंमत करीत नाही. यात हवामानाचा फटका बसला तर मग विवंचना काही विचारूच नका!, मजुर मिळत नाही, पिकांना पाणी नाही, वीजपुरवठा पुरेसा नाही, अशा समस्यांच्या फेऱ्यात अडकलेला ३१ ते ५० वयोगटातील शेतकरी परिस्थितीपुढे हतबल झाला आहे.
अपात्र ठरलेल्या आत्महत्यांचा वाली कोण? जिल्ह्यात २०२१ मध्ये एकूण ३७० शेतकरी आत्महत्या झाल्या. यापैकी २७४ पात्र तर ९६ अपात्र ठरल्या. त्याचप्रमाणे सप्टे. २०२२ पर्यंत २१४ शेतकरी आत्महत्या झाल्या त्यापैकी ९ सप्टेंबरपर्यंत १५२ आत्महत्या पात्र तर २० अपात्र ठरल्या आहेत. त्याचप्रमाणे ४२ आत्महत्यांची चौकशी प्रलंबित आहे. परंतु, ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासनाच्या लेखी अपात्र ठरल्या त्यांचा वाली कोण? असा गहन प्रश्न असून त्यांचे कुटुंब तर उघड्यावर आले आहे. याचाही शासन, समाजिक संघटना, जनप्रतिनिधींनी विचार करायला हवा, असे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.
उपाययोजना कमी पडल्याने आत्महत्या सुरूच गेल्या वर्षी कोरोना काळातही जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यापर्यंत १९५ पात्र शेतकरी आत्महत्या झाल्या. त्या तुलनेत ९ सप्टें. २०२२ पर्यंत ही स्थिती बघितल्यास १५२ पात्र शेतकरी आत्महत्यांची नोंद आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सप्टेंबरपर्यंत ४३ आत्महत्या कमी झाल्या आहेत. शेतकऱ्यांना आत्महत्याच करावी लागू नये, अशी स्थिती निर्माण करण्यात शासन कमी पडल्यामुळे आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे.
मेहनतीचे चीज होत नसल्यामुळे शेतकरी घेतात टोकाचा निर्णय ^आम्ही प्रचंड मेहनत केली व करत आहोत, तरीही मेहनतीचे चीज होत नाही. शेतकऱ्यांसमोरची एक समस्या संपली की, दुसरी आ वासून पुढे उभी असते. समस्येच्या चक्रव्यूहात शेतकरी कायम फसला आहे. त्यामुळेच तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. मजुरांची कमतरता, सिंचनासाठी अखंडीत वीज पुरवठा नाही, बाजारभाव समाधानकारक नाही. एखाद्या पिकाला चांगला भाव मिळाला की, संबधित व्यावसायिक सरकारकडे जाऊन भाव कमी करण्याची मागणी करतात, त्यामुळे पुन्हा भाव पडतात. महागाई प्रचंड वाढली आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण होत आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी असलेल्या अनेक योजना ‘भाकड’आहे. अरविंद तट्टे, लेहगाव, शेतकरी तथा कृषी अभ्यासक.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares