दिव्य मराठी स्टिंग: हॅलो, मी तणावग्रस्त शेतकरी आहे, मनात आत्महत्येचा विचार येतोय.. हेल्पलाइन : समुपदेशक सध्… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
देशात सर्वाधिक आत्महत्या होणाऱ्या महाराष्ट्रात आरोग्य विभागाच्या १०४ या हेल्पलाइनवर काउन्सेलिंगच्या (समुपदेशन) नावाखाली केवळ कोरडी औपचारिक पूर्तता केली जात आहे. आत्महत्यांत शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे असल्याने “दिव्य मराठी’ने हेल्पलाइनची पडताळणी केली असता “सावकारांकडून पैसे घेतले असतील तर ते मागणारच’, “सरकारी योजनांसाठी आशा वर्करला भेटा’, असे सल्ले देण्यात आले. विशेष म्हणजे मदत मागणाऱ्याचे नाव, फोनची नोंद करूनही सरकारच्या वतीने कोणताही पाठपुरावा करण्यात येत नसल्याचे उघड झाले.
१० सप्टेंबरला जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन पार पडला. आता या हेल्पलाइनद्वारे कित्येक हजार तणावग्रस्तांना मदत केल्याची आकडेवारी प्रसिद्ध केली जाईल. मात्र, फोन केलेल्यांपैकी किती लोक आत्महत्येपासून परावृत्त झाले याचे आकडेही उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात किती फोन आले याच आकडेवारीची नोंद ठेवली जाते. विशेष म्हणजे आत्महत्येचे विचार येतात या उद्विग्न अवस्थेत फोन करणाऱ्यास “काउन्सेलर बिझी आहेत, अर्ध्या तासाने फोन करा’ असे उत्तर देण्यात आले. त्यानंतरही या फोनवरून कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा करण्यात आला नाही की सरकारी पातळीवर मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत.
१०४ हेल्पलाइनवर अजब सल्ले, काउन्सेलिंग कमी आणि कोरडे बोल अधिक
(104 हेल्पलाइनवर तणावग्रस्तांचे काउन्सेलिंग (समुपदेशन) कशा प्रकारे केले जाते याच्या पडताळणीसाठी दै. दिव्य मराठीच्या वार्ताहराने आपण तणावग्रस्त शेतकरी असल्याचे सांगून फोन केल्यानंतर आलेल्या अनुभवाचा संपादित भाग)
ऑपरेटर : नमस्कार, १०४ आरोग्यसेवा संपर्क केंद्रात आपले स्वागत आहे, काय माहिती पाहिजे?
रिपोर्टर : तणावग्रस्त शेतकऱ्याला आपण काय मदत कराल?
ऑपरेटर : तुम्हाला काउन्सेिलंग हवंय का? त्यासाठी आहे हा नंबर, पण सध्या एका पेशंटचा कॉल सुरू आहे. तोपर्यंत तुमचंं नाव, जिल्हा, तालुका सांगा… काउन्सेलर सध्या बिझी आहेत. अर्ध्या तासाने कॉल करा.
रिपोर्टर : तुम्हीच कॉल कराल का?
ऑपरेटर : नाही, तुम्हीच तिकडून करा. आपल्याकडे मानसोपचारतज्ज्ञ आहेत. ते तुमचे समुपदेशन करतील.
अर्ध्या तासाने पुन्हा फोन केल्यावर..
ऑपरेटर : नमस्कार, १०४ आरोग्य सेवेत स्वागत आहे. तुम्ही नामदेव खेडकर बोलत आहात, औरंगाबादहून. तुम्हाला काय माहिती हवी आहे?
रिपोर्टर : शेतात खूप नुकसान झालंय, कर्ज झालंय. वाटतं आत्महत्या करावी.
ऑपरेटर : आपल्याकडे काउन्सेलर आहेत. ते काउन्सेलिंग करतील. त्या विभागात मी तुमचा कॉल ट्रान्सफर करीत आहे. मॅडमशी बोला.कॉल ट्रान्सफर करण्यात आला
काउन्सेलर : काय काम करता?
१०४ ची माहिती कुठून मिळाली?
रिपोर्टर : जिल्हा रुग्णालयातून.
काउन्सेलर : काय समस्या आहेत?
रिपोर्टर : कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करावीशी वाटते.
तुमच्याकडे काही तोडगा आहे का?
काउन्सेलर : तुमची अपेक्षा काय आहे? कोणत्या प्रकारचा तोडगा हवा आहे? विचारांबद्दल हवा आहे की कर्जाबद्दल हवा आहे?
रिपोर्टर : बाहेरून पैसे काढलेत ते लोक त्रास देतात घरी येऊन. बँकवाले सारखे त्रास देतात. फोन करतात. नोटीस देतात. माझ्याकडे आता पैसे तर नाहीत. वाटतंय झंझट नको. जीवच देऊ..
काउन्सेलर : कधीपासून हे विचार येतात? किती कर्ज आहे?
रिपोर्टर : दोन-तीन महिन्यांपासून. बाहेरचे अडीच लाख कर्ज आहे.
काउन्सेलर : किती शेती आहे? वार्षिक उत्पन्न येत नाही का?
रिपोर्टर : साडेतीन एकरात सोयाबीन, कापूस घेतो. या वर्षी अतिवृष्टीचा फटका बसलाय.
काउन्सेलर : कोणत्या बँकेतून कर्ज घेतलं? बँकेतल्या लोकांना भेटलात का? त्यांना शेतीचे पुरावे दिले तर अधिकारी मागे लागणार नाहीत.
रिपोर्टर : सारखे विचारतात. दुसऱ्या कामाला गेलो तरी उभं करत नाहीत.
काउन्सेलर : तुम्ही वरच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकता. तुमच्या गावात कृषी सहायक येतात. त्यांच्याशी एकदा बोलून घ्या. तुमच्या शेतातल्या अडचणी त्यांना सांगा. आत्महत्येचे विचार येणे आणि कष्ट करून पैसे फेडणे हे वेगळे आहे.
रिपोर्टर : व्याजाने दिलेल्या पैशांसाठी सावकार तगादा लावत आहेत.
काउन्सेलर : खासगी सावकाराकडून तुम्ही घेतले असतील तर ते मागणारच. त्यांना त्यांच्या पैशाची भीती आहे. खासगीत ज्यांच्याकडून कर्ज घेतले त्यांना सांगून ठेवा, मी दोन-चार वर्षे देऊ शकत नाही. तुमच्या ग्रामपंचायतीत एकदा जाऊन या. सरपंचांचं माझ्याशी बोलणं करून द्या.
रिपोर्टर : हे सर्व करून थकलो आहे मॅडम मी.
काउन्सेलर : एकदा मानसिक आजाराच्या डॉक्टरांनाही भेटा. आत्महत्येचे तुमचे विचार कमी होतील. कर्ज कसं फेडायचं याबद्दल चर्चा केल्याशिवाय, इन्कम सोर्स बदलल्याशिवाय आपल्याकडे पैसे तर येत नाहीत. इथून तुम्हाला पैशाची कोणतीही मदत होत नाही. कृषी सहायकांना तुमच्या गावात बोलावून घ्या.
रिपोर्टर : बोलवून घ्यायला आम्ही काय मुख्यमंत्री आहोत? त्यांच्याकडे गेलो तरी ते भेटू देत नाहीत. सरकारची काही स्कीम नाही का शेतकऱ्याला मदत करायची?
काउन्सेलर : आशा वर्करकडे सगळी माहिती दिली आहे. त्यांना भेटा. त्यांचं माझ्याशी बोलणं करून द्या.
रिपोर्टर : ती काय मदत करणार? बाकी तुमच्याकडून कोणती मदत नाही का होणार?
काउन्सेलर : समुपदेशन हीच मदत आहे. त्यात आम्ही जे मार्ग सांगतोय, त्यात तुम्हीच अडचणी निर्माण करीत आहात.
रिपोर्टर : मला वाटलं, तुम्ही शेतकऱ्यांना मदत करायला आहात.
काउन्सेलर : शेतकऱ्यांना मदत करण्यासाठीच हे आहे. तुम्हाला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी, सरकारी योजनांची मदत घेण्यासाठी मी प्रवृत्त करते आहे. पण तुम्ही त्यात अडचणी सांगत आहात. एकदा आशा वर्करचं व तुमच्या घरातल्यांचंं बोलणं करून द्या. तुम्हाला कशी मदत करायची हे आम्ही त्यांच्याशी बोलू. तुम्ही एकदा मानसिक आजाराच्या डॉक्टरांशी बोलून घ्या.
रिपोर्टर : हा नंबर २४ तास चालू असतो का?
काउन्सेलर : शारीरिक आजारासाठी २४ तास. मानसिक आजारासाठी सकाळी ७ ते रात्री ९. धन्यवाद १०४ मध्ये कॉलमध्ये कॉल केल्याबद्दल.
कॉल संपला.
तो गोल्डन अवर महत्त्वाचा
आत्महत्येचा निर्णय झाल्यानंतर शेवटच्या टोकाला असताना व्यक्ती अशा हेल्पलाइनशी संवाद साधतात तेव्हा त्यांना तातडीने धीर देणे काउन्सेलिंगमध्ये अभिप्रेत असते. तणावातील व्यक्तीने समुपदेशकाला फोन केल्यानंतर त्याला अर्धा तास थांबा, असे म्हणणे चुकीचे आहे. या गोल्डन अवरमध्ये तो आत्महत्या करू शकतो. त्यामुळे त्याला अधिकाधिक वेळ बोलतं ठेवणं, तणाव दूर करणं महत्त्वाचं असतं.’-डॉ. संदीप सिसोदे, अध्यक्ष, मानसतज्ज्ञ असोसिएशन, महाराष्ट्र
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares