केळीच्या पानावर गुणकारी पंगत – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
वैभवी शिंदे ः सकाळ वृत्तसेवा
नेरूळ, ता. १७ ः हिंदू धर्मात श्राद्ध करण्याला खूप महत्व आहे. पितृपक्षात श्राद्ध केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते, असे मानले जाते. मात्र, पितृ पक्षाच्या जेवणातील पदार्थ प्रांतानुसार आणि पद्धतींनुसार बदलतात. काही ठिकाणी कांदा लसूण विरहित स्वयंपाक केला जातो. यासाठी केळीच्या पानांना पंसती मिळत आहे. कारण आरोग्याच्यादृष्टीने देखील भारतीय संस्कृतीमध्ये केळीच्या पानाला देखील फार महत्त्व आहे.
———————————————–
पूर्वी भांड्यांच्या ऐवजी केळीच्या पानावर जेवण केले जायचे. केळीच्या पानावर पाणी टिकत नाही, तसेच ते गुळगुळीत असते. त्यामुळे ते नेहमी स्वच्छ असते. म्हणूनच केळीच्या पानांवर जेवण्यास पसंती दिली जायची. भांड्यांत जेवणानंतर ते धुण्या-घासण्याचे कष्ट पडतात आणि त्यासाठी खर्चही येतो. या पानांना जनावरे खात असल्यामुळे एकदा वापरल्यानंतर जनावरांकडून त्याचा फडशा पाडला जातो. त्यामुळे कचरा किंवा प्रदुषणाचीही शक्यता नसते. त्यामुळे हल्ली अनेक घरांमधून केळीच्या पानांवर जेवणाला पसंती दिली जात आहे. नैवेद्य दाखवायचा असो किंवा ब्राह्मणाला जेवायला घरी बोलवायचे असेल तेव्हा देखील केळीचे पान वाढून नैवेद्य दाखवला जातो. केळीचे पान हे पवित्र व चैतन्ययुक्त असते. केळीचे पात्र सात्विक असल्याने जेवणाऱ्या व्यक्तीचे शरीर आणि मनात सात्विकता वाढते. तसेच मन शुद्ध होते आणि ते शांत राहते. केळीच्या पानांमुळे शरीराची शुद्धी होते. तसेच या पानांवर गरम जेवण वाढल्याने पानांमधील पोषणतत्वे अन्नात मिसळत असल्याने शरीरासाठी ते पोषक असतात.
————————————
आरोग्याच्यादृष्टीने उपयुक्त
केळीच्या पानावर जेवण केल्यास डाग, खाज, पुरळ, फोड असे समस्या दूर होतात. यामुळे केळीच्या पानावर जेवण करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. यामागे धार्मिक तसेच वैद्यकीय कारणेही आहेत. शहरातील अनेक लहान-मोठ्या तसेच ब्रॅण्डेड हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये केळीच्या पानांचा वापर करण्यात येतो.
———————————
पालघर, वसई, गुजरातमधून विक्री
केळीची पाने मोठ्या प्रमाणात पालघर, वसई, गुजरात येथून विक्रीसाठी येतात. व्यापारी स्वतः जाऊन तेथील आदिवासी पाड्यातून केळीची पाने विकत घेतात. किंवा तेथील शेतकरी स्वतः लहान ट्रक करून किंवा खाजगी वाहनातून ही पाने विक्रीसाठी मार्केटला घेऊन येतात.
——————————————
सणासुदीच्या दिवसात ५० ते १०० गठ्ठे तर एरवी दिवसभरातून १० ते १२ गठ्ठे विकले जातात. साधारण २०ते ३० रुपयांना एक गठ्ठा विकला जातो. एका गठ्ठ्यात १५ ते २० पाने असतात. पितृपक्षामुळे पानांना मागणी आहे. त्यामुळे बाजारात केळीच्या पानांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
-जितेंद्र बाळसराफ, व्यापारी, वाशी मार्केट
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares