दुग्ध स्पर्धेत टिकण्यासाठी आधुनिक साधनांचा वापर गरजेचा – तरुण भारत

Written by

प्रतिनिधी/कोल्हापूर
भारतातील दुग्धव्यवसाय आणि इथल्या कृषी संस्कृतीमुळेच ग्रामीण अर्थव्यवस्था शाश्वत बनली आहे. पण दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर बनवण्यासाठी आणि जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी त्यामध्ये आधुनिक साधनांचा वापर करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. चेतन नरके यांनी केले. आंतरराष्ट्रीय डेअरी महासंघाच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित जागतिक डेअरी शिखर संमेलनातील तांत्रिक परिषदेत ‘डेअरी उद्योगातून निर्माण झालेले ग्रामीण भागातील पर्यावरणपूरक आणि शाश्वत अर्थचक्र’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

डॉ. नरके म्हणाले, डेअरी क्षेत्राचे संघटीत स्वरूप जिल्ह्याच्या एकात्मिक विकासाला हातभार लावून ग्रामीण अर्थव्यवस्थेत एक नवा मानदंड निर्माण करू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाकडे पाहता येईल. शेतकरी आत्महत्या ही भारतातील एक प्रमुख समस्या आहे. पण पश्चिम महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायामुळे येथील एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही. यावरून निरोगी समाजव्यवस्था आणि शाश्वत अर्थचक्र निर्माण करण्यातील डेअरी उद्योगाचे योगदान लक्षात येते. 7 लाखाहून अधिक शेतकरी आणि हजारो उद्योजकांची यशोगाथा गोकुळमुळे निर्माण झाली आहे.
हे ही वाचा : सातारा हाफ हिल मॅरेथॉनमध्ये धावताना कोल्हापुरातील तरुणाचा मृत्यू
ज्या देशाचे कृषी क्षेत्र मजबूत त्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत असते. भारतात अर्ध्याहून अधिक जनसंख्या ही कृषी व्यवस्थेवर आधारित आहे. 5 ट्रीलिअन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट समोर ठेवलेले असताना ते साध्य करण्यासाठी भारताला देखील कृषी आणि डेअरी उद्योगाचे महत्व प्रामुख्याने लक्षात घेतले पाहिजे. आज 210 मिलिअन मेट्रिक टन उत्पादनामुळे दूध उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर असणाऱ्या देशासमोर येत्या 10 वर्षात 333 मिलिअन मेट्रिक टन दूध उत्पादनाचे आव्हान आहे.

खाद्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून रोग प्रतिकारक क्षमता वाढवणे, वातावरणीय बदलाचा परिणाम दूध उत्पादनावर होऊ नये म्हणून कृत्रिम उपाययोजना करणे, लम्पी सारख्या अचानक पणे उदभवणाऱ्या आजारांना आणि नैसर्गिक संकटाना तोंड देण्यासाठी प्रभावी आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा उभी करणे. पशुधनाचे डिजिटल ओळखपत्र तयार करणे, बॅलन्स डेअरी इको सिस्टीम निर्माण करणे, या साखळीतील प्रत्येक घटकापासून मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती करत अधिक नफ्याचे गणित साध्य करणे अशी आव्हाने समर्थपणे पेलावी लागतील. यासाठी पुढच्या काळात शासन, प्रशासन आणि याक्षेत्राशी निगडीत सर्व घटकांनी एकत्र येऊन दीर्घकालीन कृती आराखडा आणि डेअरी क्षेत्राच्या विकासासाठी पोषक धोरणे आखण्याची भूमिका घेतली पाहिजे.

यावेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर, केंद्रीय पशुसंवर्धन विभागाच्या सचिव वर्षा जोशी, एन.डी.डी.बी.चे टीम लीडर नरेंद्र कराडे, रिजर्व बँकेच्या केंद्रीय मंडळाचे संचालक सतीश मराठे, मारुती सुझुकी चे संचालक केंचुरो टोयोफुको, नेदरलँड मधील जागतिक अभ्यासक अलार्ड एस्लिंक यांच्यासह डेअरी उद्योगातील तज्ञ उपस्थित होते.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares