राजकीय सोयींमूळेच गदारोळ – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
राजकीय सोय पाहिल्यानेच सभेत गदारोळ

जिल्हा बँक वार्षिक सभा; मुश्रीफांचा स्वतःच्याच आवाहनाला छेद, स्वाभिमानीची काढली हवा
सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : आयत्या वेळच्या विषयांवर चर्चा नाही, सभासदांनी दिलेल्या लेखी प्रश्‍नांची उत्तरे दिली नाहीत, तसेच आभार न मानताच जिल्हा सहकारी बॅंकेची सर्वसाधारण सभा गुंडाळली. त्यामुळे सभेत सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिली जातील, सभासदांचे समाधान झाल्याशिवाय सभा संपणार नाही, असे छातीठोकपणे सांगणाऱ्या अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी स्वत:च्याच आवाहनाला छेद दिला. एकीकडे बॅंक प्रगती करीत असताना दुसरीकडे सभेत आज झालेला गदारोळ हा कारभारावरून नव्हे, तर केवळ राजकीय सोय पाहिल्यानेच झाला आहे. याचवेळी यंदा एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा करून शेतकरी संघटनेच्या भविष्यात होणाऱ्या आंदोलनाची हवाही काढून घेतली.
सभा सुरू होण्यापूर्वी अध्यक्ष मुश्रीफ यांनी सभासदांच्या प्रश्‍नांची उत्तरे दिली जातील, त्याशिवाय सभा संपणार नाही, अशी घोषणा करून टाळ्या घेतल्या. आतापर्यंत झालेल्या वार्षिक सभेत सर्व प्रश्‍न ऐकून त्यावर उत्तरे दिली जात होती. यंदा मात्र अपवाद ठरला. बॅंकेचा कारभार चांगला आहे. बॅंक निश्‍चितपणे शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना आणत आहे; पण संचालक वाढविणे आणि कृषी पणन व प्रक्रिया संस्था गटाच्या विभाजनावरून गदारोळ झाल्याने सभेला गालबोट लागले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍याचा आणि प्रत्येक गावचा कारभार सांभाळणाऱ्या नेतेमंडळींसमोरच सभासदांकडून माईक खेचाखेची आणि हमरी-तुमरी झाली. वास्तविक, विद्यमान २१ संचालकांनी बॅंकेचा कारभार चांगला चालविला आहे. यात कोणाचे दुमत असायची गरज नाही. आता नव्याने चार संचालकांची गरज काय, हा मुद्दा महत्त्वाचा आहे; पण गेल्या निवडणुकीत जागावाटपावरून झालेल्या गोंधळामुळे आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या पॅनेलमधून बाहेर पडून खासदार संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर आणि अर्जुन आबिटकर विजयी झाले. आता ही समस्या भविष्यात येऊ नये, यासाठी जागा वाढविली असावी, असा कयास लावू शकतो. स्वाभिमानी शेतकरी संघटना यंदाच्या हंगामात एकरकमी ‘एफआरपी’साठी जिल्हाभर सभा घेत असतानाच बॅंकेचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील सर्व कारखाने एकरकमी एफआरपी देणार असल्याची घोषणा करून संघटनेच्या आंदोलनाची हवा काढून घेतली आहे.
मुश्रीफांचा यू टर्न
आम्ही तीन मिनिटांत राष्ट्रगीत लावून गोकुळ सभा संपविणार नाही, असे म्हणणाऱ्या आमदार हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बॅंकेत आयत्या वेळचे प्रश्‍न, सभासदांनी दिलेल्या लेखी प्रश्‍नांची उत्तरे आणि आभार प्रदर्शनाला मात्र बगल दिली. या सर्वांवर चर्चा करण्याआधीच राष्ट्रगीत सुरू करून सभेची सांगता केली. त्यामुळे मुश्रीफ यांच्या या यू टर्नची चर्चा सुरू राहिली.
मुश्रीफांचे कौतुक
जिल्ह्यातील साखर कारखाने यंदाच्या हंगामात एकरकमीच एफआरपी देणार असल्याची घोषणा केली, हे निश्‍चितपणे कौतुकास्पद आहे. राज्यात कोल्हापूर जिल्हा वगळता एकरकमी एफआरपी देण्याची पहिली घोषणा मुश्रीफ यांनीच केली.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares