फोर्थ डायमेन्शन: स्त्रियांचा कर्तेपणा हिरावणारी पाठ्यपुस्तकं… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
बाल आणि किशोरवयात अभ्यासलेली पाठ्यपुस्तके व्यक्तीच्या वैचारिक अधिष्ठानाचा महत्त्वपूर्ण गाभा बनतात. पुढे आयुष्यभर पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून जाणीव-नेणिवेत रुजलेली ही मूल्ये व्यक्तीच्या विचार आणि कृतीला प्रभावित करत राहतात.
पाठ्यपुस्तकांत बहुतांश ठिकाणी संख्यात्मक समानता साधण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी पुरुष किंवा मुलगे हे अधिक कृतिशील दाखवले जातात, तर मुली किंवा स्त्रियांची उपस्थिती बहुधा निष्क्रिय स्वरूपाची असल्याचे दिसते.
ज्ञा न आणि सत्ता यांचा घनिष्ठ संबंध असतो. सत्तेचा पाया ज्ञानाचे स्वरूप निर्धारित करतो. वर्ग, वंश, जात, लिंग, प्रदेश इ.सत्तेच्या विषम वाटपाचे सत्ताधार राहिले आहेत. काळे-गोरे, आहेरे-नाहीरे, उच्चजातीय, कनिष्ठ जातीय, स्त्री- पुरुष, पूर्व-पश्चिम इ. गुंतागुंतीच्या सत्ता उतरंडीत ज्यांच्याकडे भौतिक सत्तेचा भक्कम पाया आहे त्या समूहांच्या ज्ञान आणि दृष्टिकोनाला वैधता आणि मूल्य प्राप्त होते. आजपर्यंत समाजातील बहुतांश ज्ञान हे पुरुषांनी निर्माण केले आहे. डेल स्पेंडर या स्त्रीवादी अभ्यासक म्हणतात त्याप्रमाणे पुरुषांनी निर्माण केलेले दृष्टिकोन आणि विश्लेषण हे पुरुषी राहिलेले आहेत. मात्र पुरुषांनी निर्मिलेल्या पुरुषांच्या अभ्यासाला मानवी ज्ञान म्हणून हस्तांतरित केले गेले. यात ज्ञानाच्या ‘निर्मात्या’ आणि “विषय’ म्हणून स्त्रियांना वगळण्यातच आलेले आहे. सहिंताकृत ज्ञानातील स्त्रियांचे हे “वगळलेपण’ पाठ्यपुस्तकांमध्ये ही प्रतिबिंबित होते. ज्ञान आणि शिक्षणव्यवस्थेतील स्त्रियांच्या बहिष्कृती व परिघीकरणाचा प्रत्यक्ष दाखला म्हणून शालेय पाठ्यपुस्तकांची चिकित्सा करणे आवश्यक ठरते.
बाल आणि किशोरवयात अभ्यासलेली पाठ्यपुस्तके व्यक्तीच्या वैचारिक अधिष्ठानाचा महत्त्वपूर्ण गाभा बनतात. पुढे आयुष्यभर पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून जाणीव-नेणिवेत रुजलेली ही मूल्ये व्यक्तीच्या विचार आणि कृतीला प्रभावित करत राहतात. महाराष्ट्र राज्य मंडळाच्या काही शालेय पाठ्यपुस्तकांचे लिंगभावी परीक्षण केले असता काही बाबी निदर्शनास येतात. ग्रामीण भागात पुरुष आणि स्त्रिया समानपणे शेतात राबत असतात आणि “कुळंबीण’ या अखंडात महात्मा फुले दाखवतात त्याप्रमाणे शेतकरी स्त्री घर आणि शेत अशी दोन्ही ठिकाणची कामं करत असते. पण आपली पाठ्यपुस्तके मात्र नवऱ्यासाठीच्या भाकरीची टोपली डोक्यावरून घेऊन येणे, नवऱ्याला खाऊ घालणे, फार फार तर क्वचित खुरपणी करणे हीच शेतकरी स्त्रीची कामे रेखाटतात. सार्वजनिक आयुष्यात स्त्रिया डॉक्टर, इंजिनिअर, आमदार, खासदार, मंत्री, पायलट, मॅनेजर, सीईओ, प्राध्यापक, पोलिस, अधिकारी, इ. सर्व कामे करताना दिसत असूनही एकविसाव्या शतकातील आधुनिक पाठ्यपुस्तके मात्र नर्स, शिक्षिका व क्वचित वेळी डॉक्टर ही स्त्रीसुलभ कामे सोडता इतर कोणत्याच भूमिकेत स्त्रियांना प्रतिनिधित्व देऊ इच्छित नाहीत. बॉक्सिंग, भारोत्तोलन, टेनिस, क्रिकेट, बॅडमिंटन, नेमबाजी अशा अनेक क्रीडा प्रकारांत भारतीय महिला खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी पदकांची लयलूट करताना दिसताहेत आणि इकडे पाठ्यपुस्तके मात्र दोरीवरच्या उड्या, लंगडी किंवा फार फार तर बॅडमिंटन यापलीकडे दुसरा कोणताही खेळ मुलींना खेळताना दाखवण्याचे धारिष्ट करताना दिसत नाहीत. त्यात फुटबॉल, क्रिकेट, विटीदांडू, पतंग उडवणे हे खेळ तर जणू मुलींसाठी निषिद्धच.
विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील आदर्श व्यक्तिमत्त्व, त्यांचे कर्तृत्व माहीत व्हावे म्हणून पाठ्यपुस्तकात काही चारित्रात्मक पाठ समाविष्ट केलेले असतात. पण यातील स्त्री आणि पुरुष असे प्रमाण अभ्यासले तर स्त्री चरित्रात्मक पाठांचे प्रमाण अल्प असते व स्त्री चरित्रे ही मुख्यत: मातृत्व व सेवाभाव अशी मूल्ये रुजवणारी असतात किंवा सामान्य विद्यार्थिनींना अशक्य कोटीतील वाटावीत अशा सुनीता विल्यम्स, कल्पना चावला यांची असतात. उर्वरित राजकारण, उद्योग, समाजकार्य, विज्ञान अशा चौफेर क्षेत्रांतील पुरुष चरित्रे समाविष्ट केलेली असतात. या मूल्यात्मक विभागणीतून पुरुष म्हणजे धर्म, राष्ट्र, मैत्री, चातुर्य, बुद्धिमत्ता, साहस, धैर्य, पराक्रम, इ. तर स्त्रिया म्हणजे सेवा, त्याग, मातृत्व, स्वयंपाक, घरकाम, बालसंगोपन, निरागसता इ. हे समीकरण विद्यार्थ्यांमध्ये रुजवले जाते. पाठ्यपुस्तकांमध्ये कोणत्या गोष्टीचा भडिमार असेल तर मातृत्वाच्या मूल्याचा, कविता, नाटक, प्राणी, पशुपक्ष्यांच्या गोष्टी अशा वेगवेगळ्या संदर्भाने आई आणि मातृत्व चित्रित केले जाते.
इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांतानुसार माकडापासून आजच्या दोन पायांवर चालणाऱ्या पुरुष देहाची उत्क्रांत झालेली प्रतिमा दाखवली जाते .पण स्त्रीदेह कसा विकसित झाला असेल हे विद्यार्थ्यांच्या मनोविश्वातसुद्धा येऊ दिले जात नाही. सामान्य विज्ञानाच्या पुस्तकात मानवी शरीर म्हणून पुरुषदेह शिकवला जातो, पण प्रजननासारखे वेगळे शरीरकार्य असणाऱ्या स्त्रीदेहाविषयी मात्र ना चित्राच्या माध्यमातून काही दाखवले जाते ना शिकवले जाते. पाठ्यपुस्तकांत बहुतांश ठिकाणी जरी संख्यात्मक समानता साधण्याचा प्रयत्न केला जात असला तरी पुरुष किंवा मुलगे हे अधिक कृतिशील दाखवले जातात, तर मुली किंवा स्त्रियांची उपस्थिती ही बहुधा निष्क्रिय स्वरूपाची असल्याचे दिसते. एका पाठ्यपुस्तकाच्या कव्हर पेजवर मुलं वेगवेगळ्या प्राण्यांचे मुखवटे घालून खेळताना दाखवली आहेत. त्यात वाघ, सिंह, हत्ती, माकडाचे मुखवटे मुलांनी घातलेले आहेत, तर मुलींनी जिराफ, मोर, फुलपाखरू अशी तुलनेने नाजूक व मुलांना कमी साहसी वाटतील असे मुखवटे घातलेले आहेत. त्यामुळे साहजिकच पाठ्यपुस्तकातील पुरुषांची उपस्थिती ही अधिक सक्रिय, आकर्षक आणि नेतृत्व करणारी असते, तर मुलींची उपस्थिती ही गौण, निष्क्रिय, अनाकर्षक व सहायकाच्या रूपात राहते. बालवयात देशप्रेम आणि राष्ट्रभक्तीची मूल्ये रुजवणे पाठ्यपुस्तकांचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट असते. त्यासाठी अनेक देशभक्तिपर कविता व धडे पाठ्यपुस्तकात समाविष्ट केले जातात आणि त्यात हातात तिरंगा घेऊन संचलन करणारी मुले दाखवली जातात. मात्र यात चुकूनही कधी मुलीच्या हातात तिरंगा देऊन प्रातिनिधिक स्वरूपा देखील तिला नेतृत्वस्थानी येऊ दिले जात नाही.
आजही ज्ञाननिर्मितीमध्ये अंतर्भूत असणाऱ्या सत्तासंबंधांची चिकित्सा करणे ही फार प्रशंसनीय बाब समजली जात नाही. मात्र मुक्तिदायी ज्ञाननिर्मितीसाठी ही चिकित्सा अटळ ठरते आणि म्हणूनच ज्ञानव्यवस्थेतील प्राथमिक पायरी असणारी पाठ्यपुस्तके या चिकित्सेच्या अग्रणी येणे क्रमप्राप्त बनते. पाठ्यपुस्तकांच्या प्रस्तावनेत स्त्री-पुरुष समानता मूल्याची भाषा करणाऱ्या पाठ्यपुस्तकांनी स्त्रियांच्या अनुभव आणि कर्तेपणाला दिली जाणारी बहिष्कृतीची मानसिकता समूळ उखडून काढण्यासाठीचे भरीव प्रयत्न करावे लागतील. तसेच यासाठी शैक्षणिक क्षेत्रातील लिंगभाव विषमतापूर्ण व्यवहार व समाजातील वास्तविक लिंगभाव विषमतेच्या उच्चाटनाची जोड मिळणेही तितकेच आवश्यक ठरते.
डॉ. निर्मला जाधवसंपर्क : nirmalajadhav@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares