एकीला जिवंत जाळलं, तर दुसरीवर बलात्कार केला; म्यानमारच्या सैन्याचे नागरिकांवर अत्याचार – BBC

Written by

(या लेखात लैंगिक हिंसा आणि हिंसाचाराचा वारंवार उल्लेख आहे.)
म्यानमारच्या सैन्याने सामान्य नागरिकांवर अत्याचार केल्याचं, त्यांची हत्या केल्याचं कबूल केलं आहे. बीबीसीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी ही कबुली दिली आहे.
त्यांना अशी कृत्यं करायचा आदेश दिला होता. त्याबद्दल त्यांनी सविस्तर बीबीसीला सांगितलं. "आम्हाला निष्पाप लोकांवर अत्याचार करण्याचा, त्यांना मारण्याच आदेश दिला होता."
माँग ओ यांना असं वाटलं की त्यांना सैन्यात गार्ड म्हणून नोकरी मिळाली. मात्र मे 2022 मध्ये सामान्य नागरिकांना मारण्याच्या बटालियन मध्ये त्यांचा समावेश होता.
"आम्हाला सगळ्या पुरुषांना एकत्र करून मारण्याचा आदेश दिला होता. आम्हाला ज्येष्ठ नागरिक आणि स्त्रियांना मारण्याचा आदेश होता हा यातला सगळ्यात वाईट भाग आहे," ते सांगतात.
सुमारे सहा सैनिकांनी याबद्दल माहिती दिली आहे. त्यात कॉर्पोरल रँकचा अधिकारीसुद्धा आहे. या अत्याचाराच्या पीडितांनीसुद्धा त्यांची कथा सांगितली. या माहितीवरून सैन्याची सत्ता ताब्यात घेण्याची लालसा दिसून येते. या बातमीतील सर्व व्यक्तींची ओळख लपवण्यात आली आहे.
ज्या सैनिकांना अटक करण्यात आली आहे ते सध्या पीपल्स डिफेन्स फोर्सेसच्या (पीडीएफ) ताब्यात आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी सक्रिय असलेल्या सैनिकांचा हा गट आहे.
मागच्या वर्षी सैन्याने उठाव करून आंग सांग सू ची यांच्या नेतृत्वातील लोकशाही सरकार उलथवून टाकलं. आता या विरुद्ध होणारा उठाव दडपून टाकण्याच्या ते प्रयत्नात आहेत.
गेल्या वर्षी 20 डिसेंबरला मध्य म्यानमारमधील ये मयेत गावाला सैन्याने तीन हेलिकॉप्टरांनी वेढा घातला.
पाच स्वतंत्र लोकांनी बीबीसीला हा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यांच्या मते सैन्य तीन गटांत आले आणि त्यांनी पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलांवर बेछूट गोळीबार केला.
"जो दिसेल त्याला मारण्याचे आदेश दिला होता," कॉर्पोरल आँग यांनी म्यानमारच्या जंगलातल्या एका अज्ञात ठिकाणाहून ही माहिती दिली.
याच घरात मुलीला जाळून मारलं.
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा
भाग
End of पॉडकास्ट
ते म्हणाले की, "लोकांनी एक सुरक्षित जागा शोधली आणि तिथे लपण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा सैनिक जवळपास आले तेव्हा त्यांनी पळायला सुरुवात केली आणि आम्ही त्यांना मारायला सुरुवात केली."
आँग म्हणाले की, त्यांच्या युनिटने पाच लोकांना गाडून टाकलं. "आम्हाला त्या खेड्यातले सगळी मोठी घरं जाळायला सांगितलं होतं.
सैनिकांनी त्या खेड्यात घरांवर हल्ले करायला सुरुवात केली आणि 'जाळा, जाळा' असं ओरडू लागले. आँग यांनी चार ते पाच घरांना आगी लावल्या. ज्या लोकांची मुलाखत आम्ही घेतली त्यांनी सांगितलं की 60 घरं जाळण्यात आली. यामुळे अर्ध्याअधिक खेड्याची राख झाली.
त्या खेड्यातील बहुतांश लोक पळून गेली, पण सगळे नाही गेले. या खेड्यातल्या मध्यभागी असलेलं एक घर यातून सुटलं.
ताहिया नावाचे सैनिक आहेत. तो म्हणतो की, या धाडीच्या पाच महिने आधी त्याने सैन्यात प्रवेश केला. अनेकांसारखं त्यालाही या समुदायातूनच सैन्यात घेतलं होतं आणि त्याला कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण देण्यात आलं नव्हतं.
त्यावेळी त्याला बरा पगार मिळत होता. त्या घरात काय झालं होतं हे त्याला अगदी व्यवस्थित आठवतं. ज्या दिवशी ते घरं जाळलं जाणार होतं त्या दिवशी तिथे एक मुलगी लोखंडी गजांच्या मागे अडकली होती.
"मी तिचं रडणं, ओरडणं, विसरूच शकत नाही. तिचा आवाज आजही माझ्या कानात घुमतोय आणि तो माझ्या मनातून निघणं अशक्य आहे," ताहिया सांगत होता.
जेव्हा ताहियाने हे त्यांच्या अधिकाऱ्याला सांगितलं तेव्हा ते म्हणाले, "जो दिसेल त्याला मारून टाकायला मी तुला सांगितलं आहे." नंतर ताहियानं त्या खोलीत बंदुकीतून आगीचा गोळा टाकला.
ती जिवंत जाळली गेली आणि तिचं किंचाळणं त्याला ऐकू आलं. "तो आवाज ऐकणं फार वाईट होतं. जेव्हा ते घर जाळले तेव्हा पंधरा मिनिटं तो आवाज ऐकू येत होता,"तो सांगत होता.
बीबीसीने त्या मुलीच्या घरच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. जळून राख झालेल्या घरासमोर तिचे पालक बोलत होते.
त्या मुलीच्या एका नातेवाईकानं सांगितलं की ती मुलगी मानसिक रुग्ण होती. ही घटना झाली तेव्हा तिचे पालक कामावर गेले होते.
जेव्हा तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी तिला मध्येच अडवलं आणि जळू दिलं.
सैनिकांच्या अत्याचाराला बळी पडलेली ती एकटी मुलगी नव्हती. ताहिया सांगतो की, त्याने पैशासाठी सैन्याची नोकरी पत्करली होती. मात्र त्याला जे काही करायला लावलं त्यामुळे त्याला प्रचंड धक्का बसला.
ये मयेत या ठिकाणी अटक केलेल्या मुलींच्या एका गटाबद्दलही तो सांगतो. त्यांच्या साहेबांनी मुलींना आणलं, आपल्या सहकाऱ्यांकडे सोपवलं आणि तुम्हाला काय हवं ते करा असं म्हणाले. सैनिकांनी मुलींवर बलात्कार केला पण माझा त्यात सहभाग नव्हता, असं तो सांगतो.
आम्ही त्या मुलींपैकी दोघींशी बोलण्याचा प्रयत्न केला.पा पा आणि खिन हटवे म्हणतात की, त्या सैनिकांना रस्त्यावर भेटल्या आणि मग त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. त्या या गावच्या नव्हत्या. त्या इथे एका टेलरकडे आल्या होत्या.
या मुलींना तीन रात्र अटकेत ठेवण्यात आलं. प्रत्येक रात्री त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला. "त्यांनी माझ्या डोळ्याला पट्टी बांधली आणि मला खाली ढकललं. माझे कपडे काढले आणि माझ्यावर बलात्कार केला," पा पा म्हणाली.
"माझ्यावर बलात्कार होत असताना मी सातत्याने ओरडत होते," ती पुढे म्हणाली.
तिने थांबण्याची विनंती केली तेव्हा तिला मारहाण केली, तिच्या कानशिलावर बंदूक ठेवली. "आम्हाला ते सहन करावं लागलं. कारण असं केलं नसतं तर आमचा जीव गेला असता अशी भीती वाटत होती," असं तिची बहीण किहीन हटवे म्हणाली. हे सांगताना तिचा आवाज थरथर कापत होता.
हे कृत्य कोण करत होतं हे पाहण्याचा त्यांनी घाबरत घाबरत प्रयत्न केला. काही लोक साध्या वेशात होते तर काही लोकांनी सैन्याचा युनिफॉर्म घातला होता इतकंच त्यांना आठवतं.
ये मयेत गावातल्या हिंसाचारात 10 लोकांचा मृत्यू झाला तर आठ मुलींवर बलात्कार झाला.
माँग ओ यांना ज्या लोकांना मारण्यासाठी घेतलं होतं ते हत्याकांड ओहाके फो या गावात दोन टप्प्यात घडलं.
लाईट इन्फंट्री डिव्हिजन 33 च्या सैनिकांनी लोकांना गोळा केलं आणि बौद्धांच्या प्रार्थनास्थळात ठार केलं. या सर्व प्रकाराचे व्हीडिओ बीबीसीच्या हाती लागले.
या व्हीडिओत नऊ मृतदेह दिसत आहेत. त्यात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. या व्हीडिओत जे फुटेज दिसतंय त्यानुसार या लोकांना मागच्या बाजूने आणि अगदी जवळून मारण्यात आलं.
आम्ही या प्रकाराबद्दल गावातल्या लोकांशी बोललो. त्यांनी व्हीडिओत दिसणाऱ्या मुलीला ओळखलं. तिच्याकडे सोनं आणि एक लहान मुलं होतं. सैनिकांनी तिचं सगळं सामान लुटून नेलं आणि तिला ठार केलं.
हा सगळा प्रकार झाल्यानंतर सैनिकांनी विजयोत्सव साजरा केला. हा अत्यंत यशस्वी दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं.
आणखी एक बाई आम्हाला भेटली. तिच्या नवऱ्यालाही सैनिकांनी अशाच पद्धतीने मारलं. तो पीडीएफ या संघटनेसाठी काम करतो, असा संशय सैनिकांना आला. त्यांनी नवऱ्याच्या मांडीत गोळ्या घातल्या. त्याला उताणा बसवलं आणि त्याच्या ढुंगणावर गोळ्या घातल्या आणि शेवटी डोक्यात गोळ्या मारून ठार केलं, असं तिनं सांगितलं.
आम्ही ज्या सहा सैनिकांशी बोललो त्यांच्यापैकी प्रत्येकाने म्यानमारमधली घरं जाळली आणि लोकांना मारलं. त्यामुळे हा प्रकार नियोजित होता. कोणत्याही प्रकारचा विरोध चिरडून टाकण्याचा डाव होता हे सिद्ध झालं.
म्यानमार विटनेस नावाचा एक संशोधन गट म्यानमारमध्ये होणाऱ्या मानवी हक्कांच्या पायमल्लीवर संशोधन करत आहे . त्यांच्या मते, 200 गावं गेल्या 10 महिन्यात जाळली गेली आहेत.
हल्ल्यांची संख्या वेगाने वाढते आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात 40 हल्ले झाले तर मार्च-एप्रिल महिन्यात 66 हल्ले झाले.
म्यानमारमध्ये असे हल्ले होण्याची ही पहिली वेळ नाही. 2017 मध्ये रखाईन प्रांतातही अशा प्रकारचे हल्ले झाले होते
देशाच्या पर्वतीय भागात अशा प्रकारचे हल्ले झाल्याचा इतिहास आहे. या भागातील लोकच पीडीएफ या संस्थेच्या लोकांना हल्ले परतवण्याचं प्रशिक्षण देत आहेत.
ह्युमन राईट्स वॉच या संघटनेच्या मते, गेल्या अनेक दशकांपासून असे हल्ले होत आहेत.
पीडीएफ या संस्थेने निकराने तोंड दिल्यामुळे म्यानमार सैन्यासमोरील अडचणींत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
2021 मध्ये झालेल्या उठावानंतर पोलीस आणि सैन्यातील 10 हजार लोक एक तर ठार झालेत किंवा त्यांना अटक करण्यात आली आहे.
सैन्याला या सगळ्या गोष्टी हाताळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे असं सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज या थिंक टँकचं म्हणणं आहे. याचं नुकसान अधिकाऱ्यांना आणि सैनिकांनाही सहन करावं लागत आहे.
आम्ही लष्कर प्रवक्ते जनरल झॉ मिन टून यांच्याकडे ही परिस्थिती मांडली तेव्हा त्यांनी सर्व आरोपांचा इन्कार केला. या धाडी योग्य होत्या आणि जे मारले गेले ते कट्टरवादीच होते, असं ते म्हणाले.
सैन्याने गावं जाळल्याच्या आरोपाचाही त्यांनी इन्कार केला. पीडीएफ संस्थेच्या लोकांनीच गावं जाळल्याचा आरोप त्यांनी केला.
हे सगळं युद्ध कधी थांबणार आहे याची कल्पना नाही मात्र म्यानमारच्या नागरिकांना दीर्घकाळ त्रास होईल हे मात्र नक्की.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares