मुक्तिसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष: सिंचन, शिक्षण, आरोग्य क्षेत्रात मोठे बदल हवे; आयुक्त, उद्योजक, विरोधी … – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
मराठवाड्यातील सिंचन, शिक्षण, आरोग्य क्षेत्रात मोठे बदल हवेत अशी अपेक्षा विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उद्योजक राम भोगले यांनी दिव्य मराठी डिजिटलशी बोलताना व्यक्त केली.
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने दिव्य मराठी डिजिटलने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर एक वर्षांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निझामाच्या जोखडातून मुक्त झाला. मराठवाड्याच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष शनिवारी (17 सप्टेंबर) सुरू होत आहे. मात्र, अजूनही मराठवाड्यात अनेक समस्या प्रलंबित आहेत. शेती आणि शेतकऱ्यांची अवस्था फार बदललेली नाही. मोठ्या प्रमाणावर शिक्षण संस्था निर्माण झाल्या असल्या तरी आजही शिक्षणात म्हणावी तशी प्रगती आपण करू शकलेलो नाही. याच पार्श्वभूमीवर आम्ही मान्यवरांना बोलते केले.
शेती, शिक्षणात बदल हवा
मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर अडचणी आहेत. अनेक सुधारणा करण्याची गरज आहे. मात्र माझ्या मते मुख्यत: दोन प्रमुख समस्या सद्यस्थितीत मला दिसून येत आहेत. त्यात पहिली समस्या कृषी समस्या आणि दुसरी म्हणजे मराठवाड्यातील शिक्षण व्यवस्था. मराठवाड्यात सिंचनाचे प्रमाण फार कमी आहे. यात फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आपल्याला करावी लागणार असल्याचे मत मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले.
शेतीचे प्रश्न सोडवण्याची गरज
आपला मराठवाडा हा बऱ्याच वेळा दुष्काळग्रस्त असतो. दोन ते तीन वर्षे चांगले पीक येते. त्यानंतर पुन्हा एक शॉक बसतो आणि आधीच्या २-३ वर्षांचा फारसा काही उपयोग होत नाही. आणि शेतकरी पुन्हा दारिद्र्याच्या गर्तेत लोटला जातो. शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे मला असे वाटते की, जोपर्यंत पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी आपण इथपर्यंत आणत नाही. ते फिरवत नाही, तोपर्यंत सिंचनाचे प्रश्न सुटणार नाही.
हक्काचे पाणी देण्यासाठी प्रयत्न
मध्य गोदावरी क्षेत्रात जी तुट आहे वरच्या क्षेत्रात धरण बांधल्यामुळे ती निर्माण झाली आहे. किंवा हक्काचे पाणी शेतकऱ्याला मिळत नाही. त्याच्यात जोपर्यंत भर पडत नाही. इरिगेशनची सुविधा वाढत नाही. तोपर्यंत मराठवाड्यातील मूलभूत प्रश्न सुटणार नाही.
मालवाहतुकीचा प्रश्न सुटेल
त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे रस्त्यांचा. शेतकऱ्यांना चांगले रस्ते नाहीयेत. यामध्ये मातोश्री पाणंद रस्ते योजना जी आहे त्यातून आपण रस्ते करण्याचा प्रयत्न करत आहोत. याशिवाय शेतकऱ्यांसाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. यात मुख्यत्वे पाणी कसे आणता येईल? यासंदर्भात काम करणारी अनेक लोक आपल्याकडे आहेत. नागरे म्हणून अधिकारी तसेच इतर तज्ज्ञ मंडळी यावर सतत काम करत आहेत. याबाबत आमचा अभ्यास सुरु आहे. सरकारशी चर्चा झाली आहे. याबाबत सरकारचे मत सकारात्मकच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भेडसावणारी पाणी समस्या सुटेल. आता रस्तेही मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा मालवाहतूकीचा प्रश्न सुटेल.
शिक्षणावर विशेष फोकस
मराठवाड्यातील यानंतर मराठवाड्यातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे शिक्षणाचा दर्जा वाढवण्याची गरज आहे. यावर आम्ही काम करत आहोत. शाळांमध्ये लायब्ररी, लॅबोरेटरी, अॅस्ट्रोनॉमी ग्लास झाले पाहिजे. अंकगणित, इंग्रजी यात विद्यार्थी कुशल झाले पाहिजे. याबाबतीत आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रश्न, समस्या या खूप आहेत मात्र शिक्षणाचे आणि सिंचनाचे दृढीकरण झाले पाहिजे.
शिक्षण व्यवस्था बदला
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाचे 75 वर्षे पूर्ण होत आहे. या अमृत महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीला मला मुख्यतः तीन समस्या आपल्यासमोर दिसतात. त्यातली पहिली म्हणजे पाण्याची त्रुटी, दुसरी फायनान्शियली व्हायबल शेती, तिसरी समस्या म्हणजे मराठवाड्यातील तरुणांना याचठिकाणी रोजगार मिळायला हवा. रोजगार निर्मितीच्या दिशेने पाऊल पडायला हवे. या तिन्ही प्रश्नांची उत्तरे सरकारकडे असतात असा एक आपला समज आहे. मात्र हा समज दूर व्हायला हवा, असे मत प्रसिद्ध उद्योजक राम भोगले यांनी व्यक्त केले.
पाण्याच्या संदर्भात अनेक आंदोलने झाली. समन्वयी पाणी वाटपाचा कायदा 2005 मध्ये आला. पण त्यानंतरही हे समन्वयी पाणी वाटप कसं व्हाव याबाबत प्रश्न अनुत्तरित आहेत. अर्थातच गेल्या 4 वर्षात झालेल्या पावसामुळे हे प्रश्न आपल्याला जाणवत नाहीये. पण त्यावर्षी कमी पाऊस पडेल त्यावर्षी निश्चितच हे प्रश्न आपल्याला भेडसावणार आहेत. त्यामुळे यावर उत्तर म्हणून ज्यावेळेला भरपूर पाणी आहे त्याचवेळी शोधून ठेवणं. आणि यावर उपाययोजना करणे हे महत्त्वाचे आहे.
अज्ञान दूर करा
यात सरकारचा सहभाग लागेलच. मात्र मराठवाड्यातील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी एकत्र येऊन यावर काम करायला सुरुवात करायला हवी. आपल्या पाणी वापराच्या सवयी आपण बदलायला हव्या. जसे पाणी अडवा पाणी जिरवा याचा वापर करायला हवा. इस्त्रायलमध्ये दिड इंच पाऊस पडतो तिथेच मराठवाड्यात 20 इंच पाऊस पडतो. त्यामुळे आपल्याकडचे अज्ञान दूर झाले तर पाण्याची त्रुटी दूर होईल.
फायनान्शियली व्हायबल शेती
आपल्याकडे रोजगारनिर्मिती नाही तसेच आपल्याकडे होणारी शेती ही त्रुटीची आहे. या दोन समस्यांचे उत्तर एकमेकातच गुंफलेले आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची मानसिकता बदलणे. ते ज्या पद्धतीने शेती करत आहेत त्यात प्रत्येकाला परवडेल अशा पद्धतीने शेतीचे प्रकार येथील शेतकऱ्यांना शिकवणे महत्त्वाचे आहे. यामध्ये सरकारपेक्षाही शेतकरी आणि तरुणांचा सहभाग महत्त्वाचा आहे. शेती हा एक असा व्यवसाय आहे जो अनादिकालापासून चालत आला आहे. त्याला अंत नाही. यात जर मराठवाड्यातील तरुण उतरला आणि त्याने त्यातून जर फायनान्शियली व्हायबल शेती करण्याचे मार्ग शोधून काढले तर मराठवाड्यातील तरुणांना रोजगारासाठी इतरत्र जाण्याची गरज पडणार नाही. ग्रामीण भागातील तरुणांनाही रोजगार उपलब्ध होऊ शकेल.
मानसिकता बदलू
हे कसे घडेल तर मराठवाड्यातील लोकांची निजामकालीन राज्यामुळे किंवा सातआठशे वर्षाच्या गुलामीमुळे जी मानसिकता तयार झाली आहे. ती बदलायला हवी. यासाठी आपल्या शिक्षण पद्धतीत बदल घडायला हवा. आपल्याकडे अनेक 100 वर्षे जुन्या शिक्षण संस्था देखील आहेत मात्र मानसिकता बदलण्याचे काम त्या करु शकल्या नाहीत. आम्ही मागासलेले आहोत. सरकारी मदतीशिवाय आम्हाला कुठलेही काम करता येणार नाही, कोणीतरी बाहेरुन येऊन आम्हाला मदत करावी, बँकांकडून कर्ज घेतल्याशिवाय आमचे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट सुधारणार नाही या सर्व भ्रामक समजुती आहेत.
शैक्षणिक धोरण स्वीकारू
समाजाची मानसिकता बदलली, पौरुषार्थ निर्माण झाले जे की शिक्षणातून निर्माण होते तर हाच समाज मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करेल. त्यामुळे मराठवाड्याच्या शैक्षणिक संस्थांच्या मानसिकतेत, काम करण्याच्या पद्धतीत मोठे बदल होणे आवश्यक आहे. आणि हे बदल करण्याची संधी नवीन शैक्षणिक धोरणाने मिळवून दिली आहे. आपल्याकडच्या विद्यापीठ, शाळांमध्ये या धोरणानुसार बदल व्हायला हवे.
खेड्यांमध्ये दवाखाने नाहीत
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंशी संवाद साधला ते म्हणाले, रजाकाराच्या तावडीतून हैदराबाद संस्थान मराठवाडा मुक्त झाला. मात्र अजूनही याठिकाणी अनेक ज्वलंत समस्या आहेत. शिक्षणाच्या समस्या, वैद्यकीय समस्या प्रलंबित आहेत. निश्चित काही महाविद्यालय सुरु झाले. मात्र याठिकाणी मराठवाड्यातील किती मुले शिकतात. अभियांत्रिकीचेही तेच. महाविद्यालये आहेत, मात्र मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना याचा किती फायदा होतो. ही समस्या आहे.
कित्येक शहरे मागासलेली
सिंचनाची समस्या आहे. मराठवाड्याला त्याच्या हक्काचे पाणी अजून मिळालेले नाही. न्यायालयाने सांगूनही यात काहीही फरक पडलेला नाही. वरती ते अडवण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सिंचन, शिक्षण या विषयांमध्ये मोठे काम करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे औद्योगीकरणातही व्यापक प्रगती झालेली नाही. औरंगाबाद, लातूर, नांदेड या मोजक्या शहरांमध्ये उद्योग दिसतात. मात्र अजूनपर्यंत परभणी, बीड, हिंगोलींसारख्या शहरांमध्ये औद्योगीकरण झालेले नाही.
मोठे काम करण्याची संधी
येणाऱ्या काळात यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. त्याचप्रमाणे हे कसे होईल तर शिक्षण आवश्यक आहे. येणाऱ्या काळात शिक्षणाच्या कक्षा रुंदावल्या तर हा विकास होऊ शकतो. आजही मराठवाड्यातील कित्येक गावं अशी आहेत जिथून उपचारांसाठी औरंगाबादमध्ये यावे लागते. ही खरी परिस्थिती आहे. अजून खूप मोठे काम करण्याची संधी मराठवाड्यात आहे. निश्चित येणाऱ्या काळात हे काम आपल्या सगळ्यांच्या हातून घडावं, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न राहिल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares