गीतांजली श्रींना बुकर पुरस्कार मिळणं देशासाठी महत्त्वपूर्ण का आहे? – BBC

Written by

फोटो स्रोत, THE BOOKER PRIZES
गीतांजली श्री यांची बुकर पुरस्कारप्राप्त रेत समाधी कादंबरी
'एक कहाणी स्वतःच स्वतःची कहाणी सांगेल. सध्याच्या प्रथेनुसार ही कहाणी पूर्णही असेल, पण त्याचवेळी अर्धवटही वाटू शकेल. अतिशय रंजक अशी ही कहाणी आहे.'
इंटरनॅशनल बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या हिंदी लेखिका गीतांजली श्री यांच्या 'रेत समाधी' कादंबरीतील ही पहिली दोन वाक्ये आहेत.
हिंदी साहित्यामध्ये इंटरनॅशनल बुकर पुरस्कारापर्यंत पोहोचण्याची इच्छा रसिकांना होती. ती गीतांजली श्री यांनी पूर्ण केली आहे.
या कादंबरीच्या 'टूंब ऑफ सँड' या इंग्रजी अनुवादाला 2022 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे.
पुरस्कार स्वीकारताना केलेल्या आपल्या भाषणात गीतांजली श्री यांनी म्हटलं, "इंटरनॅशनल बुकर पुरस्कार मिळवेन, असा कल्पनाही मी कधी केली नव्हती.
मी हे करू शकेन, असा विचारही मी कधी केला नाही. हा एक खूप मोठा पुरस्कार आहे. यामुळे मी आश्चर्यचकित, आनंदी आणि गौरवान्वित झाले आहे."
फोटो स्रोत, GEETANJALI SHREE
गीतांजली श्री
त्या पुढे म्हणाल्या, "मी आणि ही कादंबरी दक्षिण आशियाई भाषांमधील एका समृद्ध साहित्यिक परंपरेशी संबंधित आहोत. या भाषांमधून जागतिक साहित्याला उत्तमोत्तम लेखकांचा परिचय होईल."
राजकमल प्रकाशन या संस्थेने प्रकाशित केलेली 'रेत समाधी' ही कादंबरी ही इंटरनॅशनल बुकर पुरस्कारांच्या लॉंगलिस्ट आणि शॉर्टलिस्ट यादीत पोहोचणारी, तसंच पुरस्कार प्राप्त करणारी पहिली कादंबरी ठरली आहे. त्यामुळे या पुस्तकाबाबत सर्वत्र चर्चा दिसून येते.
रेत समाधीला जगातील मानाचा इंटरनॅशनल बुकर पुरस्कार मिळाल्यानंतर ही कादंबरी नेमकी कशी आहे, याची उत्सुकता सर्वांना असेल.
गीतांजली श्री यांच्या या कादंबरीला निर्णायक मंडल यांनी आगळीवेगळी कादंबरी असं संबोधलं.
गीतांजली श्री: बुकर पुरस्कार विजेत्यांनी तरुण लेखकांना दिला हा सल्ला…
या कादंबरीच्या कथेला अनेक कंगोरे असल्याचं पाहायला मिळतं. 80 वर्षांची एक आजी आहे. तिला आता बेडवरून उठायचं नाही. पण ती जेव्हा उठते तेव्हा सर्व बदलून जातं. आजीसुद्धा बदलून जाते. ती देशांमधील सीमेला निरर्थक बनवून टाकते.
या कादंबरीत सगळं काही आहे. स्त्री आहे. स्त्रीयांचं मन आहे. पुरुष आहे. तृतीयपंथी आहेत. प्रेम आहे. नातेसंबंध आहेत. वेळ आणि वेळेला बांधून ठेवणारी छडीही आहे.
फोटो स्रोत, RAJKAMAL PRAKASHAN
फाळणीपूर्वीचा भारत आणि फाळणीनंतरचं दृश्य आहे. आयुष्याच्या अंतिम टप्प्यात होणाऱ्या अनिच्छेपासून इच्छेपर्यंतचा प्रवास आहे.
मानसशास्त्र आहे. हास्य आहे. लांबलचक तशीच लहान वाक्येही आहे. जीवन आहे. मृत्यू आणि अखेरीस अर्थपूर्ण असा तात्पर्यही आहे.
गीतांजली श्री या गेल्या तीस वर्षांपासून लेखन क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांची 'माई' ही पहिली कादंबरी 1990 च्या दशकात प्रकाशित झाली होती. यानंतर त्यांच्या 'हमारा शहर उस बरस', 'तिरोहित', आणि 'खाली जगह' ही पुस्तकेही आली.
फोटो स्रोत, Getty Images
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा
भाग
End of पॉडकास्ट
यानंतर गीतांजली यांचे काही कथा संग्रहसुद्धा प्रकाशित झाले. त्यांच्या पुस्तकांमध्ये स्त्रीयांचं मन, समाजातील त्यांचं स्थान आणि परिस्थिती यांविषयी लिहिलेलं आहे. या कथा स्त्रीयांच्या मनात हळुवार दाखल होतात. त्यांना समजून घेतात.
गीतांजली यांच्या पुस्तकांचा अनुवाद भारतीय भाषेव्यतिरिक्त इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मनसह इतर अनेक भाषांमध्ये करण्यात आला.
माई या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादाला क्रॉसवर्ड पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.
गीतांजली यांच्या साहित्याबाबत बोलताना लेखिका अनामिका म्हणतात, "गीतांजली यांच्या पुस्तकांमध्ये आगळ्यावेगळ्या प्रकारचा साहित्यरस पाहायला मिळतो. हिंदी साहित्याला चांगले अनुवादक मिळाले तर त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती मिळू शकते, हे यामधून दिसतं.
रेत समाधीचा इंग्रजी अनुवाद करणाऱ्या डेजी रॉकवेल या अमेरिकेत राहातात. त्यांची हिंदी साहित्यासह अनेक भाषांवर चांगली पकड आहे. त्यांनी उपेंद्रनाथ अश्क यांच्या गिरती दिवारे या पुस्तकावर पीएचडी केली आहे. डेजी यांनी आतापर्यंत खादीजा मस्तूर, भीष्म साहनी, उषा प्रियंवदा आणि कृष्णा सोबती यांच्या कादंबऱ्यांचा इंग्रजी अनुवाद केलेला आहे.
रेत समाधीच्या निमित्ताने पहिल्यांदाच हिंदी साहित्यातील एखादी कलाकृती बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आली आहे.
इतकंच नव्हे तर सुरुवातीला लॉंगलिस्टेड, शॉर्टलिस्टेड होण्याचा मानही या पुस्तकाला पहिल्यांदाच मिळाला.
फोटो स्रोत, Getty Images
राजकमल प्रकाशन संस्थेकडून प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकाना यामुळे इतिहास घडवल्याचं बहुतांश तज्ज्ञांचं मत आहे.
ज्येष्ठ समीक्षक विश्वनाथ त्रिपाठी यांच्या मते, "हिंदी भाषेसाठी ही खूप मोठी घटना आहे. हिंदी भाषेच्या रचनात्मकतेचं हे उदाहरण आहे. संपूर्ण देशाला या पुरस्काराबाबत गर्व वाटला पाहिजे. या पुरस्कारामुळे इतर साहित्यकारांनाही बळ मिळेल."
ते पुढे सांगतात, "आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर योग्य तो सन्मान मिळत नाही, ही खंत हिंदी साहित्यकारांच्या मनात असते. कबीर, सूर, मीरा, तुलसी यांच्यापासून ते अज्ञेय, निराला, मुक्तिबोध यांच्यासारखे लेखत जागतिक दर्जाचे आहेत. पण त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणताही सन्मान मिळालेला नाही. हिंदी भाषेला असा ऐतिहासिक सन्मान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे."
सुप्रसिद्ध कवी आणि समीक्षक अशोक वाजपेई यांनाही असंच काहीसं वाटतं. ते म्हणतात, "हिंदीला अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार पूर्वी कधीच मिळाला नव्हता. कृष्ण बलदेव वैद, कृष्णा सोबती, अज्ञेय इत्यादींना आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. पण आपल्या आयुष्यात एखाद्याला इतका मोठा पुरस्कार मिळताना पाहणं, ही मोठी गोष्ट आहे."
फोटो स्रोत, Getty Images
गीतांजली श्री यांना इंटरनॅशनल बुकर पुरस्कार मिळण्याची तुलना मार्केज यांच्या कादंबरीशी का केली जात आहे?
कादंबरीकार मैत्रेयी पुष्पा यांच्या मते, आजपर्यंत जे घडलं नव्हतं, ते घडलं आहे. पण हा पुरस्कार मूळ हिंदी रचनेला देण्याऐवजी अनुवादित पुस्तकाला पुरस्कार देण्यात आल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
त्या म्हणतात, "जर इंग्रजीत अनुवाद झाला नसता, तर रेत समाधीची इतकी चर्चा झाली नसती. जिथं पुरस्कार मिळाला, तिथं इंग्रजीसाठीचं वातावरण आहे. त्यामुळे इंग्रजी अनुवादावर पुरस्कार अवलंबून आहे. असं असलं तरी हिंदीसाठी ही एक मोठी घटना मानली जाऊ शकते. कारण तिथं आतापर्यंत इंग्रजीचंच वर्चस्व होतं."
ज्येष्ठ कथाकार चित्र मुदगल यांच्या मते, "आपण अनुवाद विरुद्ध मूळ कलाकृती या वादात पडता कामा नये. हा हिंदी आणि भारतीय भाषांसाठी गौरवशाली क्षण आहे. हा हिंदीचा सन्मान आहे, असं मी पूर्णपणे मानते. कारण मूळ कृती आधी येते आणि अनुवाद नंतर."
त्या म्हणतात, "हा क्षण इतका ऐतिहासिक आहे की असं वाटतंय गीतांजली यांच्या निमित्ताने आमचाच सन्मान केला जात आहे."
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares