नगरपरिषदेचा रौप्य महोत्सव मात्र विकास वाऱ्यावर – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
पालघर, ता. १९ (बातमीदार) : पालघर परिषदेची वाटचाल रौप्य महोत्सवाकडे झाली असली तरी येथील नागरिकांचा विकास ‘राम भरोसे’ आहे. त्यामुळे ग्रामपंचातच बरी, असा सूर निघत आहे. नगर परिषदेचा २४ वा वर्धापनदिन असतानादेखील आम्हाला सुविधा केव्हा मिळणार, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
पालघर ग्रामपंचायत असताना नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत होत्या. ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर झाल्यावर यात वाढ होईल, अशी आशा निर्माण झाली होती; परंतु काही कालावधीतच या आशेवर पाणी फेरले गेले आहे. कारण नगर परिषद क्षेत्रात सोई-सुविधांचा अभाव आहे. नगर परिषदेमध्ये नागरिकांसाठी सोई नाहीत, ग्रामपंचायत काळात उभारण्यात आलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर नगर परिषदेचे कार्यालय होते; परंतु धोकादायक इमारत पाहता जिल्हाधिकारी विभागाने कार्यालय स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे अग्निशमन केंद्रात हे कार्यालय हलविण्यात आले; तर येथे फुलमंडई उभारण्यात आली, परंतु शेतकरी वर्गासह अन्य भाजीविक्रेत्यांचे हाल होत आहेत. भाजी मंडई व मासळी बाजार भरविण्याचे हक्काचे स्थान नसल्यामुळे रस्त्याच्या कडेला बसून व्यवसाय करावा लागत आहे.
पाणीपुरवठ्याचे पालकत्व नगर परिषदेने घेतले खरे, मात्र प्रशासकीय ताण वाढल्याने त्याचा फटका करदात्यांना सोसावा लागत आहे. शैक्षणिकदृट्या कोणतेच पाऊल उचलले गेले नाही, मात्र नागरिकांकडून शिक्षण कर संकलित केला जात आहे. अंतर्गत मार्ग, गटारे आदींचा अभाव आहे. रस्ता फेरीवाल्यांनी व्यापला आहे. नागरिकांना चालण्यासाठी असलेल्या फुटपाथवरदेखील अतिक्रमण होत आहे; परंतु यावर कोणतीच कारवाई नगर परिषदेकडून होत नाही.
पालघर शहरातील मुख्य असणारा मनोर मार्ग व रेल्वेस्थानक परिसरात नेहमीच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याच मार्गावर कचऱ्याचे ढीग, वाहतूक कोंडी असताना कोणतीच उपाययोजना नगर परिषदेच्या प्रशासकीय विभागाकडून, तसेच लोकप्रतिनिधींनी केली नसल्याचा आरोप रहिवाशांकडून होत आहे.
एकंदरित पाहता जरी पालघर नगर परिषदेची वाटचाल रौप्य महोत्सवाकडे होत असली तरीही नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या, विकास योजना असोत की मूलभूत सुविधा, यापासून पालघरवासीय मात्र वंचित असून आम्हाला सोई-सुविधा कधी मिळणार, असा सवाल करदाते विचारत आहेत.
—————————–
आरोग्य, पाणी, मूलभूत सुविधा नागरिकांना मिळत नाहीत. पालघर नगर परिषद प्रशासकीय व्यवस्था कोलमडली आहे. काही नगरसेवकांनी पालघरच्या विकासाकडे पाठ फिरवली आहे.
– सचिन पाटील, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष
—————————–
कोरोनामुळे विकास कामे ठप्प होती. सद्यस्थितीत सरकार बदलले असल्याने निधीची कमतरता आहे. रौप्य महोत्सवात विविध विकासाची कामे हाती घेतली आहेत. शहरात उद्यान, तलाव सुशोभीकरण, भुयारी विद्युत पुरवठा, मासळी, भाजी मंडई यासह विविध कामे येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचा मानस आहे.
– डॉ. उज्ज्वला काळे, नगराध्यक्ष, पालघर नगर परिषद
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares