पंजाब विधानसभा निवडणूक : शेतकरी आंदोलनातील 22 संघटनांची निवडणुकीच्या रिंगणात उडी, राजकीय पक्षांना धक्का – BBC

Written by

फोटो स्रोत, Getty Images
तीन कृषि कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या 22 संघटनांनी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.
आगामी विधानसभा निवडणूक या 22 संघटना एकत्रितपणे आघाडी करून लढवणार असल्याची माहिती PTI वृत्तसंस्थेने दिली आहे.
या संघटनांनी नुकतीच याबाबतची घोषणा करून सर्व राजकीय पक्षांना धक्का दिला.
शेतकरी आंदोलनात प्रामुख्याने पंजाबमधील शेतकऱ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. अखेर, आंदोलकांच्या ठाम भूमिकेमुळे केंद्र सरकारला तीनही कृषी कायदे मागे घ्यावे लागले होते.
या आंदोलनाचा पंजाब निवडणुकीवर काय परिणाम होईल, यासंदर्भात चर्चा रंगल्या असतानात शेतकरी संघटनांनी पंजाबच्या निवडणुकीत उतरणार असल्याचं जाहीर केलं आहे.
त्यामुळे आगामी पंजाब विधानसभा निवडणूक रंगतदार होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय जनता पार्टीनं शुक्रवारी (17 डिसेंबर) आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेसबरोबर आघाडीची घोषणा केली आहे.
फोटो स्रोत, @gssjodhpur
कॅप्टन अमरिंदर सिंग आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शुक्रवारी पंजाबचे भाजपचे प्रभारी आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांची दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनंतर दोन्ही पक्षांनी आघाडीची अधिकृत घोषणा केली.
"भाजप आणि कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाब विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढतील आणि आम्ही एकत्र काम करत आहोत, हे मला आज स्पष्ट करायचं आहे," अशी माहिती गजेंद्र शेखावत यांनी माध्यमांशी बोलताना दिल्याचं पीटीआय या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग या घोषणेच्या वेळी गजेंद्र शेखावत यांच्याबरोबरच उभे होते. गजेंद्र शेखावत यांनी जागावाटपाची घोषणा योग्य वेळी केली जाईल असंही यावेळी म्हटलं.
"निवडणुकीत आघाडीचा विजय 101 टक्के निश्चित आहे. तसंच जागा वाटप हे विजयाच्या क्षमतेनुसार केलं जाईल," असंही ते यावेळी म्हणाले.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्याचं मुख्मंत्रीपद सोडल्यानंतर काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर पंजाब लोक काँग्रेसची स्थापना केली होती.
यापूर्वी भाजपची शिरोमणी अकाली दलबरोबर असलेली भाजपची आघाडी कृषी कायद्यांच्या मुद्द्यांवरून तुटली होती.
गजेंद्र शेखावत आणि अमरिंदर सिंग यांची भेट याच महिन्यात चंदिगडमध्ये झाली होती. पंजाबमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होऊ शकतात.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares