चीनचे अंतरंग: चीनची ढासळती आर्थिक प्रकृती – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरसुद्धा, लोकांच्या खर्चाचा किंवा बाहेर पडण्याचा स्फोट झाला नाही. त्याऐवजी लोक पुढच्या उद्रेकाच्या आणि त्याहीपेक्षा अमलात येणाऱ्या, कडक लॉकडाऊनच्या भीतीने बाहेर पडू इच्छित नाहीत. यामुळे देशांतर्गत मागणीसुद्धा कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे.
सा धारणतः सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच चीनमध्ये प्रचंड उत्साह संचारतो. या काळात त्यांचे सण, पिकांची कापणी आणि चिनी मुक्तिदिनाच्या सुट्ट्या येणार असतात. भरपूर खरेदी, फिरायला जाणे, भरपेट जेवणे यांची चंगळ असते. सगळीकडे चैतन्याचे वातावरण असते. या वर्षी मात्र २०२० आणि २०२१ पेक्षादेखील हा उत्साह कमी दिसतो आहे. गेल्या दोन आठवड्यांत, लहान-मोठ्या अशा आठ शहरांमधे पूर्ण किंवा अंशत: लॉकडाऊन लागू केला गेला. ऑगस्टअखेरीस किमान ७४ शहरे बंद करण्यात आली होती, ज्यामुळे ३१ कोटींहून अधिक रहिवाशांवर परिणाम झाला. ह्याचा परिणाम चीनच्या आर्थिक स्थितीवर न झाल्यास नवल. जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था, गंभीर दुष्काळाच्या झळा सोसत आहे. गंभीर आर्थिक समस्यांनी ग्रासला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे, अनेक शहरांत वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे, तसेच ग्रामीण भागांत पिकांचे नुकसान होते आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. विकास ठप्प झाला आहे, बेरोजगार तरुणांच्या संख्येने विक्रमी उच्चांक गाठला आहे, गृहनिर्माण बाजार कोसळत आहे आणि कंपन्या कमी झालेल्या आवर्ती पुरवठा साखळीचा सामना करत आहेत. पुढील काही महिन्यांत तरी यात काहीच बदल संभवत नाही, असे तज्ज्ञांचे मत. उर्वरित जगाच्या तुलनेत, चीनमध्ये कोविडने खूपच कमी बळी घेतले, ज्याचे श्रेय, शी चिन-प्फिंग यांनी लगेच आपल्या ‘शून्य-कोविड’ धोरणाला दिले आहे. ते थोड्याफार प्रमाणात बरोबर असले तरी, यामुळे चीनचे आर्थिक भविष्य अंधकारमय दिसत आहे. छंग-तू जवळ आलेल्या एका लहान, पण प्राणघातक भूकंपानेही, या प्रदेशातील धोरण बदलण्यास काहीही केले नाही. सरकारचे लक्ष शून्य-कोविडला प्राधान्य देण्याकडे आणि व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्याकडे अधिक असल्यामुळे, आर्थिक स्थितीचा विचार करण्यात त्यांना सध्या तरी स्वारस्य नाही.
चीनच्या गोल्डन सप्टेंबर, सिल्व्हर ऑक्टोबरदरम्यान कोविड निर्बंध कडक केल्याने उपभोग आणि गुंतवणुकीला फटका बसलाय. खरे तर घरविक्रीचा आणि खरेदीचा हा महत्त्वाचा काळ असूनही असे काहीच होत नाही आहे. चीन अनेक देशांत अनेक वस्तू निर्यात करतो. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोपमधे होत असलेली निर्यात, चीनच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा आहे. परंतु, सध्या या देशांच्या बाजारातील कमकुवत मागणीचाही चीनच्या निर्यातीवर आणि पर्यायी चीनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो आहे. गेल्या काही महिन्यांत चीनमधील नोकरीची बाजारपेठ खालावली आहे. तरुणांमधला बेरोजगारीचा दर जुलैमध्ये उच्चांकावर पोहोचलाय. याचा अर्थ, या वर्षी चीनच्या बेरोजगार तरुणांमध्ये सुमारे २ कोटी, सुशिक्षित तरुणांची भर पडणार आहे. ह्यात ग्रामीण बेरोजगारांचा समावेश नाही. गृहनिर्माण बाजारपेठेची घसरण ही आणखी एक मोठी समस्या आहे. चीनच्या जीडीपीमध्ये ३०% वाटा असलेले हे क्षेत्र, २०२० पासून कर्ज घेण्यावर लगाम घालण्यासाठी आणि सट्टा व्यापाराला आळा घालण्याच्या सरकारी मोहिमेमुळे अपंग झाले आहे. नवीन घरांच्या विक्रीप्रमाणेच घरांच्या किमतीदेखील घसरत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांकडचा पैसा संपत चाललाय. चिनी सरकारला जवळपास १ ट्रिलियन डॉलर निधीच्या तफावतीचा सामना करावा लागतो, ज्याचा बहुतांश परिणाम स्थानिक अधिकारक्षेत्रांवर होतो. अगोदर, स्थानिक सरकारे जमीन विकून उणीव भरून काढत असत, परंतु सध्या सुरू असलेल्या मंदीमुळे कुणीही खरेदीस उत्सुक नाहीत. आणि या सर्वावर हावी होणारे शून्य कोविड धोरण. अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरसुद्धा, लोकांच्या खर्चाचा किंवा बाहेर पडण्याचा स्फोट नाही झाला. त्याऐवजी लोक पुढच्या उद्रेकाच्या आणि त्याहीपेक्षा अमलात येणाऱ्या कडक लॉकडाऊनच्या भीतीने बाहेर पडू इच्छित नाहीत. यामुळे देशांतर्गत मागणीसुद्धा कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. चीनच्या सरकारला खरेच याने काही फरक पडत नाही का? चीनच्या प्रचंड वेगाने होत असलेल्या अर्थव्यवस्थेच्या घोडदौडीला खरेच लगाम घातला गेला आहे का, हे पाहूयात या लेखाच्या उत्तरार्धात.
सुवर्णा साधू संपर्क : suvarna_sadhu@yahoo.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares