झेंग ये सो : समुद्री लुटारू महिला, जिला चीनही घाबरायचा – BBC

Written by

जर तुम्हाला विचारलं की, जगातला सर्वांत भयंकर आणि सामर्थ्यशाली समुद्री चाचा अर्थात डाकू कोण तर स्वाभाविक उत्तर असतं लाँग जॉन सिल्व्हर नाहीतर ब्लॅक बियर्ड.
आता ज्यांना माहित नाही की हे दोघे नेमके कुठले? तर हे दोघेही समुद्री डाकूंच्या जगतातील कुप्रसिद्ध पात्र आहेत.
खांद्यावर पोपट आणि एका हातात चमचम करणारी तलवार असा वेष असणारा लाँग जॉन सिल्व्हर स्कॉटिश लेखक रॉबर्ट लुई स्टीव्हनसन यांच्या ट्रेझर आयलँड या लोकप्रिय पुस्तकातलं पात्र आहे.
तर ब्लॅक बियर्ड नावाच्या कुप्रसिद्ध समुद्री चाच्याचं खरं नाव होतं एडवर्ड टीच. ब्लॅक बियर्ड हा ब्रिटिश होता असं म्हणतात. या लुटेऱ्याने वेस्ट इंडिजपासून उत्तर अमेरिकेतील ब्रिटिश वसाहतींपर्यंतच्या समुद्री क्षेत्रात लुटमार केली.
पण या दोघांपेक्षाही भयंकर समुद्री डाकूबद्दल बोलायचं झालं तर नाव घ्यावं लागेल एका बाईचं.
दक्षिण चीन समुद्रात प्रवास करणाऱ्यांना कापरं भरवणारी ही बाई जगातील एकमेव शक्तिशाली समुद्री डाकू अर्थात समुद्री सुंदरी होती. तिचं नाव झेंग ये सो.
झेंग ये सो समुद्री डाकूंच्या जगतातली अनभिषिक्त सम्राज्ञी होती. 1775 मध्ये चीनच्या गुआंगडोंग या किनारपट्टीभागात जन्माला आलेल्या झेंग ये सो चं खरं नाव शी येंग होतं.
या काळात आर्थिक विषमता आणि अशांतता शिगेला पोहोचलेली होती. सगळीकडे गरिबी, उपासमार नजरेस पडत होती. गुआंगडोंगमध्ये राहणारी अनेक कुटुंब गरिबीला कंटाळून निर्बंध असलेल्या वस्तूंची तस्करी करायचे आणि हेच पाहत शी येंग मोठी होत होती.
काही इतिहासकार सांगतात की, अवघ्या सहा वर्षांची असताना शी येंग वेश्याव्यवसायात ढकलली गेली.
त्या दरम्यानच्या काळात, झेंग यी नावाचा समुद्री डाकू चिंग आणि ग्वेन एन साम्राज्यांविरुद्ध लढा देत होता.
तो व्हिएतनामच्या सूर्यवंशी राजाच्या वारसाच्या समर्थनार्थ लढत होता आणि त्याचा नातेवाईक झेंग की त्या काळातील मुख्य समुद्री डाकू होता.
पाण्यावर तरंगणाऱ्या वेश्यालयात काम करणाऱ्या शी येंगला तिच्या ग्राहकांकडून अतिशय महत्त्वाची माहिती समजायची. तिच्याबरोबर वेळ घालवणारे हे ग्राहक कधीकधी अशी माहिती, अशी रहस्य तिला सांगायचे की जे त्यांच्याच मृत्यूचं कारण ठरायचं.
हळुहळू शी येंगने ही रहस्य सांगण्याच्या बदल्यात पैसे मिळवायला सुरुवात केली. तिच्या या कामामुळे तिने गडगंज पैसा कमावला. या पैशाच्या जोरावर तिचा आजूबाजूच्या परिसरात दबदबा निर्माण झाला.
याच दरम्यान युद्ध सुरु असलेल्या भागात झेंग ची भेट शी येंगशी झाली आणि दोघे प्रेमात पडले.
झेंग यी ने तिला वचन दिलं की त्याने जिंकलेल्या संपत्तीपैकी निम्म्या संपत्तीवर तिचा हक्क असेल. शी येंगला हा सौदा पटला आणि तिने लग्नासाठी तात्काळ होकार दिला. लग्नाच्या वेळी ती 26 वर्षांची होती.
त्यांच्या लग्नानंतर तिचं नाव झालं झेंग ये सो, म्हणजेच झेंगची पत्नी.
लग्नाच्या एका वर्षानंतर, झेंग यी हीचा नातेवाईक झेंग की याला ग्वेन साम्राज्याच्या सैन्यानं पकडलं. व्हिएतनाम सीमेजवळ जियांगपिंगमध्ये त्याला पकडण्यात आलं आणि तिथेच त्याची हत्या करण्यात आली.
या संधीचा फायदा घेत झेंग यी ने झेंग की याच्या नेतृत्वात काम करणाऱ्या डाकूंना एकत्र केलं आणि तो त्यांचा नेता बनला.
झेंग यी आणि झेंग ये सो हे थोड्याच दिवसांत डाकूंच्या टापूतले पॉवर कपल झाले. त्यांनी बंदी असलेल्या वस्तूंची तस्करी करणाऱ्यांवर आपलं नियंत्रण प्रस्थापित केलं.
झेंग यी चीनी समुद्रात कार्यरत असलेल्या सर्व लुटारूंना एका झेंड्याखाली आणायचं होतं जेणेकरून पोर्तुगीज, चीनी, ब्रिटिश आणि फ्रेंच सैन्याशी लढा देता येईल.
यात मोठी भूमिका बजावली झेंग ये सो ने. तिने सर्व डाकूंच्या नेत्यांशी चर्चा केली. वेश्या व्यवसायात असताना तिचा मोठा संपर्क होता याच संपर्काचा तिला यावेळी उपयोग झाला.
झेंग आणि झेंग ये सो यांच्या प्रयत्नांना एकदाचं यश आलं. 1805 मध्ये चीनी समुद्रात लुटमारी करणारे सर्व लुटारू एकत्र आले. सहा वेगवेगळ्या रंगांच्या झेंड्यांखाली हे डाकू एकत्र आले.
हे रंग होते लाल, काळा, निळा, पांढरा, पिवळा आणि जांभळा.
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा
भाग
End of पॉडकास्ट
या डाकूंनी समुद्राचीसुद्धा वाटणी केली. ते सर्व झेंग यी यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमत झाले. 19 व्या शतकाच्या सुरुवातीस झेंग यी समुद्री लुटेऱ्यांचा मोठा नेता बनला. त्याच्या झेंड्याखाली 70 हजारहून अधिक समुद्री चाचे आणि 1,200 हून अधिक जहाज होती. पण तो एवढा मोठा नेता होण्यामागे त्याची पत्नी झेंग ये सो होती.
झेंग यी ने मच्छीमार कुटुंबातील झांग बाओ साइ या मुलाला दत्तक घेतलं.
पण 1807 मध्ये झेंग यी मरण पावला आणि तेव्हा खऱ्या अर्थाने झेंग ये सो ची ताकद वाढली.
तिने सर्वात आधी झेंग यी च्या दोन मोठ्या सरदारांचा पाठिंबा मिळवला. आणि नंतर तिचा दत्तक मुलगा चेंग पाओला झेंग यी च्या जुन्या स्क्वॉड्रनची कमान सांभाळायला दिली. पण प्रकरण इथंच संपलं नाही.
आपली ताकद वाढवण्यासाठी, झेंग ये सो ने तिच्या स्वतःच्या दत्तक पुत्राशी, चेंग पाओशी लग्न केलं. त्यावेळी या चेंग पाओचं वय वीस ते तीसच्या दरम्यान असावं.
यानंतर झेंग ये सोची ताकद इतकी वाढली की तिचा प्रभाव असलेल्या क्षेत्रावर वचक ठेवण्यासाठी तिने अनेक नियम आणि कायदे केले. ती सुद्धा या नियमांचं काटेकोरपणे पालन करायची.
या नियम कायद्यांमध्ये भ्याडांना मृत्यूदंडाची तरतूद होती. एवढंच नाही तर आपल्या हिश्श्यापेक्षा जास्त रक्कम लुटणाऱ्यांना तसेच कायदे नियम न पाळणाऱ्यांना ठार मारण्याची तरतूद होती.
त्याचप्रमाणे परवानगीशिवाय गायब झाल्यास समुद्री चाच्यांचे कान कापले जायचे. समुद्री लुटीच्या दरम्यान ज्या महिला मुली पकडल्या जायच्या त्यांचं शोषण किंवा बलात्कार करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद होती.
अफाट संपत्ती आणि शक्तीने परिपूर्ण असणाऱ्या झेंग ये सो ने काही काळानंतर मिठाच्या व्यापारावर आपलं लक्ष केंद्रित केलं. कारण याकाळात मिठाचा व्यापार तेजीत सुरू होता.
झेंग ये सो चे समुद्री चाचे मीठ वाहून नेणाऱ्या जहाजांवर हल्ले करायचे. एकवेळ तर अशी आली होती की, ग्वांगडोंग सरकारच्या 270 जहाजांवर हल्ला चढवल्यावर फक्त 4 जहाजचं झेंग ये सोच्या हल्ल्यातून निसटू शकली.
यानंतर, झेंग ये सो ने आपला प्रभाव वाढवण्यासाठी पासपोर्ट सिस्टीम सुरू केली. या सिस्टीम अंतर्गत मीठ व्यापाऱ्यांना सुरक्षित प्रवास करायचा असेल तर काही रक्कम द्यावी लागायची.
हळूहळू दक्षिण चीन समुद्रात तिचा प्रभाव एवढा वाढला की व्यापारी जहाजांसह सर्वच प्रकारच्या जहाजांना सुरक्षा शुल्क भरणं अनिवार्य करण्यात आलं.
आता फक्त सुरक्षा शुल्कचं नाही तर ही रक्कम वसूल करण्यासाठी टॅक्स ऑफिसेस सुद्धा बनवले.
झेंग ये सो ने तिच्या विरोधकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या रणनीती वापरल्या.
तिच्या प्रतिस्पर्धी समुद्री चाच्यांना खाण्यापिण्यापासून इतर सर्वच गोष्टींसाठी किनारपट्टीच्या गावांवर अवलंबून रहावं लागायचं.
झेंग ये सो ने या गावांमध्ये आपलं स्थान भक्कम केलं जेणेकरून तिच्या विरोधकांना त्या गावांमधून कोणत्याही प्रकारची मदत मिळू नये.
अशापरिस्थितीत जर कोणत्याही समुद्री चाच्याने झेंग ये सो ला आव्हान देण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम महाभयंकर असायचे.
1809 पर्यंत झेंग ये सो इतकी शक्तिशाली बनली की तिच्या लष्करी आणि आर्थिक सामर्थ्याचा परिणाम, चिनी सरकारलाही तिचा त्रास व्हायला लागला. त्यामुळे या समुद्री चाच्यांचा प्रश्न तात्काळ सोडवला पाहिजे म्हणून चीन सरकारने ब्रिटीश आणि पोर्तुगीज नौदलाची मदत मागितली.
यानंतर ब्रिटिश नौदल, पोर्तुगाली नौदल आणि समुद्री चाच्यांमध्ये अनेक लढाया झाल्या ज्यात समुद्री चाच्यांचा विजय झाला. पण 1810 नंतर झेंग ये सो आणि तिच्या टीमने सरकारशी एक सामंजस्य करार केला. या करारान्वये सरकारने त्यांना भलीमोठी पेन्शन देण्याचं मान्य केलं.
यानंतर झेंग ये सो ने काय केलं याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाहीये. पण चांग पाओ या दुसऱ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर झेंग ये सो ने आपलं ग्वांगडोंग हे गाव गाठलं होतं अशी माहिती मिळते. तिथंच वयाच्या 69 व्या वर्षी तिचं निधन झालं.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares