Beed : विमा आमच्या हक्काचा नाही, कोणाच्या बापाचा! – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
बीड : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात काही ठिकाणी २० तर काही ठिकाणी २५ दिवस पावसाने दडी मारली. पावसाअभावी सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. मात्र, पीकविमा कंपनीने आतापर्यंत केवळ ४७ महसूल मंडळांतील विमा धारक शेतकऱ्यांनाच २५ टक्के विमा अग्रिम मंजूर केली आहे. जिल्हाभरात विमा अग्रिम देण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी शेतकरी एकजूट संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. पीक विमा मिळालाच पाहिजे. विमा कंपनीची मग्रुरी बंद करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. विशेष म्हणजे पावसातही आंदोलन सुरुच राहीले. आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, मुंबई बाजार समिती सभापती अशोक डक, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, अजय मुंडे, जयसिंग सोळंके, सुशिला मोराळे, धनंजय गुंदेकर, स्वाभिमानीचे कुलदीप करपे, पुजा मोर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
ऑगस्ट महिन्यामध्ये फक्त तीन दिवस पाऊस पडला. पावसाच्या मोठ्या खंडामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. पहिल्या टप्प्यात १६ तर दुसऱ्या टप्प्यात ३१ महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांसाठी नुकसानीची २५ टक्के अग्रिम मंजुरीची अधिसूचना निघाली आहे. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट भरपाईच्या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी सर्वपक्षीय व संघटनांची बैठक होऊन धरणे आंदोलनाचा निर्णय झाला. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात सरसकट पीक विमा अग्रिम मंजूर झाला नाही तर भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचा आरोपही करण्यात आला.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares