गाऱ्हाणे: शेतीला दिवसा वीजपुरवठा द्यावा, दुधाला एकसमान दर मिळावा; बहिरोबावाडीतील शेतकऱ्यांचे कृषी आयुक्त धी… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
महाडिबीटी योजनेची कागदपत्रे अपलोड करण्याचा कालावधी १० वरून ३० दिवस करावा, दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, उत्पन्नवाढीसाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करावे, दुधाला एकसमान दर, बचत गटाच्या माध्यमातून छोट्या-मोठ्या उद्योगांना चालना द्यावी, आदी मागण्यांचे साकडे बहिरोबावाडी (या. पारनेर) येथील शेतकऱ्यांनी राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांना घातले.
कृषी आयुक्तांनी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचे आदेश दिले. गावपातळीवर जर समस्येचे निरसन झाले नाही, तर वरच्या स्तरावरून त्या समस्या सोडवल्या जातील, असे आश्वासन कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी शेतकऱ्यांना दिले.
शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम राज्यभर राबवण्यात येत आहे. राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी बहिरोबावाडीतील श्रीबहिरोबा मंदिरात ग्रामसभा घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी त्यांना अडचणी सांगितल्या. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या सर्व पिकांना हमीभाव मिळावा, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी कृषी आयुक्तांकडे केली. तसेच वाटाणा, फूलशेती या पिकांना पीकविम्यात समाविष्ट करावे, ठिंबक सिंचनच्या धर्तीवर शेततळे प्लास्टीक अस्तरीकरणासाठी अनुदान मिळावे (७ वर्षानंतर), पाणंद रस्ते, शिव रस्ते व शिवार रस्ते हे खुले करून द्यावेत. शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी सीताराम देठे यंनी सर्व अडचणी सोडवण्याची मागणी केली.
यावेळी विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनीही शेतकर्‍यांशी संवाद साधला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी शंकर किरवे, तालुका कृषी अधिकारी विलास गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी अरुण साठे, शेतकरी सीताराम देठे, बाबासाहेब व्यवहारे, उपसरपंच हरिराम खोडदे, अनिल देठे, विठ्ठल देठे, आदिनाथ व्यवहारे, ज्ञानेश्‍वर डुकरे, कृषी सहायक माधुरी बोरुडे, अश्विनी भुजबळ, गजानन घुले, महेश बनकर, शंकर व्यवहारे, मल्हारी व्यवहारे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. आभार शेतकरी सीताराम देठे यांनी मानले.
शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या
कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे आदेश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी धीरज कुमार यांनी वस्तीवरील शेतकऱ्यांसमवेत भोजन घेतले. ग्रामीण भागात रात्री वीज नसल्यानंतर नागरिक अंधारात कसे राहत असतील, शेतकऱ्यांना किती अडचणींना सामोरे जावे लागते, याचा प्रत्यक्ष अनुभव कृषी आयुक्तांनी घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares