कल्याण शीळ रोड बाधित शेतकऱ्यांना अद्याप मोबदला नाही – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २० ः कल्याण-शिळ रस्तारुंदीकरणात बाधित झालेल्या १५ गावांतील ग्रामस्थांना अद्यापही मोबदला मिळालेला नाही. या रस्त्यासाठी ५६१ कोटींचा निधी शासन मंजूर करू शकते, परंतु बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळावा याची तरतूद करता येत नाही. सरकार कोणाचेही असो, इथल्या भूमिपुत्रांच्या जमिनी केवळ प्रकल्पासाठी वापरायच्या आणि त्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवायचे हेच सुरू आहे, असा आरोप करत सर्वपक्षीय युवा मोर्चाच्या वतीने ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी कल्याण-शिळ रोड येथील काटई नाका परिसरात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या कल्याण-शिळ रस्त्याचे सहापदरी रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. यामुळे वाहनचालक त्रस्त असून दुसरीकडे या रस्त्यात बाधित झालेल्या भूमिपुत्रांना अद्यापही त्यांच्या जमिनींचा मोबदला मिळालेला नाही. या कामासाठी नुकताच शासनाने सुधारित वाढीव निधी मंजूर केला आहे; मात्र त्यातही भूमिपुत्रांना मोबदला दिला गेलेला नाही. या प्रकल्पातील मौजे गोवे, पिंपळगाव, गोवे व रांजणोली या चार गावांतील बाधितांना चौपदरीकरणात रोख स्वरूपात मोबदला दिला गेला आहे. मग इतर बाधितांना का दिला गेला नाही, असा सवाल या वेळी बाधित युवा मोर्चाचे सदस्य गजानन पाटील यांनी केला. या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामात रस्त्यालगतच्या १५ गावांमधील २०० ते २५० शेतकरी बाधित झाले आहेत. तसेच येथील विषय आम्ही गेल्या अनेक वर्षांपासूम हाताळत आहोत, पण सरकार त्याची दखल घेत नाही. लोकशाही मार्गाने लढा आम्ही देत आहोत, पण लोकशाही मार्गाने झाले नाही तर रस्ता रोकोसारखे उग्र आंदोलन करण्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही, असेदेखील पाटील या वेळी म्हणाले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares