Parbhani : सरसकट दुष्काळ जाहीर करा! – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
परभणी/हिंगोली : यंदा जुलैमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातून वाचलेल्या पिकांना पावसाचा खंडाचा फटका बसला. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी या काळात पाणी देऊन पिके जगवली त्यांच्या पिकांचे आता पुन्हा अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. परिणामी, ६० ते ७० टक्के पिकांचे नुकसान झाले असून, उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी पूर्णा येथे बैलगाडी मोर्चा, मानवत आणि गोरेगाव येथे सोमवारी (ता. १९) शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले.
शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान द्या!
अतिवृष्टीचे अनुदान द्यावे, या मागणीसाठी गोरेगाव (ता. सेनगाव) येथील चौफुलीवर शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. सेनगाव तालुक्यातील काही मंडळात जुलै ते ऑगस्टदरम्यान अतिवृष्टी झाली; तसेच पीकविम्याच्याही हालचाली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान द्यावे, या मागणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. यामध्ये अनिल पंतगे, किशोर पाटील यांच्यासह इतर शेतकरी सहभागी झाले होते.
तालुक्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयावर सोमवारी बैलगाडीसह विराट मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांनी सकाळी नऊ वाजल्यापासूनच ताडकळस टी पॉइंट येथे जमण्यास सुरुवात केली होती.
राज्य शासन, कृषीमंत्री, केंद्र सरकार व पीकविमा कंपनीच्या विरोधात यावेळी घोषणा दिल्या जात होत्या. मोर्चात असंख्य बैलगाड्या सहभागी होणार होत्या. परंतु, लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे प्रातनिधिक स्वरूपात एकच बैलगाडी सहभागी करण्यात आली. तालुक्यात सलग ४० ते ४५ दिवस सतत संततधार पाऊस पडल्यामुळे पिकाची वाढ खुंटली. काही शेतकऱ्यांना दुबार तर काही शेतकऱ्यांना तिबार पेरणी करावी लागली. नंतर सोयाबीन फुलात व कोवळ्या शेंगाच्या अवस्थेत असताना २५ ते २८ दिवस पावसाने दडी मारल्यामुळे पीक जागेवरच करपली.
यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने, तालुकाध्यक्ष शिवहार सोनटक्के, आयोजक नरेश जोगदंड, गंगाधर इंगोले, नारायण सोनटक्के, मंचक कुर्हे, श्रीहरी इंगोले, गंगाप्रसाद वळसे, मंचकराव जोगदंड, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश काळे, श्रीधर पारवे, आशिष जोगदंड, छावा संघटनेचे गजानन सवराते, ॲड. अमोल पळसकर, किशोर देसाई, चंद्रकांत कऱ्हाळे, मनसेचे अनिल बुचाले, राज ठाकर, शिवाजी भालेराव, राजेश खंदारे, नवनाथ पारवे, बबन ढोणे, नितीन कदम, नीलेश जोगदंड, नवनाथ चपेले, शेख मगदूम, नाना आवरगंड, किसन जोगदंड, शेख नसीर, ज्ञानोबा मोरे, सचिन जोगदंड, श्रीकांत पारवे, सैनाजी माठे उपस्थित होते.
परभणी जिल्ह्याचा दुष्काळ यादीमध्ये समावेश करा व पीकविमा मंजूर करा या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडसह इतर संघटनांनी सोमवारी शहरातील महाराणा प्रताप चौकात सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक एक तास खोळंबली.
शासनाने परभणी जिल्ह्याचा दुष्काळ यादीमध्ये समाविष्ट करून मानवत तालुक्यातील सर्व मंडळाचा पीक विम्याची अग्रीम रक्कम द्यावी त्याचबरोबर खरिपाचा पीकविमा सरसकट मंजूर करावा या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे एक तास वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी शेतकरी संघटनेचे रामभाऊ शिंदे, कम्युनिस्ट पक्षाचे लिंबाजी कचरे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष माधव नाणेकर, बाबासाहेब आवचार, ॲड. सुनील जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हनुमान मसलकर, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष गोविंद घांडगे, किसान युवा क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष नामदेव काळे यांनी विचार व्यक्त केले.
आंदोलनात बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष लाडाने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष दत्तराव शिंदे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख कृष्णा शिंदे, पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष आंबेगावकर, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन ॲड. संतोष लाडाने, आकाश चोखट, सूरज काकडे, हनुमान मस्के, अच्युतराव चाळक, बाळासाहेब काळे, अमोल कदम, नामदेव होगे, रामभाऊ मस्के, कारभारी मस्के, अरुणराव देशमुख, संजय टाक, मोहन महिपाल, दशरथ शिंदे सहभागी झाले होते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares