कृषिपंप, स्टार्टर चोरी रोखणारे स्टार्टअप – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
औरंगाबाद : शेती फुलविण्यात पंप हा शेतकऱ्यांसाठी मोठा आधार आहे. कृषिपंप नादुरुस्त झाल्यास तो वेळेवर पुन्हा सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागते. त्याशिवाय पंप आणि त्याचा स्टार्टर चोरीच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे हतबलता येते. या सर्व बाबींवर संशोधन करून येथील तरुण कुलदीप दिलीप वाघ यांनी ‘स्मूथ स्टार्टर’ तयार केले आहे.
स्मूथ स्टार्टर ॲपच्या माध्यामतून नियंत्रण करता येते. चोरट्यांनी किंवा कुणीही पंपाला वीजपुरवठा करणारी केबल कापली, छेडछाड केली तर लगेच मोबाइलवर संदेश (नोटिफिकेशन) येईल. ॲपमधील बटण रेड होऊन रिंग वाजेल. नेमके काय झाले, पंप कुठे नेला आदींची माहिती शेतकऱ्याला कळेल. तीन ते साडेसात आणि दहा ते पंधरा अश्वशक्तीच्या (एचपी) पंपासाठी हे स्टार्टर तयार करण्यात आले आहे. सोबतच कुलदीपने वायरलेस सेन्सर तयार केले आहे. त्यातून जमिनीचा ओलावा, आर्द्रता, तापमान, ड्रीप व्हॉल्व्ह ऑन ऑॅफ करता येणार आहे. असा दोन हायटेक संशोधनाद्वारे त्यांनी ‘स्मूथ स्टार्टर’ हे स्टार्टअप सुरू केले आहे.
इलेक्ट्रॉनिक्समध्ये एमएसस्सी केलेल्या कुलदीप वाघ यांनी २०१४ पासून चार वर्षे इलेक्ट्रॉनिक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये नोकरी केली. आपणच स्वतःचे इलेक्ट्रॉनिक उत्पादन करावे या विचारातून त्यांनी स्मूथ स्टार्टरमध्ये पाऊल ठेवले. तत्पूर्वी शेतकऱ्यांच्या अडचणी, मार्केटचा अभ्यास केला. शेतकरी वापरत असलेले स्टार्टर, त्यातील अडचणी, समस्या जाणून त्यांना नेमके काय हवे आहे, याचा अभ्यास केला. कृषिपंप, स्टार्टर चोरीला जाणे ही शेतकऱ्यांसमोरील मोठी अडचण समोर आली. त्यातून आधुनिक तंत्रज्ञान वापरून स्मूथ स्टार्टर तयार केले वर्षभर विविध शेतकरी, पंप हाऊसमध्ये चाचणी केली. आढळलेल्या त्रुटी दूर करून त्याचे काही प्रमाणात आता उत्पादन सुरू केले आहे.
कुठेही असा, मिळणार माहिती
थॅरिस्टर टेक्नॉलॉजी वापरून स्मूथ स्टार्टर तयार केल्याचे कुलदीप सांगतात. कुठलाही हिसका न बसता पंप हळुवार सुरू होतो. त्यामुळे मोटार जळण्याचे प्रमाण कमी होईल. स्मूथ स्टार्टर ऑटो मॅन्युअली वापरता येईल. ते मोबाइलमध्ये वापरासाठी शेतकऱ्यांना देवांश टेक्नॉलॉजी नावाने ॲप डाऊनलोड करावे लागेल. लॉगइन केल्यानंतर पासवर्ड टाकावा लागेल. त्यामुळे स्टार्टरचे सर्व नियंत्रण शेतकऱ्याच्या हाती राहील. या ॲपमध्ये पंप सुरू आणि बंद करण्याची सोय आहे. पंप किती वाजता सुरू करायचा, किती वेळ सुरू ठेवायचा, कधी बंद करायचा यासाठी टायमरची सुविधा आहे. वीजपुरवठा आहे किंवा कसे, पुरेसे व्होल्टेज, फेज स्टेट्स, पंपाची स्थिती आदींचीही माहिती कुठेही असली तरी मोबाइलवर मिळेल. स्मूथ स्टार्टरला एलसीडी डिस्प्ले असून त्यावरही ही माहिती दिसेल. तामपान नियंत्रणासाठी स्मूथ स्टार्टरला छोटा फॅनही आहे.
मिळणार लोकेशन
स्मूथ स्टार्टरमध्ये चीफ असून पंप किंवा स्टार्टर चोरीस गेल्यास शेतकऱ्यांना लोकशन मिळेल. एखाद्या शेतकऱ्याकडे एकापेक्षा जास्त पंप, स्मूथ स्टार्टर असल्यास एकाचा ॲप्लिकेशनमधून ते ऑपरेट करता येतील. कोणत्या विहिरीवरील स्टार्टरला कोणते नाव द्यावे, याचीही सुविधा ॲप्लिकेशनमध्ये आहे. गरजेनुसार बॅटरी बॅकअपही दिला जातो.
वायरलेस सेन्सर
कुलदीप वाघ यांनी स्मूथ स्टार्टरसोबत शेतकऱ्यांना लाभदायी ठरेल असे वायरलेस सेन्सर तयार केले आहे. ते शेताच्या चारही बाजूने लावल्यास जमिनीचा ओलावा, आर्द्रता, तापमान तसेच ड्रिप व्हॉल्व्ह असेल तर तो चालू बंद करण्याची सुविधा या सेन्सरमधून मिळेल. हे सेन्सर स्मूथ स्टार्टरला सगळी माहिती पाठवेल, ती शेतकऱ्यांना ॲप्लिकेशनद्वारे बघता येईल. स्मूथ स्टार्टरसोबत हे खरेदी करण्याचे बंधन नाही.
स्मूथ स्टार्टरची वैशिष्ट्ये
ॲप्लिकेशनद्वारे पंप चालू – बंद करता येतो
पंप सुरू, किंवा बंद याची माहिती
फेज स्टेटस, व्होल्टेज, पंपाची स्थिती कळते
टायमरची सुविधा
केबल तुटल्यास, तोडल्यास संदेश
चोरी झाल्यास लोकेशन समजते
एकापेक्षा जास्त स्थूम स्टार्टर एकाच ॲप्लिकेशनद्वारे ऑपरेट करणे शक्य
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares